पाकिस्तानी तालिबान: पाकिस्तानच्या घरातील कधीही फुटणारा बॉम्ब
पाकिस्तानी तालिबान: पाकिस्तानच्या घरातील कधीही फुटणारा बॉम्ब
ICRR: Af-Pak
धार्मिक अतिरेकी कट्टरतावाद आणि रक्तपात खैबर पख्तूनख्वा (KP) आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात पुन्हा एकदा डोकावूं लागला आहे. वझिरीस्तान, बाजौर, स्वात पुन्हा एकदा पाकिस्तानी तालिबानच्या पुनर्जन्माचे साक्षीदार होत आहेत जिथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, इस्लामिक धर्मांधांचा अतिरेकी गट पुन्हा सक्रिय झाला आहे आणि पाकिस्तानी एजन्सीची त्यांच्या हल्ल्यांना थोपवण्यातली असहाय्यता जगासमोर आली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सीं या वाढत्या दहशतवादाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी निष्क्रिय आणि कुचकामी ठरत आहेत.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने या वर्षी जूनमध्ये अफगाण तालिबानच्या मध्यस्थीने शांतता चर्चेसाठी अनिश्चित काळासाठी युद्धविराम घोषित केला असला तरी टीटीपी आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये नियमित चकमकी होत आहेत. दोन्ही बाजूंनी युद्धबंदी अजूनही सुरू असल्याची पुष्टी दिली गेली असली तरी अलीकडेच काही प्रसारमाध्यमांच्या सांगण्यानुसार सशस्त्र अतिरेकी स्वात, दिर आणि पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील आदिवासी जिल्ह्यांतील त्यांच्या पूर्वीच्या भागात परतले असल्याचे वृत्त दिल्यानंतर शांतता चर्चेच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होते. अलीकडेच पाकिस्तानी लष्कराने सांगितल्या प्रमाणे उत्तर वझिरीस्तानमधील बोय्या येथे सुरक्षा दलांनी छापा टाकला आणि त्या चकमकीत पाच सैनिक मारले गेले. टीटीपीने ही या चकमकीची पुष्टी दिली आहे. अलीकडेच खैबर पख्तूनख्वा
प्रांताची राजधानी पेशावरसह सहा जिल्ह्यांमध्ये त्यांनी सैन्यावर हल्ले केले होते.
वाटाघाटी चालू असो किंवा नसो, भविष्यात पाकिस्तानात हिंसाचारात वाढ होण्याची शक्यता आहे. देशाची आधीच नाजूक झालेली राजकीय आणि आर्थिक परिस्थिती पाहता, हिंसाचाराचे लोण सीमाभागातून शहरी भागात पसरण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यांच्यात दीर्घकालीन शांतता चर्चा होईल अशी फारशी अपेक्षाही नाही. FATA चे खैबर पख्तूनख्वा प्रांतात विलीनीकरण रद्द करणे, या भागात शरिया कायदा लागू करणे आणि सीमावर्ती भागातून पाकिस्तानचे सैन्य मागे घेणे या टीटीपीच्या मुख्य मागण्या आहेत. टीटीपीच्या या मागण्या पाकिस्तान पूर्ण करणे निव्वळ अशक्य आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानच्या विजयाने फक्त एकेकाळी जगातील सर्वात प्राणघातक दहशतवादी गटांपैकी एक असलेल्या टीटीपीला इस्लामाबादविरुद्ध बंडखोरी करण्यास प्रोत्साहनच दिले नाही तर इस्लामाबादकडून अफगाण तालिबानशी अमेरिकेच्या समांतर वागणुकीची अपेक्षा करण्याचा आत्मविश्वासही दिला. त्यामुळे टीटीपी त्याच्या कोणत्याही मुख्य मागण्यांवर वाटाघाटी करेल याची फारशी शक्यता नाही. अफगाण तालिबानच्या धर्तीवर पाकिस्तानी तालिबान स्वतःला राजकीयदृष्ट्या चित्रित करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांची मुख्य भूमिका पाकिस्तानविरोधी आहे. या संघटनेने ड्युरंड रेषा मान्य करण्यास वारंवार नकार दिला आहे आणि यासाठी त्यांना अफगाण तालिबानचा उघड पाठिंबा आहे.
