प्रा.भा.मा.उदगावकर.

मराठी शास्त्रज्ञ लेखमाला.

0

प्रा.भा.मा.उदगावकर.

विज्ञान संशोधन, विज्ञान शिक्षण, जगात अणूयुद्ध न होता शांती नांदावी यासाठी स्थापन झालेल्या पग्वाश समितीचे सभासद असलेले प्रा.भालचंद्र माधव उदगावकर यांच्या जन्म १४ सप्टेंबर, १९२७ रोजी मुंबईत झाला. शालेय शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात झाले. पुढे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून भौतिकशात्र विषय घेऊन ते एमएस्सी झाले आणि मुंबई विद्यापीठात पहिले आले. त्यानंतर ते मुंबईत नव्याने स्थापन झालेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल सायन्स उर्फ टिआयएफआर या संस्थेत संशोधक म्हणून नोकरीस लागले. नोकरीसाठी त्यांची मुलाखत खुद्द होमी भाभा यांनी घेतली होती. प्रा.उदगावकरांनी होमी भाभांच्या आवडत्या सैद्धांतिक भौतिकशास्त्र या विषयात संशोधनाला सुरुवात केली. पदार्थ हा काही मोजक्या मूलकणांचा बनलेला असतो. इलेक्ट्रॉन, न्युट्रॉन, प्रोटॉन यासारख्या मूलकणांचे गुणधर्म, विविध मूलकणातील आंतरक्रिया, मूलकणांचे स्वरूप यावर त्यांनी काम केले. भौतिकशास्त्रातही हा विषय गहन म्हणून मानला जातो. हा अभ्यास दोन मार्गाने केला जातो. एक-प्रयोगाने तर दुसरा सैद्धांतिक पद्धतीने. प्रयोगपद्धतीने अभ्यास करायचा तर सुसज्ज प्रयोगशाळा हव्यात, पण ते खर्चिक काम असल्याने, उदगावकरांनी सैद्धांतिक पद्धतीचा मार्ग स्वीकारला. या मार्गासाठी उच्च गणित आत्मसात करता यायला हवे. या संशोधनात प्रा.उदगावकर यांनी मोलाची भर घातली. 

        नंतर ते फ्रांसला सकलेच्या येथे गेले व अणूभट्टीचे प्रशिक्षण घेतले. मुंबईत परतल्यावर त्यांनी अणूभट्टीचा एक अभ्यासगट निर्माण केला आणि या गटाकडून भाभा अणुशक्ती केंद्रातील पहिली अणूभट्टी बनवून घेतली.  अशा प्रकारचे काम चालू असताना उदगावकरांचे विज्ञान शिक्षणाकडे लक्ष होते. उदगावकर जरी नगरपालिकेच्या शाळेत शिकले होते तरी तेथील बहुसंख्य मुलांना शिक्षण अवघड जाते हे त्यांना ठाऊक होते. म्हणून १९७० सालाच्या सुमारास ते स्वतः, प्रा.यशपाल आणि प्रा.वि.गो.कुलकर्णी हे नगरपालिकेच्या शाळेत जाऊन विज्ञान शिकवू लागले. मात्र  प्रा.वि.गो.कुलकर्णी यांच्या चाणाक्ष नजरेत एक गोष्ट आली. ती अशी की, विद्यार्थी सातवीतून आठवीत जाताना ते जसे इयत्ता सातवीचे गणित, विज्ञान शिकतात तसेच ते इयत्ता सातवीचे मराठी आणि इंग्रजीही शिकतात. मात्र इयत्ता आठवीची पुस्तके लिहिणारे लेखक हे एम.ए.,पीएच.डी. झालेले असल्याने त्यांच्या तोंडातली प्रौढ भाषा पाठ्यपुस्तकात येते आणि विज्ञानाच्या पुस्तकातील मराठी समजावून घेतानाच त्यांच्या नाकीनऊ येतात आणि विज्ञान बाजूला राहाते. त्यामुळे ती पुस्तके वाचून मुलांना ३५-४० टक्के गुण मिळतात. मग प्रा.वि.गो.कुलकर्णी यांनी कल्याणच्या शाळेतील एका शिक्षकाला वर्षभराचा पगार देऊन इयत्ता सातवीच्या भाषेत इयत्ता आठवीचे पाठ्यपुस्तक लिहायला दिले व त्याच्याआधारे परीक्षा घेतल्यावर त्या मुलांना ६५-७० टक्के गुण मिळू लागले. त्यातून विज्ञानातही भाषेचे महत्त्व काय आहे हे सिद्ध झाले. मग उदगावकर यांच्या प्रेरणेने होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था सुरु झाली व त्याचे पहिले संचालक प्रा.वि.गो.कुलकर्णी झाले. या संस्थेत विज्ञान शिक्षणावर विविध प्रकारचे संशोधन चालते आणि शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी येथे अखंडपणे कार्यक्रम सुरु असतात. 

