मतदार जेव्हा जागा होतो.

0

मतदार जेव्हा जागा होतो.

कालच महाराष्ट्राच्या विधासभा निवडणुकीचा निकाल लागला. सगळे अंदाज बाजूला सारत मतदारांनी महायुती ला एकहाती सत्ता बहाल केली. झालेली विकास कामे, एक है तो सेफ है , लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांची पोचपावती म्हणून महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित करत , कुठल्याही फेक नरेटीव्हवर विश्वास न ठेवता महायुतीला मतदारांनी एकहाती महाराष्ट्रचे भविष्य सोपवले आहे. 

खरतर महाराष्ट्राच्या मतदारांचे अभिनंदन केले पाहिजे त्यांनी या वेळी जे  भर भरून मतदान केले ते खरोखरच प्रशंसनीय आहे. तथाकथित फेक चाणक्य , जाणता राजा वगैरे पदव्या बहाल केलेला नेता शेवटच्या क्षणी काही विकृत कारस्थाने करून पुन्हा गेल्यावेळ सारखे राज्य आणेल म्हणून या वेळी मतदारांनी ही संधीच दिली नाही. 

संविधान आणि आरक्षण आणि जातीनिहाय गणना ह्या मुद्द्यांना घेवून हिंदूंच्या मधील जात व्यवस्थेचे संघर्षात रूपांतरित करण्याचा प्रयत्न या वेळी मतदारांनी हाणून पडला.

महाराष्ट्राचे उद्योग गुजराथने पळवले , गुजराथचे महाराष्ट्रावर आक्रमण हे भंपक विमर्श पसरवणाऱ्या भोंग्याला आणि त्याचे प्रसारण करणाऱ्या माध्यमांना समाजाने जागा दाखवून दिली आहे. मोदी , शहा, योगी यांचा मर्यादा सोडून अपमान आणि अडाणी, अंबानी यांना विरोध करून  विकासाला विरोध हे आता लोकांना समजले होते. 

महिलांच्या प्रती दुय्यम भाव , त्यातून लाडकी बहीण योजनेला विरोध याचा महिलांच्यावर होणारा परिणाम हे लक्षात न घेता विरोधकांवर  महिला प्रक्षुब्ध होत्या. लव्ह जिहाद कडे काना डोळा करणारे सरकार महिलांना नको होते.

छत्रपतींचा बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी समाज मतदानाला सज्ज झाला होता. एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र हा संतांचा संदेश समाजाला भावला होता. त्यामुळे आपल्या मतांच्या शक्तीची जाणीव त्याला झाली होती. हनुमंताला जांबुवंत आठवण करायला होते , अर्जुनाला युद्धासाठी भगवान श्रीकृष्ण सिद्ध करण्यास होते. येथे समाजरुपी हनुमंत आणि अर्जुन याना असंख्य जांबुवंत आणि श्रीकृष्णांनी जागे केले , सिद्ध केले आणि त्यामुळे ह्या रामायण , महाभारतात रावण , कुंभकर्ण , शुर्पणखा, दुर्योधन ,दुःशासन भस्म झाले.

हा निकाल कुणा एका पक्ष , संघटना , नेता यांचा विजय आहे असे मनाने योगी होणार नाही. तर हा  हा विजय समाजाचा आहे , जागृत मतदारांचा आहे. 

छत्रपती शिवरायांचा , संभाजीराजे यांचा इतिहास विकृत करून त्यावर आपल्या मतांचा सौदा करण्यासाठी बी ग्रेड आणि तत्सम संघटना यांच्या माध्यमातून डाव रचणाऱ्या मंडळींना समाजाने त्यांची जागा दाखवली आहे. हिंदूंचे श्रद्धास्थान मग स्वामी समर्थ असो प्रभू रामचंद्र असो किंवा गणपती असो त्याची चेष्टा करणारे कायमचे घरी बसवण्याचे काम या निमित्ताने झाले आहे

मतदारांनी केवळ एव्हढे एक काम केले की हिंदू म्हणून मतदान करायचे ठरवले , तर ह्या राष्ट्रविरोधी शक्तींचा पालापाचोळा झाला. जर पुढील काळात उर्वरित ३५ टक्के हिंदूंनी मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे ठरवले तर हिंदूंच्या विरुद्ध वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. पुढील काळात त्यासाठी सजग राहण्याची ही खरी सुरुवात झाली आहे.

सर्व संत महंत ह्या वेळी कुठलाही आड पडदा न ठेवता बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करत होते. अनेक विचारवंत, पत्रकार , लेखक पत्रकार पायाला फिरकी लावून महाराष्ट्र पिंजून काढत होते. उदय निरगुडकर , सुरेश चव्हाणके हे त्यात अग्रेसर होते. नरेंद्र पाटील मराठा समाजाला समजावून सांगण्यासाठी अहोरात्र फिरत होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ११ वे‌ वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या कष्टाला तर तोड नाही. राहुल सोलापूरकर सारखे अभिनेते आणि अविनाश धर्माधिकारी सारखे माजी सनदी अधिकारी यात मागे नव्हते.

एकीकडे संविधान , “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे पण सातत्याने त्यांचा अपमान करायचा. काँग्रेसचा हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील काळा इतिहासच ह्या निमित्ताने पुढे आला. क्षितिज गायकवाड सारखे दलित तरुण नेते हिरीहिरीने पुढे आले त्यांनी मांडलेला विषय दलित बंधूंना समजत गेला हे आणखी एक ह्या निवडणुकीचे सकारात्मक वैशिष्ट्य.

ह्या सगळ्या घडामोडीत समाजाने निवडणूक हातात घेतली. समोरून कट , कारस्थाने , अन्याय ह्याचा कळस गाठल्यावर समाजाने पक्का निर्धार केला. जाती मध्ये विभागण्यावर, ‘एक है तो सेफ है’ किंवा ‘बटोंगे तो कटोंगे’ ह्या घोषणा आणि त्या मागील आशय समाजाने लक्षात घेतला आणि तेथेच निवडणूक निकाल नक्की झाला .मतदानाची वाढलेली टक्केवारी सांगत होती निकाल काय लागणार !

औरंगजेब, अहमद शहा यांचे उदात्तीकरण करताना अहिल्या देवी , संभाजी राजे याना नाकारणे ‌, पांडुरंगाच्या वारी मध्ये घुसून त्याला अपवित्र करणे आणि एकात्म वारकरी समाजात छेद निर्माण करणे ह्या गोष्टी हिंदू समाजाला बिलकुल आवडलेल्या नाहीत. याचा एकप्रकारे वचपाच मतदारांनी काढला.

महायुतीतील सर्वच पक्षाच्या उमेदवारांना , समाजाने हिंदुत्वाचा राजकीय आशय स्वीकारल्यामुळे विजय प्राप्त झाला आहे हे समजून घेण्याची गरज आहे.

 तथाकथित पुरोगामी काजवे याना आता अंधारात नाही तर हिंदुत्वाच्या स्वच्छ आणि दैदिप्यमान प्रकाशात आपले अस्तित्व शोधावे लागणार आहे. महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने आता कात टाकली आहे.

समाजाने समाजासाठी लढवलेली ही निवडणूक होती.
व्होट जिहाद , वक्फ बोर्ड आणि लव्ह जिहाद याने क्षुब्ध झालेल्या हिंदू मनाला ही निवडणूक व्यक्त होण्याची संधी
होती . ती ह्या समाजाने चोख पणे साधली.

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.