नक्सल्यांना खुंखार सी सिक्स्टी कमांडोंचा दणका.
नक्सल्यांना खुंखार सी सिक्स्टी कमांडोंचा दणका.
शनिवार,१३ नोव्हेंबर,२०२१ला महारष्ट्र छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यामधील कोटगूल ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत,पोलीस व सी सिक्स्टी कमांडोंनी नक्सली चळवळीतील वरिष्ठ नेता मिलिंद तेलतुंबडे समेत २६ माओवाद्यांचा खातमा केल्याची पुष्टी गडचिरोली पोलिसांनी केली.मिलिंद उर्फ दीपक उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास तेलतुंबडे,सीपीआय (एम) सेंट्रल कमिटीचा सचीव, एमसीसी इन्चार्ज आणि दंडकारण्याच्या महाराष्ट्र, छत्तीसगड भागातील सामरिक महत्त्वाचा नेता होता.सूत्रांनुसार,हे सर्व नक्सली; आगामी नक्सल सप्ताहा संदर्भात, पोलिसां विरुद्ध विध्वसंक ऍक्शन प्लान आखण्यासाठी आणि तो प्लान कसा कार्यान्वयीत करायचा याच्या विचार विनिमयासाठी जंगलात जमले/आले होते.या चकमकीत गडचिरोली पोलीसांचे रविंद्र नैताम, सर्वेश्वर आत्राम, महरु कुळमेथे आणि टीकाराम कटांगे जखमी झाले.या जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे हलविण्यात आल आणि ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इंस्टिट्युट मध्ये दाखल करण्यात आल.या चारही जवानांना बंदुकीच्या खूप जास्त गोळ्या लागल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयातील क्रिटिकल केयर युनिटमधे उपचार सुरू आहेत. या सर्वांनी,हॉस्पिटल डिस्चार्ज झाल्यावर परत एन्काउंटरमधे भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली.
गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयलनुसार,”मृत नक्सल्यांत २० पुरुष आणि सहा महिलाांचा समावेश आहे.त्यांचे मृतदेह रविवारी सकाळी गडचिरोलीत आणल्यानंतर त्यांची ओळख पटवल्या गेली. गडचिरोली पोलिसांनी नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या पुर्वाश्रमी नक्सली राकेशला,भूतकाळात शरण आलेल्या इतर काही नक्सल्यांसोबत २६ मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आणल.२२ मृतांची ओळख पटली असून दोन पुरुष आणि दोन ओळख अद्याप पटू शकलेली नाही.” या नक्सल्यांची माहिती देणासाठी सरकार/पोलीसांनी लाखोंची बक्षीसे जाहीर केली आहेत. सर्वाधिक ५० लाखांच इनाम मिलिंद तेलतुंबडे यांच्या नावावर आहे.त्यांच्या खालोखाल लोकेश उर्फ मंगू पोड्याम/मडकामवर २० लाख, महेश उर्फ शिवाजी रावजी गोटावर १६लाख,किशन उर्फ जैमन आणि सन्नू उर्फ कोवाचीवर आठ लाख, भगतसिंग उर्फ प्रदिप उर्फ तिलक मानकूर जाडेवर सहा लाख,बंडू उर्फ दलसू राजू गोटा, प्रमोद उर्फ दलपत लालसाय कचलामी, कोसा उर्फ मुखासी, विमला उर्फ ईमला, प्रकाश उर्फ साधू सोनू, लच्छू, नवलुराम उर्फ दिलीप हिरुराम तुलावी यांच्यावर प्रत्येकी चार लाख आणि चेतन पदावर दोन लाखांच बक्षीस जाहीर झालेल होत/आहे.इतरांवर लाखाच्या आत इनाम जाहीर झाल आहे.
