माझे पुण्य फळा आले..

0 581

माझे पुण्य फळा आले..!

आजचा हा विलोभनीय पूजन सोहळा बघून धन्य धनु झालो.
धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले । ऐसे जाणून रामभक्तीकरिता ऐश्व्र्य हे लाभले ॥’
भारतीय संस्कृती पूर्वापार अध्यात्म बहुल संस्कृती आहे. देव-धर्म यांना अंगीकारणारी पद्धती आहे. भगवान विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण हे आमचे दैवत. शिवाजी महाराज, समर्थ रामदास, विवेकानंद, हे आमचे आदर्श. पाप-पुण्याच्या गोष्टी होतात त्या सध्या आपल्या संस्कृतीतच कोणी हे सारं मानतात कोणी थोतांड समजतात. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु आज मात्र कित्येक वर्षांपासून अनेक भारतीयांनी बघितलेले स्वप्न पूर्णत्वास जातंय, हे खरोखरीच स्वप्नवत वाटतं.
भारताच्या भूतकाळाच्या तिजोरीत, आपल्याला उभा करणारा आणि जगाला मार्गदर्शन करणारा कौस्तुभमणी म्हणजे श्रीराम.
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।।
जननी आणि जन्मभूमी यांना स्वर्गापेक्षा प्रिय मानणारे श्रीराम हे राष्ट्रनिष्ठेचे आदर्श आहेत.
एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र येऊन हळूहळू संघटना बांधणी होते. अनेक संकटांना सामोरे जात चढ-उतार पार करीत ध्येयपूर्तीच्या मार्गावर, “चरैवेति चरैवेति” प्रमाणे चालत जातात, आणि ध्येयपूर्ती, स्वप्नपूर्ती वाटावी असा तो क्षण येतो पाहा. धन्य ते युगपुरुष ज्यांनी संघटनेचा मंत्र दिला.
१९९०. रामजन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून रथयात्रे द्वारे जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या, संकल्पाची मुहूर्तमेढ होते, आणि जवळजवळ तीस वर्षांनी ती शुभ घडी याची देही याची डोळा बघायला मिळते. “दुर्दम्य आत्मविश्वास, दूर दृष्टी आणि सातत्य, यातूनच ध्येय प्राप्ती होते” असे आपण आजवर वाचत आलो. ऐकत आलोत. आज प्रत्यक्ष अनुभवतोय.
दत्तसंप्रदायात, गुरु म्हणजे दत्तगुरुंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. “माझे पुण्य फळा आले, आज मी दत्तगुरू पाहिले” म्हणजेच दत्तगुरूंच्या दर्शनासाठी अथवा आराध्याच्या दर्शनासाठी, पुण्यकर्म हे जरुरी आहे. आपण असेही म्हणू शकतो की त्या दर्शनाने सुद्धा आपण कृतकृत्य होत असतो.
“आजी सोनियाचा दिनू..”! आज राम जन्मभूमी पूजनाचा कार्यक्रम बघताना, प्रत्येक जण हेच म्हणत असेल, “माझे पुण्य फळा आले..”. तुम्ही आम्ही तर नक्कीच म्हणू.
अयोध्या हे केवळ शब्द नाहीत हे केवळ नाम नाही, तर तो श्वास आहे. प्राण आहे. दैवत आहे.
या चळवळीत अनेक अडचणी आल्यात. अनेकांना बलिदान द्यावे लागले. ह्या बलिदानातून च आज राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिरासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
आपल्या तरुण वयात, रामजन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून, भव्यदिव्य राम मंदिराची संकल्पना आपल्या मनात होती. ती पूर्ण होती आहे. ज्यांनी अयोध्येत प्रत्यक्ष कारसेवा केली त्यांच्या आनंदाला पारावारच नसावा. तेही म्हणत असतील- माझे पुण्य फळा आले.
अयोध्येतील राम जन्मभूमी आंदोलनाच्या पाचशे वर्षाच्या काळात ज्या लाखो बंधूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रक्ताचे नाते नसलेल्या पण श्री रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी होऊन प्राणाहुती देणाऱ्या त्या सर्व हुतात्म्यांना आज धन्य झाल्यासारखं वाटत असेल. या सर्व हुतात्म्यांप्रती कृतज्ञता.
या आंदोलनाला येन केन प्रकारेन ज्यांचा ज्यांचा सहभाग होता ते सारेच म्हणत असतील- माझे पुण्य फळा आले. गेले अनेक वर्ष त्या झोपडीवजा मंदिरात कार्यरत पुजारी, तिथे येणारे भक्तगण, म्हणत असतील- माझे पुण्य फळा आले. पवित्र शरयू नदीचा तो शांत प्रवाह, आपल्या तरंगा द्वारे व्यक्त म्हणत असेल- माझं पुण्य फळा आले. दोन तपां पासून अयोध्येच्या कार्यशाळेत पडून असलेले रेखीव खांब म्हणत असतील- माझे पुण्य फळा आले. अयोध्येती कण अन कण म्हणत असेल- माझे पुण्य फळा आले.
