माझे पक्षी अभयारण्य..
एप्रिल व मे महिन्यात उन्हाची दाहकता वाढतच होती. पक्ष्यांसाठी पाण्याचे अजून २ भांडी मी ठेवली होती. एकुण तीन भांड्यावर पक्ष्यांची गर्दी वाढताना दिसत होती. दिवस उजाडला की त्या भांड्या भवती पक्ष्यांची लगभग सुरू होतं असे. मग माझे आई – बाबा त्या पक्ष्यांचा लाईव्ह शो पहात असतं, मी जरी बाहेर गेलो तरी मला माझ्या पक्षी अभयारण्यातील पाणवठ्यावर कोणते पक्षी आले होते यांची माहिती मिळत असे, ते दोघे मला वर्णन करून सांगत मग मी पुस्तकातून त्या पक्ष्याचा फोटो दाखवून कन्फर्म करून घेत होतो.
दयाळ, ब्राम्हणी मैना, साळुंकी, श्री. व सौ. कोकीळ, भारद्वाज, सातभाई, शिंपी, सुर्यपक्षी, चिरक, कोतवाल व शिक्रा यांची नित्यनेमाने हजेरी सुरू झाली होती. आम्ही भर उन्हाळ्यात व पाण्याच्या दुष्काळात आमच्या गार्डन मधील झाडं वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होतो. कीचनमधील भाज्या, तांदुळ व भांडी धुतलेले पाणी आम्ही झाडांना टाकत होतो. सकाळी ब्रश केल्यावर तोंड धुण्यासाठी एखाद्या झाडाच्या मुळाशी जावून तोंड धुवत होतो जेणेकरून त्यांना पाणी मिळावे म्हणून, सोबतच झाडांच्या मुळाशी सुखलेला पाला पाचोळा टाकून ठेवला होता त्यामुळे त्यात पाण्याचा थंडवा मिळत असे. एकदा मी सकाळी झाडा जवळ तोंड धुवत असतांना दयाळ पक्षी अगदी जवळ येऊन बसला मी जशी चुळ भरून ते पाणी झाडाच्या मुळाशी टाकले तशे त्यामधून छोटे छोटे किडे बाहेर आले, दयाळ पक्ष्याने ते लगेच पटापट खाल्ले व उडुन गेला. मग मी संपूर्ण बगिच्यातच कडुलिंब, बेलाचा पाला पाचोळा पसरून ठेवला. व त्यावर दररोज पाणी शिंपडत होतो. तसेच झाडांच्या पानावर पण पाणी शिंपडत होतो, त्यामुळे पाने स्वच्छ होत होती व शिंपी व सुर्यपक्षी यांना आंघोळ करायला या पानावरील पाण्याचा थेंबाचा उपयोग होत असे.
ज्या प्रमाणे आपण दररोज अंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवतो त्याच प्रमाणे पक्षी पण अंघोळ करून आपले शरीर स्वच्छ ठेवतात. पाणी ठेवलेल्या भांड्यात आता दयाळ, बुलबुल, चिमणी, ब्राम्हणी मैना, साळुंकी व शिक्रा यांच्या आंघोळी पण सुरू झाल्या होत्या. पाणी पिणे कींवा आंघोळ करणे यामध्ये पण एक शिस्त होती. म्हणजे बघा जर बुलबुल पाण्याच्या भांड्यात अंघोळ करत असेल आणि चिमणी आली तर बुलबुल लगेच बाहेर येवून बाजूच्या फांदीवर जावून बसे व चिमणी पाणी पित, तिचे पाणी पिऊन झाले की बुलबुल परत आंघोळ करीत. प्रत्येक पक्ष्याची आंघोळीची वेगवेगळ्या तर्हा होत्या, ब्राह्मणी मैना व साळुंकी आपले पुर्ण अंग पाण्यात घुसळून अंग ओलेचिंब करीत व बाहेर येऊन एक एक पंख साफ करीत. या दोघांच्या आंघोळी मुळे पाण्याचे तुषार भांड्याच्या बाहेर उडत, ते ज्या पानांवर पडत होते त्या पानांवर छोटे छोटे पक्षी म्हणजे शिंपी पक्षी व सुर्यपक्षी आपले अंग घुसळून आंघोळ करून घेत. बुलबुल व दयाळ पण पाण्यात अंग भिजवून आंघोळ करतात. आंघोळ करतांना प्रत्येक पक्षी मात्र अत्यंत सावध असतो. सारखं इकडे तिकडे पहात सावधगीरीने ते पाण्यात अंघोळ करतात. डव पक्षी म्हणजेच भोरी हा फक्त आपली मान पाण्यात बुडवून अंघोळ करतांना पाहिले आहे, जणू काही इतर शरीराला पाणी व्यर्ज आहे. शिक्रा मात्र आपले बुड हलवून हलवून पाण्यात अंघोळ करतो. सर्वच पक्षी पाण्याचा योग्य वापर करतांना दिसून येतात, माणसा सारखे नाही की आहे पाणी मुबलक म्हणून कसे हि वापरा. दुसरे माझ्या असे लक्ष्यात आले की पक्षी स्वच्छ पाण्यात लगेच आंघोळ करतात. भांड्यात सारखे पाणी टाकून टाकून शेवाळ जमा झाले होते, मी पाहीले तर पक्षी येत भांड्याच्या भोवती फिरत थोडेसे पाणी पित व उडून जात. मग मी लगेच ते भांडं नारळाच्या किशीने घासून स्वच्छ केले व पाणी भरले तर लगेच बुलबुल येवून अंघोळ करायला लागला होता. त्या दिवसा पासून दर २-३ दिवसांनी तिन्ही भांडे स्वच्छ करून पाणी भरून ठेवायला सुरवात केली. आता पक्ष्यांना आमची व आम्हाला पक्ष्यांची सवय झाली होती, पुर्वी भुर्रकन उडून जाणारे पक्षी आता सावधगीरीने आम्हाला पहात असतं, त्यामुळे मला घरच्या घरी पक्ष्यांचे फोटो मिळत होते… आता भर उन्हाळ्यात पण आमचे अंगण पक्ष्यांमुळे नंदनवन झाले होते… पक्षी व आमच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले होते… या नात्याने आम्हांला काय दिले हे उद्याच्या लेखात….
प्रतिक्रियेच्या अपेक्षेत…..
©️अमोल सावंत