शनिवारी पोलीस आणि नक्सल्यांमधे झालेली चकमक,नक्सलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक काळ चाललेली चकमक होती.चकमक सकाळी साडे सहाच्या सुमारास सुरू होऊन संध्याकाळी साडे चार वाजेपर्यंत चालली.कमांडो रात्रीच जंगलात घुसलेत आणि नक्सली ठिकाण्यापासून योग्य अंतरावर आल्यानंतर त्यांनी चहुबाजूनी स्ट्राईक फॉर्मेशनमध्ये आगेकूच (टॅक्टिकल ऍडव्हान्स) सुरू केली.लपलेल्या जागेतून येणाऱ्या शत्रूची टेहाळणी करणाऱ्या पहारेकऱ्यांना (लूक आऊट मेन), आगेकूच करणाऱ्या पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी एकदम जबरी फायर सुरू केल. विशेष प्रशिक्षित सी सिक्स्टी कमांडोंच्या १०० जवानांनी या चकमकीत नक्सली हल्ल्याला प्रत्युत्तर दिल. दोन्ही बाजूंनी तुफान गोळाबारी झाली. नक्सल्यांनी ग्रेनेड लॉंचरही वापरलेत. ज्या प्रमाणात नक्सली फायर येत होता त्यावरून,तेथे कोणीतरी फार मोठा नक्सली नेता आल्याचा अंदाज पोलीसांना आला आणि तो खराही ठरला.या जागेत मोठ्या प्रमाणात नक्सली नेते होते,त्या पैकी काही अंधारात निसटून गेले असण्याची शक्यता आहे.मात्र मिलिंद तेलतुंबडेला वाचवण्यासाठी नक्सल्यांनी प्राणपणानी लढा दिला. त्याचा रक्षणार्थ असलेल्या सहाही पुरुष/महिला अंगरक्षक त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मारल्या गेले.रात्री नक्सली कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या शंभर कमांडोंच्या मदतीला रातोरात सी सिक्स्टी जवानांच्या १६ तुकड्यांची अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली.एका तुकडीत ३२ जवान असतात.सूत्रांनुसार नक्सली, धानोरा तालुक्यातील कोटगूल-ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात असल्याची,यात टिपागढ व कोरची दलम आणि विस्तार प्लाटूनचे नक्सल सदस्य असल्याची आणि याच नेतृत्व,गडचिरोली डिविजनल कमिटीचा मेंबर सुखलाल परचाकी करत असल्याची पक्की खबर गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. २६ नक्सल्यांना देवाघरी धाडणारी ही चकमक गडचिरोलीच्या इतिहासातील दुसरी मोठी घटना आहे. २३ एप्रिल २०१८ला याच सी सिक्स्टी कमांडोंनी ४० नक्सल्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ठार केल होत.
गेल्या काही दिवसां पासून सुरक्षा दलांनी दक्षिण गडचिरोलीतली गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवली होती.धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुलच्या मार्डीनटोला जंगल परिसरात काही नक्सली हालचाल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर,या ऑपरेशनसाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयलनी;एएसपी सौम्य मुंडेंच्या नेतृत्वात आपला सी सिक्स्टी कमांडो आणि स्पेशल ऍक्शन टीमचा फोर्स गुरुवारी पाठवला.दोनशे वर सी सिक्स्टी कमांडो आणि एसएटी पोलिसांनी त्या भागात सर्च ऑपरेशन सुरू केल. शनिवारी सकाळी त्यांनी नक्सल्यांना गाठल आणि धुमश्चक्री सुरू झाली.जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्सल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर, गडचिरोली पोलिस प्रमुखांनी आपल नक्षलविरोधी अभियान अधिक अचूक व मारक करण्यासाठी मोठी कुमक घटनास्थळी पाठवली.कारवाई संपल्यानंतर पोलिसांनी आपल सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केल कारण घटना स्थळाच्या आसपास अजून काही नक्सली कलेवर आणि/किंवा जखमी नक्सली सापडतील अशी पोलिसांना आशा होती आणि अजूनही आहे. नक्सली आपल्या सर्व जखमी व केवळ वरिष्ठ मृत सहकाऱ्यांना जवळपासच्या गावांपर्यंत नेतात आणि उपचार किंवा अंत्यसंस्कारांसाठी तेथे सोडून देतात हा नक्सली एन्काऊंटरमधला पूर्वानुभव आहे.या सर्च दरम्यान १७ नोव्हेंबरला सुखलाल परचाकीच खडकांमधे अडकलेल, रक्तबंबाळ कलेवर मिळाल्यावर, मारल्या गेलेल्या नक्सल्यांची संख्या २७ झाली असून ती वाढण्याची शक्यता आहे. शिरावर ३० लाखांच इनाम असलेल्या जखमी सुखलालला नक्सल्यांनी बरोबर नेल असाव आणि त्याचे प्राण गेल्यानंतर त्याला आहे तेथे सोडून ते निघून गेले असणार. ग्यारापत्तीच्या जंगलातून या कारवाईच्या वेळेस पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हत्यार,गोळाबारूद आणि नक्सल साहित्य जप्त केल. चकमक/एन्काऊंटरच्या जागी रक्ताचे मोठमोठे डाग,झाडांवर लागलेल्या बंदुकीच्या गोळ्या आणि काही फाटलेले जोडे/चपला दिसत होत्या. चकमकीत पाच एकें ४७ रायफल्स,एक एके ४७ ग्रेनेड लॉंचर,नऊ एसएलआर रायफल्स,एक इन्सास रायफल,तीन थ्री नॉट थ्री रायफल्स,नऊ १२ बोअर रायफल्स, एक पिस्तुल, बारा आयईडी आणि प्रचंड प्रमाणातील स्फोटकांसमेत;मोठ्या प्रमाणात शिधासामुग्री,पिठठू,ध्वस्त झालेल्या रॉकेट लॉन्चरचा सांगाडा,एक वॉकीटॉकी सेट,काही बॅटऱ्या,छापील नक्सल साहित्य आणि बंदुकीचे असंख्य खाली खोके (शेल्स) मिळाले.
