पैश्याचं गणित.

0

पैश्याचं गणित.

पैसा कोणाला नको असतो? प्रत्येकजण नाही म्हटलं तरी पैश्याच्या मागे धावत असतो. रात्रीचा दिवस करून, एक वेळ उपाशी राहून कोणी पैसे कमावते तर कोणी एकमेकांना फसवून, चोरी किंवा विश्वासघात करून. पैसे कमावण्याला जेवढं डोकं लागत नाही तेवढं डोकं तो सांभाळून ठेवायला आणि त्याला वाढवण्यासाठी लागतं. इकडेच सामान्य माणूस पैश्यांच्या गणितात मार खातो. पैसे कमावले म्हणजे आपण ध्येय साध्य केलं, असा आनंद साजरा करण्याच्या नादात आपली नजर हटते आणि दुर्घटना घडते.

आपली नजर हटण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यातील महत्वाची म्हणजे पैश्याची हाव. थोडे पैसे मिळाले की अजूनच्या मागे आपण लागतो. त्या अजूनसाठी पुन्हा तेवढेच कष्ट करण्याची नि तितका काळ थांबण्याची आपली तयारी नसते. मग सुरू होतो झटपट पैसे कमावण्याचा शोध आणि त्याचवेळी आपण सहज सावज बनतो, टिपून बसलेल्या पैश्यांच्या शिकाऱ्यांचे. अनेक वेगवेगळ्या रूपांत आपल्यासमोर ते बागडत असतात आणि योग्य वेळेची वाट बघत असतात. कधी इंश्युरन्स एजंट बनून तर कधी मालमत्ता विकणारे बनून, कधी शेअर बाजारातले ब्रोकर बनून तर कधी फायनान्शियल एक्स्पर्ट बनून. कारण त्यातून त्यांची पोळी किती भाजली जाणार हे ठरलेलं असतं. जितक्या मोठ्या खड्ड्यात ते तुम्हाला घालतील, तितकीच मोठी त्यांची कमाई असते. जेवढी समोरच्याची हाव मोठी तितका मोठा खड्डा तो स्वतःसाठी खोदत असतो. फक्त त्यात ढकलण्याचं काम ही लोकं करत असतात. एकदा का त्यात पडलं की तुम्ही कितीही तडफड करा, शिव्या-शाप द्या किंवा आरडाओरड करा, तुमचं नुकसान हे ठरलेलं असतं. कारण अश्या वेळी आपली माणसंही बाजूला होतात. अर्थात याला काही अपवाद असतील आणि असावेत. पण त्या अपवादांच्या जोरावर आपण खड्डा खोदायचा का? हा विचार आपण करायला नको का?

भाजीवाल्याकडे प्रत्येक बटाटा आणि टोमॅटो निरखून घेणारे आपण हॉटेलच्या आलिशान मिटींग रूम मधे बसून लेक्चर ऐकतो, ‘लाखोचे चेक मला येतात’, तुम्ही अजून ३ मेंबर करा, मग तुम्हाला पण असेच चेक येतील’ असं म्हणणारे जे असतात त्यांच्याकडे आपण फॉर्म १६ ची मागणी किंवा त्यांनी त्या चेकवर भरलेल्या रकमेचा आयकर भरला आहे की नाही, याची तपासणी करण्याची तसदी पण आपण घेत नाही. दुसऱ्या कोणी आणलेला किंवा दिलेला शर्ट कधी न घालणारे आपण दुसऱ्यांनी कोणीतरी सांगितलं म्हणून डोळे बंद करून हजारोंच -लाखोंची गुंतवणूक करतो. मग खड्ड्यात पडल्यावर दोष कुणाचा? त्या सांगणाऱ्याचा की न विचार करता त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या आपला? दोन टक्के जास्ती मिळतात म्हणून जास्ती जोखीम पत्करणारे आपण, त्या जोखमीचे चटके बसल्यावर दुसऱ्यांना दोष का देतो? आज अगदी प्रथितयश असणारे म्युच्युअल फंडसुद्धा कराराची कागदपत्रे नीट वाचून त्यातील नियम,अटी समजून घेऊन गुंतवणूक करायला सांगतात. आपल्यापैकी कितीजण ते नियम वाचतात? हेच एल.आय.सी., इंश्युरन्स पॉलिसी, मेडिक्लेम या सर्वांच्या बाबतीत लागू आहे. माझा २ कोटींचा मेडीक्लेम आहे, हे आपण मोठ्या आवाजात सांगतो, पण त्यात किती आजारांच संरक्षण आहे? जी रक्कम सांगितली गेली आहे, ती मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे, तब्येतीच्या तक्रारी आणि आधी असलेले आजार यांचा समावेश अथवा वगळलेले आहेत, याच्या अभ्यासासाठी आपण वेळ घेतो का? जर आपल्याला गरजेच्या वेळी आपण काढलेल्या पॉलिसीचे पैसे मिळाले नाहीत तर त्या २ कोटींचा उपयोग काय?

