प्रा.माधवराव गाडगीळ.

मराठी शास्त्रज्ञ लेखमाला - ५

0

प्रा.माधवराव गाडगीळ.

भारतात सातत्याने होणारे भूस्खलन आणि अचानक होणारी ढगफुटी अथवा तप्त हवामान हे टाळायचे असेल तर निसर्गात ढवळाढवळ करू नका असे सातत्याने गेली ५० वर्षे सांगणारे माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म २४ मे, १९४२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय आणि बीएस्सी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. महाविद्यालयातील दुस-या वर्षाला उत्तम गुण मिळाल्यावर अभियांत्रिकीसाठीचा त्यांचा प्रवेश निश्चित होता. पण माधवरावांना जीवशास्त्रात रस असल्याने ते हट्टाने जीवशास्त्र विषय घेऊन बीएस्सीला गेले. प्राध्यापकवर्गही ‘काय हा दळभद्री मुलगा आहे’ असेच म्हणत. त्यांना जीवशास्त्राची आणि एकूणच विज्ञानाची आवड निर्माण होण्याचे कारण त्यांच्या घरी वडील, अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी सुरु केलेली विज्ञानविषयक मासिके. त्यांना लागलेल्या पक्षीनिरीक्षणाच्या छंदातून त्यांनी पक्षीतज्ञ सलीम अली यांच्याशीही पत्रव्यवहार केला होती. बीएस्सीनन्तर माधवराव मुंबईला येऊन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राणिशास्त्रात एमएस्सी करू लागले. एमएस्सीनंतर त्यांच्या मनाने आपण एखाद्या परदेशी विद्यापीठात जाऊन पीएचडी करावे असे घेतले आणि त्यासाठी त्यांनी इंग्लंडमधील हार्वर्ड विद्यापीठ निवडले. भारतीय विद्यापीठात जीवशास्त्राचा अभ्यास करणा-याला गणित घेता येत नाही आणि माधवरावांना तर गणिताची आवड होती, ती त्यांनी हार्वर्डला पुरी करून घेतली. जीवशास्त्राला लागणारी गणिती प्रारूपे ते बनवू लागले. त्याचवेळी अगदी प्राथमिक अवस्थेत असलेला संगणक ते वापरू लागले. त्याचाही उपयोग ही प्रारूपे बनवायला होऊ लागला. ज्यांना संगणक चालवता येतो अशांसाठी संगणक कंपनी आयबीएम यांनी ठेवलेली एक शिष्यवृत्ती माधवरावांना मिळाली होती.  त्यामुळे त्यावेळी ते भारतातील गणित येणारे एकमेव जीवशास्त्रज्ञ होते. हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी एवढे चांगले नाव मिळवले होते की त्यांनी तेथेच प्राध्यापकपद घ्यावे असे प्रलोभन त्यांच्यापुढे होते. पण एक-दोन वर्षे तेथे काम करून ते भारतात परतले आणि काउन्सिल ऑफ सायंटिफिकं अँड इंडस्ट्रीयल रिसर्च उर्फ सीएसआयआर यांच्या एका पाठ्यवृत्तीवर त्यांनी दोन वर्षे पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेत काम केले. या काळात त्यांनी आपले फर्ग्युसन महाविद्यालयातले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक वा.द.वर्तक यांच्याबरोबर हिंडून महाराष्ट्र पालथा घातला आणि देवरायांचा अभ्यास केला. भारतातील जुन्या मंदिरांभोवती जी प्रचंड जागा आहे, त्यात पूर्वीपासून अनेक झाडे लावली आहेत आणि ती  तोडली तर देव शिक्षा करतो अशी पूर्वापार समजूत असल्याने ही झाडे कोणी तोडली नाहीत. त्याला देवराया म्हणतात. येथे अभ्यासकांना पुरातन वृक्ष आणि दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात. या देवरायांवर प्रा.वा.द. वर्तक आणि माधवराव गाडगीळ यांनी बरेच निबंध लिहिले. आघारकर संशोधन संस्थेत त्यांनी कीड आणि शेतीतील उंदरांचा उपद्रव यावर काम करावे असे त्यांना अगोदर वाटले. पण त्यांना उंदरांवर काम करण्यात विशेष मजा वाटली नाही. लहानपणापासून त्यांना निसर्ग संरक्षण या विषयात रस होता, म्हणून त्यांनी आघारकर संशोधन संस्थेत असताना देवरायांवर काम केले.  