पाश्चात्यांशी चीनी बॉक्सिंग

0

पाश्चात्यांशी चीनी बॉक्सिंग

हे असे म्हणे दर ६० वर्षांनी होते आणि निश्चितपणे होतेच. किमान चीनी मान्यतेनुसार तर घडून येतेच. म्हणजे असे की, दर ६० वर्षांनी या लाल तार्‍याच्या देशावर मोठे संकट येते. अगदी त्या देशात लाल तारा उगवला नव्हता तेव्हापासून. १८४० मध्ये ब्रिटनशी झालेले अफूचे युद्ध आणि त्यातील चीनचा पराभव, १९०० मध्ये बॉक्सर बंडाळी आणि पाश्चात्य, ख्रिश्चन फौजांनी केलेली मानहानी, १९६० मधील प्रचंड मोठा दुष्काळ, त्यापाठॊपाठ माओंची प्रसिद्ध ’लांब उडी’ आणि त्यातून ३ ते ४ कोटी लोकांचे भुकेने झालेले मृत्य़ू. एक ना अनेक आपत्ती आणि त्या ही बरोबर दर ६० वर्षांनी. आणि आता २०२० मध्ये पुन्हा एकदा करोनाने चिन्यांच्या मनातील हा अपशकुन खरा ठरविला आहे. आणि या वेळेस केवळ चीनच नव्हे तर संपूर्ण जगावर अपशकुनाचे वादळ घोंघावते आहे. अंधश्रद्धा म्हणा किंवा योगायोग, जे घडले आहे आणि घडते आहे ते जगासमोर आहे. ६० वर्षांनंतर चीन पुन्हा एकदा जागतिक मानहानीला तोंड देतो आहे.

करोना विषाणूने अवघ्या जगाला ग्रासल्यानंतर या संकटाकरिता चीनला दोषी धरणे सुरू झाले. अगदी अलीकडे पर्यंत अनेकांनी नावही न ऐकलेला चीनचा वुहान प्रांत तर सर्वतोमुखी झाला. तेथील प्रयोगशाळेतच हा विषाणू तयार झाला असावा असा दाट संशय जवळपास प्रत्येकाच्या मनात आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तर त्याचा अनेकदा जाहीर उल्लेख केला आहे, किंबहुना तशी मोहीमच उघडली आहे. इतर युरोपीय राष्ट्रे देखील उच्चरवाने चीनविरोधी सूर काढीत आहेत. आणि त्यामुळे या सगळया प्रकाराला पाश्चात्य राष्ट्रे विरुद्ध चीन अशा संघर्षाचे स्वरूप आले आहे. आपल्यावर असे संघटित आक्रमण होते आहे हे बघितल्यावर चीन तरी कसा शांत बसेल? आक्रमकता, स्वत:बद्दलचा प्रचंड अभिमान, बाहेरील टीका ऐकून न घेणे आणि इतर जगाकडे तुच्छतेने बघण्याची वृत्ती ही चीनची ऐतिहासिक गुणवैशिष्ट्ये आहे. पाश्चात्यांच्या आक्रमक प्रचाराला चीननेही आपल्या प्रचारयंत्रणेमार्फत तितकेच प्रबळ उत्तर देणे सुरू केले आहे. विविध राष्ट्रांमधील चीनचे राजदूत, प्रचारयंत्रणेतील अधिकारी, चीनी सत्ताधारी पक्षाच्या संपूर्ण नियंत्रणात असलेली वृत्तपत्रे आणि इतर माध्यमे यांनी आरोपांना केवळ प्रत्युत्तरच दिले नाही तर उलट टीकाही सुरू केली आहे. त्यामुळे, चीन आणि पाश्चात्य राष्ट्रे यांच्यातील या वाग्युद्धाचा मोठाच धडाका सध्या उडाला आहे. अनेक देशांतील प्रसारमाध्यमांमध्ये त्याबाबतच्या बातम्या आणि लेख रोजच येत आहेत. चीनी राजदूतांनी आक्षेपार्ह वक्तव्ये दिली म्हणून फ्रान्स, कझाकस्तान, नायजेरिया आणि इतर काही राष्ट्रांनी त्यांना कडक सूचना दिल्या आहेत.