अफगाण तालिबान आणि टीटीपी यांच्यातील हितसंबंध आजही घट्ट आहेत. अफगाण तालिबान आणि टीटीपी हे दोन्ही पश्तून आहेत. अफगाण तालिबान ड्युरंड रेषा नाकारून पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेला आव्हान देत आहे. TTP एकाच वेळी FATA आणि खैबर पख्तुनख्वा (KP) च्या विलीनीकरणास विरोध करत दबाव आणत आहे. या एकत्रित प्रयत्नांमुळे बहुधा बहुसंख्य पश्तून असलेल्या आदिवासी सीमावर्ती भूभागाची कल्पना मुख्य प्रवाहात येऊ शकते.
टीटीपीच्या आक्रमक भूमिकेचा आणखी एक भक्कम दुवा म्हणजे त्याच्या प्रतिस्पर्ध्याची, म्हणजे पाकिस्तानचा कमकुवतपणा आणि सामाजिक-आर्थिक आणि राजकीय अस्थिरता. पाकिस्तानी सरकार आणि लष्करी अधिकारी त्यांच्या स्वतःच्या घरगुती समस्यांमध्ये इतके अडकले आहे की हिंसाचाराला आळा घालण्यासाठी, शांतता प्रस्थापित करारासाठी हताश झालेले दिसत आहे. टीटीपीचे प्रमुख, मुफ्ती नूर वली मेहसूद आणि प्रवक्ते मुहम्मद खुरासानी यांनी गेल्या ऑक्टोबरपासून या वाटाघाटीला सुरूवात झाल्यापासून त्यांच्या जाहीर वक्तव्यांवरून हे स्पष्ट केले आहे की देशातील महागाई, वाढती वांशिक विभागणी आणि नैसर्गिक आपत्तींचे सरकारी गैरव्यवस्थापन या सगळ्याला पाकिस्तानी सरकार आणि लष्कराचे क्रूर धोरण, त्यांच्या नागरी आणि लष्करी नेत्यांच्या भ्रष्ट पद्धती बरोबरच शरिया अंमलबजावणीचा अभाव हेच घटक जबाबदार आहेत.
आंतरराष्ट्रीय जिहादी नेटवर्कशी टीटीपीचे संबंध, त्याच्या शस्त्रांवर नियंत्रण ठेवण्याच्या आणि केपीमधून FATA चे विलीनीकरण रद्द करण्याच्या त्याच्या मागण्या ठळकपणे हेच सूचित करते की हा गट शांतता प्रक्रियेचा वापर त्याच्या जुन्या भागांवर नियंत्रण मिळविण्यासाठी करायचा आहे. टीटीपी पाकिस्तान मध्ये एका नवीन गृहयुद्धाची तयारी करताना आपला बेस भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.
भूतकाळात मुल्ला उमर आणि सिराजुद्दीन हक्कानी यांसारख्या अफगाण तालिबान नेत्यांनी टीटीपीला अफगाण जिहादवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पाकिस्तानवर हल्ला करू नये यासाठी वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण हे प्रयत्न कायम निरर्थक ठरले कारण पाकिस्तानविरुद्ध जिहाद पुकारणे हा टीटीपी अफगाण तालिबान पासून वेगळं असण्याच्या त्यांच्या स्वतंत्र वेगळ्या ओळखीचा आधार आहे.
टीटीपी अफगाण तालिबानप्रमाणे अंतर्गत एकसंध नाही. भविष्यात वेगवेगळ्या गटांमधील सत्ता संघर्षांमुळे तीव्र आणि प्रदीर्घ हिंसा होऊ शकते. इस्लामिक स्टेट खोरासान (ISK) ला त्याचा फायदा होऊ शकतो.
2014 पर्यंत त्यांचे जसे आदिवासी भागातील मोठ्या भूभागावर नियंत्रण होते तसे नसेल तरी अजूनही टीटीपी ही पाकिस्तानातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याला वेळीच आळा न घातल्यास संपूर्ण पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांची नवीन लाट येऊ शकते. पाकिस्तानी तालिबानची खरी ताकद ही त्यांचे सहयोगी आणि समर्थन करणारे नेटवर्क आहे, जे अजूनही अस्तित्वात आहेत आणि पाकिस्तानमध्ये फोफावत आहेत. टीटीपीला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. टीटीपी कडून उद्भवणार्या धोक्याचा सामना करण्यासाठी गतीशील ऑपरेशन्सच्या पलीकडे जाणारा, टीटीपीवर लष्करी दबाव वाढवण्याव्यतिरिक्त बहुआयामी दृष्टीकोन आवश्यक आहे नाहीतर पाकिस्तानी तालिबान नावाचा बॉम्ब पाकिस्तानला कुठल्याही क्षणी नेस्तनाबूत करू शकतो.
साभार – ICRR..