नक्सल्यांच्या गनिमी काव्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी १९९२मधे गडचिरोलीत स्थानिक आदिवासींच्या विशेष कृती दलाची स्थापना केली. त्याच सी सिक्स्टी हे नामकरणही झाल कारण त्यात साठ कमांडो प्रशिक्षित पोलीस होते. या पथकात आदिवासींचा समावेश करण्यात आला कारण त्यांच स्थानिक भाषेवरील प्रभुत्व, लोकसंस्कृती,समाज आणि भूभागाची योग्य माहिती या सर्व गोष्टी,परिणामी गनिमी युद्धतंत्रात महत्त्वाच्या असतत्/ठरतात.सी सिक्स्टीच्या संख्येत पुढे नियमीत भर पडत गेली आणि त्यांना,नक्सलवाद्यांचा बिमोड करणार खुंखार दल हे बिरुद मिळाल.सध्या या पथकात जवळपास एक हजार जवान असले तरी त्याच नाव मात्र तेच आहे. त्यांना गनिमी युद्धनीतीच प्रशिक्षण एनएसजी सेंटर,बीएसएफ कमांडो स्कूल आणि आर्मी जंगल वॉरफेयर स्कूलमधे देण्यात येत, आधुनिक व प्रगत शस्त्र पुरवली जातात तसच प्रोत्साहनपर बढती आणि बक्षिस देखील दिली जातात.
मारल्या गेलेल्या नक्सल्यांवर एक कोटी वीस लाखांच इनाम आहे. हे बक्षीस फक्त संबंधित खबऱ्यांनाच मिळेल की पोलीस व खबऱ्यांमधे विभागल्या जाईल हे सध्यातरी स्पष्ट नाही.या व्यतिरिक्त गृहमंत्री/पालकमंत्र्यांनी पोलीस/ पोलीस वेलफेयरसाठी ५१ लाखांच तत्काळ अनुदानही जाहीर केल आहे. ”ही बक्षीस संबंधितांना रोख मिळतील याची जबाबदारी माझी” अशी ग्वाही,गडचिरोलीचे पालक मंत्री मा एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र हे पथक इन्व्हिन्सीबल नसून त्यांचे बरेच जवान भूतकाळातील चकमकींमधे मारले गेले आहेत. या पथकामुळे आपल्या अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता नक्सल्यांना वाटत असल्यामुळे,सी सिक्स्टीमधे भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठी नक्सल्यांनी निवडक उमेदवारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मारण सुरू केल.सी सिक्स्टीच्या खबऱ्यांच नेटवर्क, वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेली कुमक, सॅटेलाईट फोनच विस्तारलेलं जाळ, केंद्रीय निमलष्करी दलाच पाठबळ आणि वाढवण्यात आलेली गस्त यामुळे, आधीच बळ कमी झालेल्या आणि शस्त्रांचा तुटवडा भासत असलेल्या नक्सल्यांवरचा दबाव वाढला आहे.ही कारवाई केवळ एक चकमक नव्हती तर तो एक योजनाबद्ध हल्ला होता अस म्हटल्यास ते वावग होणार नाही.
सी सिक्स्टी कमांडोंच्या या घवघवीत यशाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच मार्गदर्शन,बिना दबाव,योग्य जवानांच चयन व कठोर प्रशिक्षण,असाधारण कार्यक्षमता,प्रशासकीय पाठींबा आणि पोलीस अधिक्षकांच प्लानिंग आणि एक्झिक्युशन कारणीभूत आहेत.सी सिक्स्टीचा चयन व प्रशिक्षण स्तर उच्च दर्जाचा आहे.नक्सल्यांशी लढा देण्याची तीव्र आंतरिक इच्छा असलेले स्थानिक पोलीस आणि युवकच यात घेण्यात येतात.याच्या प्रशिक्षणाचा स्तर देशातील वरिष्ठ दर्जाच्या कमांडोंच्या समकक्ष असतो हे मी स्वानुभवावरुन सांगू शकतो.हे युवक या फोर्समध्ये ठराविक कालखंडासाठीच येतात आणि नंतर आपल्या पॅरेण्ट युनिटमधे परत जात असल्यामुळे,हा सदैव तारुण्यानी मुसमुसलेला फोर्स नेहमीच अनुभवी अधिकऱ्यांखाली कार्यरत असतो.या फोर्सकडे खबऱ्यांच विस्तारित जाळ आल्यामुळे त्यांना माहितीची वानवा नसते. सी सिक्स्टी स्पेशल इंटलिजन्स युनिट, नक्सलसंबंधी माहितीची हासीली व पृथ:करण करून योग्य ते निर्देश देत.