        मुंबईतील हुशार विद्यार्थ्यांना ते टिआयएफआरमध्ये बोलावून त्यांची विज्ञानात सर्वांगीण प्रगती कशी होईल या दृष्टीने तेथील प्राध्यापकांबरोबर त्यांना चर्चा करायची संधी मिळवून देत. १९६८ साली रुईयात महाविद्यालयातील असलेला एक विद्यार्थी अभय अष्टेकर याला एकदा उदगावकरांनी, ‘फेनमन्स लेक्चर्स’ हे पुस्तक देऊन त्यातील गणिते सोडवायला सांगितली. तेव्हा त्याच्या ध्यानात आले की एका गणिताचे पुस्तकात दिलेले उत्तर चुकले आहे. ते त्याने प्रा.उदगावकर यांनी दाखवले. मग उदगावकर त्याला म्हणाले, ‘तू त्या पुस्तकाचे लेखक नोबेल पुरस्कार विजेते  फेनमन यांना पत्र लिहून हे कळव. त्याने तसे केले आणि फेनमन यांनी उदार मनाने आपली चूक मान्य केली. 

        मुंबई विद्यापीठ १८५७ साली सुरु झाले पण तेथे भौतिक शास्त्राचा विभाग १९७२ सालापर्यंत नव्हता. मग प्रा.उदगावकर यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना १९५५ सालापासून विनंती केली की तुम्ही हा विभाग सुरु करा आणि तो चालवण्याची जबाबदारी टिआयएफआर घेईल. पण विद्यापीठ हे मान्य करायला तयार नव्हते. मग प्रा,उदगावकरांनी दर बुधवारी मुंबईच्या महाविद्यालयातील भौतिकीच्या प्राध्यापकांना टिआयएफआरमध्ये संध्याकाळी बोलवायला सुरुवात करून अध्यापनात त्यांना येणा-या अडचणी सोडवायला सुरुवात केली. यात अनेक प्राध्यापक येत, त्यात सिद्धार्थ महाविद्यालयातील मधू दंडवते हेही असत. 

           उदगावकर यांना १९७३ ते १९७९ या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाचे सभासद बनवल्यावर ते तेथील सभात असे मांडत की सर्व विद्यापिठांचा वेळ परीक्षा घेण्यात जात असल्याने सर्व महाविद्यालये स्वायत्त करावीत आणि त्यांना परीक्षा घेऊ द्याव्यात. त्यामुळे विद्यापीठांना संशोधनाकडे लक्ष देता येईल. १९७८ च्या बेताला प्रा.उदगावकर यांनी केलीली सूचना जवळजवळ २५ वर्षाने विद्यापीठाने मान्य केली, ही उदगावकर यांची दूरदृष्टी  होती. महाविद्यालये आणि विद्यापीठांना संशोधन करण्यासाठी पुरेसा निधी द्यावा हे ही उदगावकर आवर्जून सांगत व तसे मंजूर करून घेत. प्रा.उदगावकर भारत सरकारच्या नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षांचे विशेष सल्लागार होते. प्रा.उदगावकर यांच्या पुढाकाराने जसे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र सुरु झाले, तसेच मुंबई विद्यापीठात पश्चिम विभागीय इन्स्ट्रुमेन्टेशन विभाग सुरु झाला. एका अर्थाने प्रा.उदगावकर हे संस्था उभारणारे शास्त्रज्ञ होते. 

