राष्ट्रांकुर – मेजर सोमनाथ शर्मा

1947

0 201

परमवीर चक्राचे पहिले मानकरी मेजर सोमनाथ शर्मा आहेत. मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ साली हिमाचल प्रदेशातील दाढ येथे झाला. त्यांचे वडील मेजर जनरल अमरनाथ शर्मा सैन्यातील उच्च स्तरावरील अधिकारी होते. त्यांचे बंधू लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा व लेफ्टनंट जनरल विश्वनाथ शर्मा आणि बहीण मेजर कमला तिवारी यांच्यासह जवळपास संपूर्ण परिवारच सैन्यदलात आपली कामगिरी बजावत होते. देशभक्ती आणि शौर्य तर त्यांच्या रक्तातच भिनलेलं होते. नेतृत्व शौर्य आणि प्रतिकार करण्याची जबरदस्त ताकद त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांमध्ये होती आणि म्हणूनच मेजर सोमनाथ शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्य सैन्यदलात होते.

कश्मीरमधील उत्तम कामगिरीमुळे त्यांना मरणोपरान्त परमवीर चक्राने गौरविण्यात आले. त्यांना पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना श्रीनगर विमानतळावर वीरमरण आले. ही घटना सन १९४७-४८ मध्ये भारत-पाक युद्धाच्या वेळेस कश्मीरमध्ये घडली. ते 4th बटालियन ( कुमाऊँ रेजिमेंट)मधे त्यावेळी सेवा देत होते .

३१ ऑक्टोबर १९४७ रोजी सोमनाथ शर्माची बदली श्रीनगरला झाली. त्यांच्या उजव्या हाताला हॉकी खेळताना दुखापत झालेली असूनही ते युद्धासाठी श्रीनगरला गेले. ३ नोव्हेंबर १९४७ रोजी सोमनाथ शर्मांच्या तुकडीला कश्मीर खोऱ्यातील बदगाम येथे लढण्याचे आदेश देण्यात आले. तेथे त्यांच्या तुकडीस पाकिस्तानी सैन्याने वेढा घातला. शर्मांना कळून चुकले पाकिस्तानी सेना येथून पुढे सरकली तर श्रीनगरचा विमानतळ धोक्यात येईल. त्यांनी धैर्याने शत्रूचा प्रतिकार करायचे ठरवले. त्याच दरम्यान एक तोफ गोळा जवळच फुटल्याने त्यांना वीरमरण आले. भारतीय सैन्याला उद्देशून त्यांचे शेवटचे वाक्य होते, “शत्रू ५० यार्डात आलेला आहे. आमच्यापेक्षा अनेक पटीने संख्या जास्त असून आम्हीं भयानक गोळीबारास सामोरे जात आहोत. मी येथून एक इंचही मागे सरकणार नाही. अगदी शेवटचा जवान आणि शेवटची गोळी असेपर्यंत येथे आम्ही लढत राहू”.

या लढाईदरम्यान नं. १ बटालियन कुमाऊँ रेजिमेंट बदगामला पोहोचली व त्यांनी शत्रूचा हल्ला परतवून लावला. आपण ही लढाई जिंकून काश्मीर खोऱ्यासारखा स्वर्गाहुन सुंदर भाग जिंकून मिळवला परंतु मेजर सोमनाथ शर्मा यांच्यासारचे अवघे २४ वर्षांचे त्यांनी दिलेलं हे बलिदान नेहमीच सर्वश्रेष्ठ राहील. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले परमवीर चक्राचे मानकरी मेजर सोमनाथ शर्मा आहेत. आपल्या धीरोदात्त कामगिरीने त्यांनी भारतीय सेनादलामध्ये एक आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या स्मृतीस सादर प्रणाम.

– सर्वेश फडणवीस.

लेखक सामाजिक कार्यकर्ते असून सामाजिक व धार्मिक विषयाचे अभ्यासक आहेत. sarveshfadnavis.blogspot.com

Leave A Reply

Your email address will not be published.