महाराष्ट्र सरकारनी या फोर्सला नेहमीच योग्य ती आर्थिक व संसाधनीय मदत केल्यामुळे त्यांची कार्यक्षमता अबाधित असते/राहाते.त्यांना बुलेटप्रूफ जॅकेट्स,नाईट व्हिजन ग्लासेस,ड्राय राशन आणि आधुनिक शस्त्रास्त्र दिल्या जातात. १९९०च्या दशकात साध्या एसएलआर रायफली असणाऱ्या सी सिक्स्टी जवानांकडे आज एके ४७/५६ रायफल्स आहेत.अंकित गोयलनी या ऑपरेशनच मूलभूत व बारीक प्लानिंग केल.फोर्स केव्हा लॉन्च करायचा,त्याला लक्षापर्यंत कस पाठवायच आणि किती/केवढी कुमक केंव्हा व कशी पाठवायची याची काटेकोर आखणी व राबवणी त्यांनी केली. सौम्या मुंडेंनी या प्लॅनला साधकबाधक रीतींनी प्रत्यक्षात उतरवल. सदैव अशा जाँबाज अधिकाऱ्यांच नेतृत्व लाभल्यामुळेच;सी सिक्स्टी कमांडो व गडचिरोली पोलीस महाराष्ट्रातील नक्सली दबावाचा अस्त करण्यात सफल झाले आहेत अस म्हटल्यास ते चूक होणार नाही.
महाराष्ट्रातल्या जंगलांमधे नक्सल बनाम प्रशासन स्थितीचे संदर्भ बदलत चाललेले दिसून पडतात.नक्सल्यांनी याच इलाक्यातून आंध्र आणि छत्तीसगड राज्यात भक्कम कॉरिडोर निर्माण करून मागील तीस वर्ष महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारला बेजार केल होत.या चकमकीत ठार झालेल्या नक्सली संख्येवरून त्यांचा गडचिरोलीमधील लोकांवरचा प्रभाव ओसरू लागला आहे याचा प्रत्यय कमांडोंच्या या मोठ्या कारवाईतून उजागर झाला.या कारवाईमुळे नक्सल्यांना मोठा धक्का बसला असणार यात शंकाच नाही.२०१७ते २०मधे पोलीसांनी ७६ नक्सल्यांचा खातमा केला तर त्यांनी २२ पोलीसांना देवाघरी धाडल.याच काळात १८०पेक्षा जास्त नक्सल्यांनी शरणागती पत्करली.नजदिकी भूतकाळात स्थानिक लोक पोलिसांच्या हालचालींची खबर नक्सल्यांना देत असत सांप्रत ते पोलिसांना नक्सल्यांचा ठावठिकाणा सांगतात.आता जनमानसाचा कल गडचिरोली पोलिसांच्या बाजूनी झुकलेला दिसून पडतो.नक्सली एकेकाळी ज्या भागात मुक्तपणे वावरत असत त्याच भागात वाढलेला पोलीसी कारवायांचा दबदबा, शरणागतांसाठी पुनर्वसनाच्या आकर्षक योजना इत्यादी कारणांमुळे नक्सली,सशस्त्र चळवळीच्या मार्गापासून दूर जाताहेत/होताहेत. शिवाय,बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवामुळे या जिल्ह्यातला सशस्त्र चळवळीचा संदर्भही कमी होत चालला आहे.
मागील काही वर्षांत, महाराष्ट्रातील नक्सली चळवळीला हा मोठा फटका बसला आहे. दंडकारण्यामध्ये त्यांच प्रभाव क्षेत्र आकुंचित होत आहे कारण पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या (पीएलजीए) प्रतिकाराची तीव्रता आणि विस्तार क्षमता,दोन्ही कमी झाले आहेत. नक्सल पक्ष आणि गनिमांमधील रुंडावलली/रुंदावत जाणारी दरी, नवीन सदस्यांची कमी होत असलेली संख्या/भरती आणि चळवळ सोडून शरण जाणाऱ्यांची वाढती संख्या, या सगळ्यामुळे नक्सल्यांवर,निदान महाराष्ट्रात तरी,कठीण काळ आल्याच प्रत्ययाला येत. सशस्त्र संघर्षांमध्ये गुप्तवार्तेला प्रचंड महत्त्व असत आणि नक्सलविरोधी लढ्यात स्थानिक लोकांना सोबत घेण्याच्या प्रयत्नांना आता चांगली फळ मिळताहेत हे या चकमकीतून उजागर झाल आहे.गडचिरोली पोलीस आणि सी सिक्स्टी कमांडोंना या नवीनतम चकमकीत मिळालेल्या उज्वल यशाची परंपरा अशीच कायम व अबाधित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Photo – Google.