दोन वर्षे आघारकर संशोधन संस्थेत काम केल्यावर मे, १९७३ मध्ये ते बंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेले. त्यांच्या पत्नी सुलोचनाबाई या लग्न करून त्यांच्याबरोबर हार्वर्ड येथेही होत्या आणि त्यांनी हवामानावर विशेष काम केले होते. यामुळे त्यांनाही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापकपद मिळाले. १९७२ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सेंटर फॉर थिअरॉटिकल स्टडीज या नावाचा एक गट सुरु झाला होता. त्या गटात त्यांना गणित जाणणारा जीवशास्त्रज्ञ हवा होता आणि हे पद जणू माधवरावांसाठीच होते. इतके अनायासे ते त्यांना मिळाले. या खात्यात फक्त संशोधन चाले. तेथे विद्यार्थी घेत नसल्याने अध्यापनाचे काम नव्हते. माधवरावांना परिसर विज्ञानाबद्द्ल खूप रस असल्याने निसर्गात फिरून काम करायला त्यांना परवानगी मिळाली. सतीश धवन यांना पर्यावरणात रस होता. अवकाश संशोधन केंद्राच्या केरळातील नेटपार नदीच्या पाणलोट क्षेत्राच्या प्रदेशातील एका प्रकल्पाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, यावर धवन यांनी माधवरावांकडून अहवाल मागवला होता. कायदा नव्हता तरी त्यांनी अनेक प्रकल्प उभारण्यापूर्वी पाहाणी करून घेतली होती. १९७७ साली जनता सरकारने असा कायदा केला. १९७५ साली कर्नाटकातील बंदीपूर येथे एक क्षेत्रीय केंद्र उभारून हत्ती आणि एकूण जीवसृष्टीचा अभ्यास करायचे ठरले. बंदीपूर अरण्यात वन्य प्राण्यांची एकूण संख्या किती आहे असा तो अभ्यास होता. ह्या अशा शिरगणतीचा अनुभव तेथील वन अधिका-यांनाही नव्हता. हत्तींची पाहाणी करीत असताना एकदा माधवराव व त्यांचा एक पीएचडी केलेला विद्यार्थी जंगलातून जात होते. १९८१ साली ते निलगिरी परिसरातील समृद्ध जैवविविधतेच्या जोपासनेसाठी एक आराखडा बनवीत होते. बरोबर एक स्थानिक वाटाड्याही होता. तो मोठा दुर्गम प्रदेश, कोणत्याही मनुष्यवस्तीपासून दूर असलेला, त्याची पाहाणी करून रात्री तेथेच एखाद्या शिका-याच्या कुटीत झोपून सकाळी निघावे असा त्यांचा विचार होता. तो नयनरम्य प्रदेश आपण बघावा म्हणून ते एकटेच टेकाडावर चढले आणि अचानक अंधार पडला. परतीची वाट सापडेना. मग ते एका झाडावर चढले आणि  रात्रभर तेथे बसून राहिले, कारण हत्ती तेथे इतस्तत: फिरत असतात व एखादा फटका सोंडेने मारला तर जीवाची हमी नसते. मग सकाळी रस्ता शोधत शोधत ते योग्य स्थळी पोहोचले. १९७५ ते १९७९ अशी चार वर्षे त्यांनी कारवार जिल्ह्यातील दांडेली या प्रसिद्ध बांबूच्या वनात राहून बांबूचा अभ्यास केला. त्यावेळी कारखानदारांना बांबू दीड रुपये टनाने विकला जाई व बिचा-या बुरुड लोकांना तो बाजारातून १५०० रुपये टन या भावाने घ्यावा लागे. माधवरावांना याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी सरकारच्या मागे लागून कारखानदारांचा भाव दीड रुपयावरून ६०५ रुपये करून घेतला. कर्नाटकात बेडती नावाची नदी आहे. तिच्यावर धरण बांधायचे ठरले तर त्यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतील, यासाठी नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते. पाहाणी समितीतील इतर सदस्य पाहाणी न करताच ‘हे धरण बांधावे, पर्यावरणावर काहीही गंभीर परिणाम होणार नाही’ असा अहवाल द्यायला तयार होते आणि माधवरावांना त्यावर सही करायला भाग पाडत होते. माधवराव इतर सभासदांच्या तुलनेत तरुण असल्याने ते आपले ऐकतील असे त्यांना वाटले, पण माधवराव बधले नाहीत. भारत सरकारने पर्यावरण मंत्रालय स्थापन करायचे ठरवले तेव्हा सरकारने नेमलेल्या समितीत माधवराव होते. त्यासाठी भारतातील अनेक ठिकाणाचा अभ्यास करण्याची गरज होती. जेसलमेर, गढवालमधील हिमालयाच्या रांगा, गोव्यातील मच्छिमार, होशंगाबादमधील शेतकरी हे पाहाण्यासाठी माधवराव महिनाभर फिरले व राजकीय आणि प्रशासकीय लोकांना न भेटता ते थेट गावातल्या लोकांना भेटले. १९८० साली केरळातील सायलेंट व्हॅली प्रकाल्पाच्या निमित्ताने वाद सुरु झाला. त्यासाठी डॉ.एम.जी.के.मेनन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत माधवराव होते. या प्रकल्पाला केरळ सास्त्र साहित्य परिषतेने हरकत घेतली होती. तेथे धरण व्हायचे होते. पण विरोधामुळे तो प्रकल्प रद्द झाला. 

