नवीन वर्ष, नवीन करप्रणाली

0

नवीन करप्रणाली नक्की काय आहे ?

नवीन करप्रणालीमध्ये आपल्या उत्पन्नावरील कर कमी करण्यात आला आहे. याचा अर्थ जर या आर्थिक वर्षात आपल्या उत्पन्नात वाढ नाही झाली व आपण नवीन करप्रणाली नुसार कर भरणार असू तर कदाचीत आपल्याला गेल्या वर्षी पेक्षा कमी किंवा अधिक कर भरावा लागू शकतो. आता स्वाभाविकपणे मनात प्रश्न येतो की जर उत्पन्नावरील कर दर कमी केला आहे तर मला अधिक कर का भरावा लागू शकतो? येथे एक लक्षात घ्या आपल्या उत्पन्नावरील कर दर कमी करताना सरकारने आपल्याला दिलेल्या सर्व वजावटी रद्द केलेल्या आहेत.

असे का केले?
गेल्या अनेक वर्षांपासून करबचत व कर सवलती यांमध्ये योग्य ते बदल करण्यात येत आहेत. आपल्याकडे रजेचा प्रवासभत्ता, घरभाडे भत्ता, ८०क, ८०ड, ८०क.क.ड. तसेच गृह कर्ज, त्यावरील व्याज, दिलेल्या देणग्या या व इतर अश्या एकूण ७० सवलती गृहीत धरून आपण आपले अंतिम उत्पन्न ठरवत असतो. इतक्या प्रकारच्या सवलती, त्यांचा लाभ घेण्यासाठी देत असलेली कागदपत्र आपल्याला जमा करावी लागत असत त्यानंतर ती कागदपत्रे परत आयकर विभागाकड़े सादर केल्यानंतर त्यांनी त्याचे योग्य ते मूल्यांकन केल्यानंतर आपल्याला योग्य ती सवलत मिळत असे. या सगळ्यासाठी होणारा त्रास कमी करायचा असेल तर आपल्या उत्पन्नावर सरळ मार्गाने कुठलीही सवलत न देता कर आकारण्यात यावा अशी मागणी अनेक जणांकडून होत होती. तसेच असे केल्यास करचुकवेगिरीला सुद्धा आळा बसेल असे अनेक अर्थतज्ञांचे मत आहे. सिंगापूर, इंग्लंड सारख्या अनेक देशांमध्ये गेले कित्येक वर्ष अशाच पद्धतीने करा गोळा केला जातो. आपण सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत सदर नवीन करप्रणाली अवलंबवली आहे. आगामी काही वर्षात भारतातील सर्व करसवलती रद्द होऊन एकूण उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागल्यास आश्चर्यचकीत होण्याची गरज नाही तदापी त्यासाठीची तयारी म्हणून हे आर्थिक वर्ष धरले जाऊ शकते.

नवीन प्रणालीतील कर दर काय आहेत.
एकूण उत्पन्न कराचा दर
₹ 2,50,000/ पर्यंत 0%
₹ 2,50,001/- ते ₹ 5,00,000/- 5%
₹ 5,00,001/- ते ₹ 7,50,000/- 10%
₹ 7,50,001/- ते ₹ 10,00,000/- 15%
₹ 10,00,001/- ते ₹ 12,50,000/- 20%
₹ 12,50,001/- ते ₹ 15,00,000/- 25%
₹ 15,00,001/- व त्यापुढील उत्पन्नावर 30%
आता जाणून घेऊयात जुन्या करप्रणालीतील कर दर
एकूण उत्पन्न कराचा दर
₹ 2,50,000/ पर्यंत 0%
₹ 2,50,001/- ते ₹ 5,00,000/- 5%
₹ 5,00,001/- ते ₹ ₹ 10,00,000/- 20%
₹ 10,00,001/- व त्यापुढील उत्पन्नावर 30%

नक्की काय व कसे निवडाल?
करदात्याने बचत करत जुन्या करप्रणालीमध्ये सहभागी होत विविध वजावटींचा भाग घ्यावा की नवीन करप्रणाली वापरावी याचे स्वातंत्र आयकर विभागाने प्रत्यक्ष करदात्याला दिले आहे. त्यामुळे आपण ज्या आस्थापनामध्ये काम करत आहोत तेथे आपण आपला निर्णय कळवू शकता आणि त्या प्रमाणे आपला अग्रीम कर आपल्या पगारातून वळता केला जाईल. आपण आपली कररचना एकदा आपल्या आस्थापनेत कळवल्यानंतर आपण त्या आर्थिक वर्षात बदलू शकत नाही तथापी कर विवरण भरताना आपण ते बदलू शकता व ते अंतिम धरले जाईल.

आपण जर जुन्या कररचनेनुसार जाणार असाल तर आपल्याला सध्या उपलब्ध असलेल्या सगळ्या वजावटींचा लाभ घेता येईल व आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आपण आपले विवरण भरत होतात तसेच आपण भरू शकता. आपण जर नवीन करप्रणालीचा लाभ घेणार असाल तर मात्र आपल्याला कुठल्याही सवलतींचा लाभ न घेता आपल्या एकूण उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे.

आयकर विभागाच्या संकेतस्थळावर दोन्ही पद्धतीने उत्पन्नाची मोजणी करून करदेयता किती होईल याची मोजणी करणारेगणकयंत्र नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहे आपण ते ही वापरू शकता.

नवीन करप्रणालीतील सर्व सवलतींचा लाभ सोडल्यास १५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला ₹ ७८,०००/- एवढा कर कमी द्यावा लागू शकतो. त्यानंतरच्या उत्पन्नावर ३०% कर दोन्ही ठिकाणी असल्याने करात होणाऱ्या वाढीत कोणताही फरक पडणार नाही.

वरील सर्व बाबींचा विचार करून तसेच आपल्या आर्थिक गरजा, आपली बचत तसेच आगामी खर्चाचे योग्य ते नियोजन करून कुठली पद्धत वापरल्याने आपल्याला किती कर भरावा लागेल याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.