आपल्या भावंडांना मग ते सख्खे असो वा चुलत, काही शे रुपयांची मदत करताना कुरबूर करणारे आपण सोशल मिडियावरून भरभरून वाहणाऱ्या करुणामयी आणि मदतीच्या आवाहनांना शहानिशा न करता बिनदिक्कतपणे हजारो आणि लाखो रुपये देऊन मोकळे होतो? समोरचा माणूस कधी भेटलेला नसताना त्याच्यावर असणारा आपला विश्वास हा आपल्या रक्तातील माणसांपेक्षा जास्ती असतो. मग समोरच्याने खड्ड्यात ढकलले तर चुकीचं कोण? ढकलणारा की मागचा पुढचा विचार न करता विश्वास ठेवणारे आपण? इकडेही अपवाद असतील. वेगवेगळे अनुभव असतील पण त्या अनुभवांतून आपण शिकलो नाही, तर आज तो तर उद्या दुसरा आपला फायदा घेत राहणार. मग आपण कष्टाने कमावलेल्या पैश्याचं नियोजन जर आपण करत नसू तर त्याचा दोष कोणाचा?

पैसे कसे गुंतवावे किंवा आपल्याकडे असलेल्या पैश्याला कश्या प्रकारे वाढवावं हे सांगणारे आज अनेक लोक आहेत. नक्कीच या बाबतीत त्यांचा सखोल अभ्यासही असेलच. पण ढोबळमानाने आपण आपल्याकडे असलेल्या पैश्याचं गणित शिकलो तर निदान खड्ड्यात जाण्याची परिस्थिती तरी नक्कीच टाळू शकतो. समजा १०० रुपये उत्पन्न असेल तर ६०-७० रुपये आपला खर्च मानला तर उरलेल्या ३०-४० रुपयांचं नियोजन करण्यासाठी खरंच तज्ञ माणसाची मदत घ्यायची का? हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. त्या ३०-४० रुपयांमधले १०-२० रुपये आपल्या अकल्पित येणाऱ्या खर्चासाठी. १०-२० रुपये पॉलिसी, मेडिक्लेमसाठी आणि उरलेले १०-२० रुपये जोखमीच्या परतावा असणाऱ्या गोष्टींसाठी असा सरळ साधा हिशोब आपण करूच शकतो. अर्थात हा बेस झाला. त्यावर आपण इमारत कशी उभारणार त्यासाठी त्यातील तज्ञांची मते नक्कीच निर्णायक ठरू शकतील.

पैश्याचं गणित म्हणजेच त्याचं नियोजन जर आपण योग्य पद्धतीने केलं तर आपण स्वतःला खड्ड्यात जाण्यापासून वाचवूच शकतो. जरी कधी खड्ड्यात पडलो तरी योग्य नियोजनाची शिडी त्यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करते. व्यवहार करताना नाही म्हणता येणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. नात्यातलं असो वा आपल्या जवळचं असो, नाती आणि व्यवहार हे वेगळे ठेवता यायला हवेत. मदत आणि कर्तव्य हे व्यवहाराचा भाग नाहीत, हे पण त्याच वेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण पैश्याचं गणित जुळवताना नातेसंबंधांचं गणित पण चोख ठेवता यायला हवं. अनेकदा आपण यात गल्लत करतो आणि दोन्हीकडून माती खातो. त्यामुळेच आपली नजर हटवू नका आणि दुर्घटनेचा भाग बनू नका.

जनहितार्थ जारी.

तळटीप :- हा लेख कोणत्याही व्यक्ती,अथवा गोष्टीशी संबंधित नाही. तसेच त्यातून यात कोणत्याही एजंट अथवा आर्थिक तज्ञ तसेच कोणत्याही पॉलिसी अथवा स्कीमला दुखावण्याचा अथवा अयोग्य पद्धतीने सांगण्याचा हेतू नाही. लेखाचा उद्देश फक्त आपलं आर्थिक गणित शिकण्याचा आहे.

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

https://vartakvinit.blogspot.com/2021/07/blog-post_19.html

लेखक हे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, सोशल मीडियावरील आपल्या लिखाणाकरिता प्रसिद्ध आहेत. Email - vartakvinit@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.