       प्रा.उदगावकर १९८२ ते १९९१ अशी नऊ वर्षे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. परिषदेने शालेय विद्यार्थ्यात अधिक काम करावे आणि त्यासाठी जमीन, पाणी, ऊर्जा, आरोग्य आणि विज्ञानशिक्षण हे पाच विषय घ्यावेत असे त्यांनी सुचवल्याने परिषदेच्या कार्यक्रमांना एक शिस्त आली. त्या काळात परिषदेचे मुखपत्र असल्यासारखी मराठी विज्ञान परिषद पत्रिका होती आणि ती १० रुपये वार्षिक सभासदत्त्व घेणा-यास विनामूल्य मिळे. उदगावकरांनी ही पत्रिका ४० पानाची करून त्यात विज्ञानाच्या सर्व प्रकारच्या विषयातील लेख यावेत अशी सूचना केली व १९८७ साली तसा पहिला अंक आला. त्यासाठी सभासदांकडून स्वतंत्रपणे २५ रुपये वार्षिक वर्गणी घेण्याची पद्धत सुरु झाली. आज मराठीतील हे मासिक अव्वल दर्जाचे म्हणून मानले जाते, त्याचे यश प्रा.उदगावकर यांच्या या मार्गदर्शनात आहे. 

         १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे देशाच्या सर्व भागात फिरून विज्ञान जागृती करण्याचा एक कार्यक्रम म्हणून, ‘भारत जन विज्ञान जाथा’ काढण्यात आला. त्याचे अध्यक्ष प्रा.उदगावकर होते. १९५५ साली जगात अणुयुद्ध होऊ नयेत म्हणून बर्ट्रांड रसेल यांच्या पुढाकाराने एक समिती स्थापन झाली. हिची पहिली बैठक भारतात व्हायची होती, पण तेव्हा भारत बांडुंग परिषदेत गुंतला असल्याने ही बैठक पुढच्या वर्षी घ्यावी असे ठरले. त्यामुळे ही पहिली बैठक कॅनडा येथील पग्वाश या शहरी झाली आणि या संस्थेचे नाव पग्वाश समिती असेच झाले. प्रा.उदगावकर या समितीचे १९८७ ते १९९७ अशी १० वर्षे सभासद होते. ही जागतिक संस्था होती, पण तिचे अध्यक्ष प्रा. रॉटब्लॅट हे ही संस्था जणू अमेरिकेपुरती मर्यादित आहे अशा पद्धतीने काम करीत. तेव्हा प्रा.उदगावकर त्यांच्या लक्षात आणून देत की तुम्ही आशिया आणि आफ्रिका या खंडांकडे अधिक लक्ष पुरवले पाहिजे. ते अधिक मागास आहेत. मग रॉटब्लॅट उदगावकरांनी त्यांना मदत करावी असे सांगत आणि उदगावकर त्यांची सगळी पत्रे, भाषणे, लेख दुरुस्त करून देत. १९९५ साली या संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. तो घ्यायला समिती सभासद म्हणून उदगावकर ऑस्लोला गेले होते. प्रा.उदगावकर अत्यंत प्रसिद्धी परान्मुख होते, तरीही त्याना हरि ओम पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार मिळाले. प्रा.उदगावकर यांचे निधन मुंबईत दिनांक २१ डिसेंबर, २०१४ रोजी झाले. 

 

0

लेखक हे जेष्ठ साहित्यिक असून त्यांनी जवळपास २००० लेख लिहिले असून त्यांची ८५ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विज्ञान परिषद चे कार्यवाह आहेत. मराठी विज्ञान परिषद (मविप) ही संस्था समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे कार्य करते. मोबाइल नंबर - ९९६७८४१२९६.

Leave A Reply

Your email address will not be published.