संपूर्ण पश्चिम किनारा हा माधवरावांच्या अभ्यासाचा भाग होता. माधवराव २००४ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून निवृत्त होऊन पुण्याला येऊन स्थायिक झाले, तरीही अनेक सरकारी बिनसरकारी समित्यांवरचे त्यांचे काम चालू आहे. त्यांनी मानद प्राध्यापक म्हणून बंगलोरच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर
अॅडव्हान्स सायंटीफिक रिसर्च संस्था, अभ्यागत प्राध्यापक म्हणून कॅलिफोर्नियातील स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठ येथे काम केले. ते मराठी विज्ञान परिषदेच्या उदगीर येथे भरलेल्या अठराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांना दक्षिणा फेलोशिप, राष्ट्रीय पर्यावरण फेलोशिप, कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार, भारत सरकाचा पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, हरि ओम आश्रम पुरस्कार, विक्रम साराभाई पुरस्कार मिळाले. तरंतुला कोळी, टॉरेंट बेडूक व केसिलियंत या पाय नसलेला उभयचर प्राणी अशा तीन जातींचा शोध त्यांनी लावला आणि त्या जाती गाडगीळांच्या नावे ओळखल्या जातात. त्यांनी अनेक भाषणे दिली, लेख लिहिले. आजवर त्यांनी १० पुस्तके लिहिली असून काही इंग्रजीत तर काही मराठीत आहेत. नुकताच डॉ.माधव गाडगीळ यांना युनायटेड नेशन्स एन्व्हिरॉन्मेंट प्रोग्रॅमतर्फे ‘चॅम्पियन आॅफ द अर्थ’ हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • अ.पां.देशपांडे.
    ९९६७८४१२९६

लेखक हे जेष्ठ साहित्यिक असून त्यांनी जवळपास २००० लेख लिहिले असून त्यांची ८५ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विज्ञान परिषद चे कार्यवाह आहेत. मराठी विज्ञान परिषद (मविप) ही संस्था समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे कार्य करते. मोबाइल नंबर - ९९६७८४१२९६.

Leave A Reply

Your email address will not be published.