निर्णायक मतांचा ‘एक टक्का’ ही नसे मात्र थोडका !

0

निर्णायक मतांचा ‘ एक टक्का ‘ ही नसे मात्र थोडका !
————————————–

– गंगाधर कांबळे.

राजकारणात निवडणूकीतील विजय हेच अंतिम यशाचं गमक मानण्याचा प्रघात आहे . त्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नपूर्वक डावपेच आखण्याची मेहनत घेतात . मतदार आपल्या पक्षाकडे आकर्षित कसा होईल याला प्राधान्य देण्यावर ज्यास्त भर असतो . शेवटी जो पक्ष बाजी मारतो तोच सत्तेचा दावेदार ठरतो . या दावेदारीच्या शर्यतीत नियोजित ठिकाणच्या जवळपास पोहचण्यासाठी पक्षाचं नेतृत्व व कार्यकर्ता यांच्याकडे ; १) अभ्यासाची ओढ , २) चिंतनाची डूब , ३) दृष्टीची व्यापकता ह्या गोष्टी असणे अत्यंत जरूरीच्या आहेत . याचा अभाव हाच भव्य उभारी घेण्याला खाली खेचण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो . गठ्ठा मतांच्या नादात थोडक्या मतांकडे दुर्लक्ष होण्याची प्रक्रिया येथूनच सुरू होणार असते . म्हणून खऱ्या दक्षतेची गरज येथेच भासते .
मजबूत तटबंदी असताना सुद्धा कुठेतरी चूकून राहिलेल्या कच्च्या जागा निघतात आणि त्याच जागा तडा देण्यासाठी अडचणीच्या म्हणून समोर येतात . असाच प्रकार राजकारणाच्या रणांगणावर लढताना अनुभवायला मिळतो . कायम किंवा नव्याने आपल्यासोबत जोडलेल्या जाती घटक समूहांपैकी सर्वच नव्हे , पण त्यातील काहींचे बहकाव्यात येऊन अथवा संभ्रमित होऊन ते दूरावण्याचे मनसुबे वेळीच लक्षात येणारे नसतात . असा बाका प्रसंग उद्भवतो तेव्हा हे सगळं निस्तरण्याची कुवत असणारे त्या – त्या समाज घटकातील पण आपल्या हक्काचे असलेले वाॅरीयर्स शोधून त्यांना सज्ज करण्याचा मार्ग शिल्लक उरतो . डॅमेज कंट्रोल करून घेण्याचा खरा कस येथे लागतो . अनुकूल परिस्थिती उत्साहाच्या भरात कधी कधी प्रतिकूलतेत ढकलून देण्यास टपून बसलेली असते . तिच्या आहारी न जाता त्यावर स्वार होऊन संभाव्य अडथळे हटविण्याच्या उपाययोजना आखण्याची तयारी हवी . निवडणुकीतील विजया करिता सर्वाधिक मताधिक्याचा अपेक्षित आकडा प्राप्त करण्यासाठी त्यात एक – एक टक्क्याची भर घालूनच त्यास पुर्णत्वाचा आकार देता यतो . हे विसरता येत नाही . बहुसंख्येय मतांची ज्यास्त काळजी घेण्यात गैर काहीच नाही , परंतू इतर थोडक्यांना आपल्याकडे वळवता येण्याची कसरत विशेषत्वाने करायची असते . त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी वेगळी टीम कार्यरत ठेवणे कधीही उत्तम . जे पक्ष असे काही न करता नुसत्या स्वप्नरंजनात अडकून पडतात आणि EVM मशीन , निवडणूक आयोग , सत्तेचा दुरूपयोग , लोकशाहीची हत्या इत्यादी बाबींवर तोंडसुख घेत जनभावनेचा अनादर करण्यात वेळ घालवतात त्यांच्या पराजयासाठी दुसऱ्या कुणाची गरज उरत नाही . पण प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या फळीची स्वतंत्र यंत्रणा असणाऱ्या पक्षाने आपल्याकडील जमेच्या साधनसामग्रीचा खूबीने वापर करण्याकडे कल ठेवून त्याचा फायदा तर उठवलाच पाहिजे. हे वर्ष निवडणुकीचं आहे . त्यामुळे त्याला सामोरं जाताना अतिरिक्त धावपळ करावी लागणारच आहे . आताची तारांबळ ही उद्याच्या यशाची नांदी ठरणार असेल तर , ‘ टक्का – टक्का विजय खेचे ‘ हा मंत्र ध्यानात घेण्यास अडचण काय ?
– गंगाधर कांबळे.

Leave A Reply

Your email address will not be published.