आज प्रत्येक भारतीय म्हणत असेल माझं पुण्य फळा मग तो कुठल्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा असो, ज्याची नाळ भारताशी जोडलेली आहे असा, प्रत्येक नागरिक म्हणत असेल- माझे पुण्य फळा आले. आदरणीय पंतप्रधान श्री मोदीजीं चे शब्द आठवतात, “ज्याचे पायाभरणी मी करतो, त्याचे उद्घाटन सुद्धा मीच करतो”. खरोखरीच तीस वर्षांपूर्वी रथयात्रेच्या माध्यमातून रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या कार्याची पायाभरणी झाली त्या “रथयात्रेचे” सारथ्य, मोदिजीनीच केले होत. आज देशाच सारथ्य तेच करताहेत. निष्काम सेवाव्रताचे ध्येय ज्यांनी घेतले त्यांच्या जीवनात असे अनमोल क्षण येतातच. ते आज प्रत्यक्ष शिलान्यास करत आहेत. तीन वर्षांनी श्रीरामचं भव्य दिव्य मंदीराचे लोकार्पण करतील, यात तिळमात्र शंका नाही. दुर्दम्य योगायोग म्हणतात तो हाच.
आज आपल्याला खात्रीने म्हणता येईल, श्री रामांच्या अस्तित्वावरच शंका घेणारे, राम हे काल्पनिक पात्र आहेत असा कंठशोष करणाऱ्यांचे अंतर्मन सुद्धा म्हणत असेल- माझे पुण्य फळा आले. कारण त्याच्या मनातही राम आहेच. तसेच आता हा निवडणुकीचा विषय राहणार नाही ना त्यांच्यासाठी. “रामाच्या नावाने कोण वाया गेले, पाषाण तरले समुद्रात”.
धर्मनिरपेक्षतेच्या नावाचा जप जरी करत असलो तरी प्रत्येक “मण्यां”त किंवा (मनात) रामजी विराजमान आहेत. असहिष्णुतेचा कांगावा करणाऱ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात “मंदिर वही बनायेंगे” हा दृढनिश्चय पूर्णत्वास जातो आहेत हे बघून, बातमे दम है”, असे उद्गार सहजच निघत असतील, याची खात्री आहे.
अशा वेळी “शिलान्यास पूजा मुहूर्ता”चा वाद, काही वाचाळ वीर करायला लागलेत. राम त्यांना सद्बुद्धी देतीलच. तेव्हा तेही म्हणतील- माझे पुण्य फळा आले.
कुणी कशासाठी तर कुणी कशासाठी म्हणेल मात्र नक्की की- माझे पुण्य फळा आले.
एवढेच कशाला करोना रुपी राक्षस सुद्धा म्हणत असेल- माझे पुण्य फळा आले. कारण असा भव्यदिव्य सोहळा त्याच्या महामारीच्या काळातही होतोय ना, त्याच्या नाकावर टिच्चून!
रामनामाची जादू किमया काय आहे, हे त्या काळात समाज मनांने अनुभवलं. आज, आपण सारे अनुभवत आहोत. मर्यादेत राहून चुकीला दुरुस्त करण्याचा मार्ग या समाजाला आमच्या या श्रीरामानेच तर दाखविला आहे.
आमच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी असली तरी तीने राम जन्मभूमी बाबत दिलेला “डोळेस कौल”, आम्हा भारतीयांसाठी रामाच्या अस्तित्वावर मोहर उमटविणारा आहे. निश्चितपणे या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक मन म्हणत असेल- माझे पुण्य फळा आले.
होय! माझंही मन म्हणत आहे- माझे पुण्य फळा आले. कारण मी राम कथा वाचली, मी रामाचे भजन म्हटले, बालपणापासून रामरक्षा म्हणतो आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी राम भरलेला आहे अशी भावना अंतर्मनात खोलवर रुजलेली आहे. “कणकण मे है राम”, हे संस्कार मनावर बिंबवले गेले आहेत.
आज सुद्धा जे काम हातात आहे, त्यातून क्षणोक्षणी रामाच्या नावाचा गजर कानी पडतो आहे. गीतं ऐकायला मिळत आहेत. दूरचित्रवाहिन्यांवर अखंड राम नाम सुरू आहे. आणि मी ते सारं अनुभवतो आहे. जीवनाची सफलता याहून अधिक काय असावी, बरे?
आपल्यातल्या रामाला आणि त्याच्या कर्तृत्वाला साद घालीत असताना आपल्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व टिकवून ठेवण्यासाठी गदिमांच्या या ओळी प्रेराणादाई ठराव्यात.
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची| रामायणे घडावी येथे पराक्रमाची| शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे| आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे .
चला तर आपण सारे मिळून म्हणू या- माझे पुण्य फळा आले. “जय श्रीराम”|

लेखक हे पोस्ट बीएससी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स झालेले असून एका खाजगी कंपनीत 26 वर्ष नोकरी केली. सध्या गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आकाशवाणी नागपूर, युवावाणी, बाल विहार, गोकुळ साठी लिखाण आणि कार्यक्रम सादर. वृत्तपत्रांमध्ये समयोचित लिखाण. भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या कार्यात सहभाग. गेली चौदा वर्ष, कर्क रोग जनजागृती अभियान आणि समुपदेशन म्हणून कार्यरत. मोबा - ९४२३३८३९६६

Leave A Reply

Your email address will not be published.