पातूरच्या ऐतिहासिक लेण्या
पातूरच्या ऐतिहासिक लेण्या
सुवर्ण नगरी पातूर हे ऐतिहासिक शहर असून, प्राचिन काळापासून येथे मानवी वस्ती अस्तित्वात असल्याच्या अनेक खाणाखुणा निदर्शनास पडतात. पातूर सध्या पंचक्रोषित प्रसिद्ध आहे ते रेणुका देवीच्या मंदिरासाठी. शेकडो वर्षांपासून येथे रेणुका देवीचे ठाणे असून, हजारो लोक दर्शनाला येतात. गावाबाहेर असलेल्या महादेवाच्या मंदिराला महानुभाव सांप्रदायाचे चक्रधर स्वामींचे पदस्पर्श लाभले आहेत. हे मंदिर तेराव्या शतकापासून आहे. पातूरमध्ये शहाबाबूची प्रसिद्ध दर्गा व नानासाहेबांचे पुरातन काळातील मंदिर आहे. या मंदिरासमोर तीन खांबांची एक दीपमाळ आहे. तसेच आतमध्ये विविध शिल्प आहेत. पातूर येथे 1974 साली बोर्डीनदीच्या कोरड्या पात्रात 3427 सुवर्णमुद्रा सापडल्या होत्या. तेव्हापासून पातूरला सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाते. एक तोळा वजन असलेल्या या मुद्रा सुरत येथील टाकसाळीत बनविण्यात आल्या होत्या. फारशी भाषेत यावर प्रार्थना कोरली आहे. या मुद्रा नागपूर येथील संग्रहालयात ठेवण्यात आल्या असून, नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. येथे सापडलेली एक पार्वतीची मूतीर्ही नागपूरच्या मध्यवर्ती शासकीय वस्तूसंग्रहालयात आहे. तीन फुट उंच असलेली ही मूर्ती इसविसनाच्या चवथ्या शतकातील असावी, असा अंदाज आहे.
पातूरमधील सर्वात प्राचिन वास्तू म्हणजे लेण्या. पातूर शहराबाहेर रेणुका देवीच्या मंदिराजवळील पहाडामध्ये लेण्या कोरलेल्या आहेत. तीन गुहासारख्या कोरलेल्या या लेण्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या असे येथे सध्या असलेल्या ओट्यांवरून निदर्शनास येते. प्रमुख गुहेच्या आजूबाजुला दोन गुहा कोरल्या आहेत. आतमध्ये जाण्यासाठी दगडांच्याच पायºया आहेत. पातूर लेणी ही सातवाहन कालीन असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. इ.स. पूर्व दुसरे शतक ते इसविसनाचे तिसरे शतक अशा चारशे वर्षांच्या काळात त्या बांधण्यात आल्या आहेत. या लेण्यांचे खोदकाम वाकाटक राजा हरिषेण व त्याचा प्रधानमंत्री वराहदेव यांनी केले असावे. या लेण्यांची माहिती इ.स. 1730 मध्ये ब्रिटीश पुरातत्वज्ञ एडमंड लायन आणि राबर्ट गिल यांनी गोळा केली. या दोघांनी अहवाल प्रसिद्ध केला. तो सध्या ब्रिटीश लायब्ररी आॅॅफ लंडन येथे उपलब्ध आहे. यानंतर या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी व त्याचे पुनरावलोकन करण्यासाठी सन 1881 साली कुझेन्स हेन्री हा अभ्यासक भारतात आला. त्याने 1902 साली आपला अहवाल पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केला. यामध्ये त्याने पातूरच्या लेण्या बुद्ध लेण्या असल्याचे म्हटले आहे. पुरातत्व खात्याच्या संकेतस्थळावरही पातूरच्या लेण्या बुद्ध लेण्या असल्याचा उल्लेख आहे. भारताच्या इंडिया प्रिस्टाईन हिस्ट्री या संकेतस्थळावरही हा अहवाल बघायला मिळतो. या लेण्यांमध्ये दगडांवर कोरलेला लेख होता तसेच एक संस्कृत लेख होता. मात्र, ती कडा पडल्यामुळे हा लेख नष्ट झाल्याचा उल्लेख 1923 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात या.मा. काळे यांनी केला आहे. यावरून हा लेख यानंतरच्या काळातच नष्ट झाला असे दिसते.
पातूरच्या लेण्याबददल अनेक दंतकथाही परिसरात प्रसिद्ध आहेत. या लेण्यांचे महाभारताशी नाते जोडल्या जाते. पाराशर नावाचे एक ऋषी या लेण्यांमध्ये तपश्चर्या करीत होते. यादरम्यान कालयवन नावाच्या एका राक्षसाचा उद्रेक पृथ्वीवर वाढला होता. कालयवन राक्षसाने महादेवाची आराधना केली. त्यामुळे प्रसन्न होवून महादेवाने त्याला अमर होण्याचा वर दिला होता. त्यानंतर त्याने ऋषी- मुनी, साधू व जनतेवर अन्याय अत्याचाराने करणे सुरू केले. कालयवनमुळे त्रस्त झालेल्या सर्वांनी भगवान श्रीकृष्णाकडे धाव घेतली. श्रीकृष्णाने कालयवन राक्षसाशी युद्ध पुकारले. कालयवन राक्षसाला युद्धात पराभूत करणे शक्य नाही, याची माहिती श्रीकृष्णाला होती. श्रीकृष्णाने युद्धातून पळ काढला व पातूर येथील लेण्यांमध्ये येवून लपला. कालयवन राक्षसही पातूरच्या लेण्यांमध्ये आला. पाराशर ऋषी तपष्चर्या करीत असताना त्याने त्यांची तपश्चर्या भंग केली. त्यावर पाराशर ऋषींनी डोळे उघडताच कालयवन राक्षस भस्म झाला. या पाराशर ऋषींच्या नावावरूनच पातूर नाव पडले असे सांगण्यात येते. या लेण्या ऐतिहासिक वारसा असून, येथे एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ निर्माण होवू शकते. गावात पूर्वी चार वेषी होत्या, त्यापैकी सध्या केवळ दोनच वेषी आहेत. त्यांचीही पडझड होत आहे.
नानासाहेबांचे मंदिर
पातूर शहराबाहेर एक वाडा आहे. हा वाडा नानासाहेबांचे मंदिर म्हणून ओळखल्या जातो. या वाडयाचे बांधकाम किल्ल्यासारखेच करण्यात आले आहे. आतमध्ये एक मंदिर असून, आजूबाजूला वास्तव्यासाठी मोकळी जागा आहे. आतमधील भिंतींवर विविध शिल्प कोरले आहेत. मंदिराच्या समोरच तीन खांब असलेली दीपमाळ आहे. यामध्ये पूर्वी दिवे लावून परिसर प्रकाशमय करण्यात येत होता. तीन खांब असलेली दीपमाळ सहसा कुठे पहायला मिळत नाही. या मंदिराच्या उजव्या बाजुला एक काळया मारोतीचे मंदिर आहे.