या सगळ्यातून एकीकडे पाश्चात्य राष्ट्रे आणि दुसरीकडे एकटा चीन असे दृश्य उभे राहिले आहे. चीनमध्ये याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते आहे. पाश्चात्य राष्ट्रे एकत्र येऊन, ठरवून चीनला एकटे पाडत आहेत, हे चीनी सरकारने मनावर घेतले आहे. याला चीनी भावविश्वात ऐतहासिक संदर्भ आहे आणि चीनच्या दृष्टीने तो अपमानास्पद व दुखराही आहे. चीनविरोधात उघडलेली ही आघाडी ही या नव्या महासत्तेला ’बॉक्सर बंडाची’ आठवण करून देणारी आहे आणि म्हणूनच अधिक डिवचणारी देखील.

शतकाची सुरुवात बॉक्सर बंडाळी

विसावे शतक हे चीनच्या इतिहासात ’बॉक्सर बंडाळी’ घेऊन आले. चीनच्या सगळ्या भागांमध्ये युरोपीय व्यापार्‍यांनी हातपाय पसरले होते आणि आपले वर्चस्वही निर्माण केले होते. युरोपियांनी अवघा चीन आपसातील सामंजस्याने आपल्या व्यापारासाठी वाटून घेतला असता. या राष्ट्रांनी ठरविले असते तर त्याचवेळी चीनचे तुकडे झाले असते. एकीकडे युरोपीय व्यापारी भरमसाठ नफा कमवीत असताना चीनच्या जनतेला याचा काहीही लाभ होत नव्हता. युरोपियनांच्या वर्चस्ववादाला स्थानिकांचा विरोध होता. आणि याच असंतोषाचा स्फोट झाला १९०० मध्ये, हेच ते चीनच्या आधुनिक इतिहासातील प्रसिद्ध असे बॉक्सरचे बंड.

बंडखोरांनी युरोपीय व्यापारी आणि मिशनर्‍यांवर हल्ले सुरू केले. त्याला तत्कालिन चीनी राजघराण्याची देखील साथ होती. सुरुवातीला बंडखोरांनी युरोपीयांना मोठा तडाखा दिला आणि अनेक चीनी ख्रिश्चन तसेच युरोपीय त्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्यानंतर, मात्र सर्व युरोपीय एकत्र आले, त्यांच्या राष्ट्रांच्या फौजानी त्यांना साथ दिली आणि जोरदार उत्तर दिले. इंग्रज, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी, इटली आणि अमेरिका अशा पाश्चात्य जगातील सर्वांचाच यामध्ये समावेश होता. पाश्चात्य फौजांच्या ताकदीपुढे चीनी बंडखोर टिकाव धरू शकले नाहीत. दोन्ही बाजूंनी मोठा रक्तपात झाला आणि युरोपीयांचा विजय झाला. चीनवर अनेक अपमानास्पद अटी लादण्यात आल्या. युरोपियांनी स्वत:करिता आणखी सवलती पदरात पाडून घेतल्या. या युद्धातील चीनी लढवय्ये हे बहुतांश शेतकरी होती आणि मार्शल आर्ट्स किंवा चाइनिझ बॉक्सिंग जाणणारे होते. त्यामुळे या युद्धाला ’बॉक्सर’ चे बिरुद चिकटले आहे.

चीनचा असाच अपमानास्पद पराभव १८४० च्या सुमारास झालेल्या अफूच्या युद्धांमध्ये झाला होता. त्यानंतर ६० वर्षांनी झालेल्या बॉक्सर बंडाळीतही नामुष्की आली. या दोन्ही युद्धांना चीनच्या इतिहासात मोठे मह्त्व आहे आणि खरे तर त्या ठसठसणार्‍या जखमा पण आहेत. एकीकडे बॉक्सरच्या बंडाळीकडे आस्थेने बघणारा वर्ग आणि दुसरीकडे या बंडाला काही प्रमाणात कमी लेखणारा वर्ग आजही चीनमध्ये आहेच. थोडेफार आपल्याकडील १८५७ च्या उठावासारखेच. आज करोनाच्या काळात चीन विरुद्ध इतर पाश्चात्य राष्ट्रे असा उघड संघर्ष सुरू आहे. या संघर्षालाही ’बॉक्सर बंडाळी’ सारखा संदर्भ जोडण्यात येतॊ आहे. मात्र, गेल्या शतकाच्या सुरुवातीला झाला तसा अपमान यावेळी होऊ द्यायचा नाही ही खबरदारी चीनने घेणे सुरू केले आहे. आणि म्हणूनच त्याने पाश्चात्य राष्ट्रांच्या तोडीस तॊड प्रचार चालविला आहे. बॉक्सरचा हा संदर्भ देणारी अनेक विश्लेषणे सध्या जगातील माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत आणि त्यातून चीनच्या या पैलूकडे अभ्यासक अंगुलीनिर्देश करीत आहेत.

पण, या वेळी चीनची इतिहासात झाली तशी मानहानी होईल का, या बाबत सगळ्यांना शंका आहेत. करोनामुळे आजघडीला जरी चीनबाबत संपूर्ण जगभर नाराजीची भावना असली तरीही या नव्या संभाव्य महासत्तेला थेट आणि दीर्घकाल दुखावण्याची हिंमत फारशी राष्ट्रे करणार नाहीत. भारताने देखील चीनला धारेवर धरलेले नाही. कारण, सगळ्याचे मूळ हे चीनची आर्थिक आणि सामरिक सत्ता आहे. शिवाय, करोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय साहित्याची मदतही अनेक राष्ट्रांना चीनकडून मिळते आहे. एकोणविसाव्या किंवा विसाव्या शतकात होता तसा विखुरलेला, ढेपाळलेला चीन आता राहिलेला नाही. तेव्हा अपमान सहन करावा लागला, मात्र आता तॊ करणार नाही. आणि मनातील सल तर कधीही जाऊ देणार नाही. तॊ चीनी स्वभावच नाही. एकीकडे वैद्यकीय साहित्याची मदत आणि दुसर्‍या बाजूला आक्रमक प्रचार या आयुधांनी चीनने स्वत:चा ’नॅरेटिव्ह’ उभा करणे सुरू केले आहे. अमेरिका आणि युरोपची सध्याची अवस्था वाईट आहे आणि त्यामुळे भविष्यातील उगवता सूर्य पूर्वेकडेच आहे, हे ही सगळे जाणून आहेत. त्यामुळे, अगदीच दंडवत घातले नाहीत तरीही ’दुरून नमस्कार देवाला’ अशी सोयीस्कर भूमिका बहुतांश देश घेतील. चीनची बॉक्सिंग कितीही आवडत नसली तरीही !

(हा लेख महाराष्ट्र टाइम्स नागपूर आवृत्तीतून साभार पुनर्प्रकाशीत करीत आहोत.)

  • मंदार मोरोणे, नागपूर
    ७७७५०९५९८६
+3

लेखक हे महाराष्ट्र टाइम्स, नागपूरचे पत्रकार आहेत. प्रोजेक्ट मेघदूत या प्रकल्पाचा भाग म्हणून त्यांनी देशभरातील विविध प्रदेशात प्रवास केला आहे. भारतीय मॉन्सून, पावसाचे आगमन, स्थानिकांचे अंदाज, त्यांचे त्याबद्दलचे ज्ञान, साहित्य, परंपरा आणि समजुती, पावसाचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम अशा विविध पैलूंचा अभ्यास या प्रकल्पातर्गत केला जातो. याशिवाय ही विविध कारणांसाठी त्यांनी निरनिराळया प्रदेशामध्ये प्रवास केला आहे. शिक्षण, संस्कृती, वने आणि वन्यजीव, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात. दैनंदिन पत्रकारितेच्या जोडीने ते मराठी आणि इंग्रजीत ब्लॉग लेखन करीत असतात. याशिवाय विविध इंग्रजी आणि मराठी नियतकालिकांमधूनही त्यांचे लेखन प्रकाशित होत असते. मो.बा. 7775095986 mandarmoroney81@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.