प्रभु श्रीरामचंद्र….. सामाजिक समरसतेचे जनक !
प्रभु श्रीरामचंद्र….. सामाजिक समरसतेचे जनक !
आज असंख्य राम भक्तांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पुर्ण होताना दिसत आहे. अयोध्या जी आपल्या रामलला ला वात्सल्याने कुशीत घेत आहे. ५०० वर्षाचा ग्रहण काळ समाप्त होऊन. सूर्य नारायण आपल्या वंशाची कीर्ती पुनश्च भारत वर्षाला येत्या २२ जानेवारीला स्मरण करून देणार आहे.
राजा राम … कुमार राम … राम लला !
चतुर्भुजी नारायण आपल्या मर्यादापुरुषोत्तम स्वरूपात साकेत पुरीत विराजमान होणार आहे… चराचर संपूर्ण विश्व उत्सवाची तयारी करीत आहे.
या प्रसंगी प्रभू रामाच्या कार्याचे स्मरण करणे अतिशय आवश्यक आहे. समरसता काय असते? आणि ती कशी रुजवावी लागते या साठीच नारायणाने रामचंद्राच्या स्वरूपात अवतार घेऊन … विश्वाचे कल्याण केले.
आज वनवासीयांची व्याख्या ‘वंचित’, ‘अशिक्षित’, ‘असंस्कृत’ आणि जंगलांना ‘अविकसित’ अशी केली जाते. प्रभु रामाच्या वेळी सर्व नागरिक समान होते, काही वनवासी होते. आणि बाकीचे नगरवासी होते. ते शिक्षा घेण्यासाठी जंगलात असलेल्या ऋषींच्या आश्रमात गेले. श्रुति-स्मृती निर्माण करणारे महान तपस्वी आणि संत हे सर्व वनवासी होते – म्हणजेच सनातन भारतातील ज्ञान, तपश्चर्या आणि अध्यात्माचे केंद्र वन होते.
राजाराम आपल्या वयक्तिक जीवनात समाजातील प्रत्येक घटकासोबत समरस होते. व्यक्ती व्यक्ती सोबत आत्मीयता आणि बंधुत्वाची नाती प्रभू रामाने जपले होते.
मग सुग्रीव असो वा मारुती दोघांना हि कुठलेही अंतर रामाने दिले नाही.
वनवासी हनुमानाला लक्ष्मणापेक्षा प्रिय म्हणत.
“सुनु कपी जिया मानसी जनी उना ।
तैं मम प्रिय लछिमन ते दूना॥”
तू लक्ष्मणा पेक्षा अधिक प्रिय आहेस. अश्या बंधुत्वाच्या भावाने प्रभू रामाने मारुतीला अनेकदा म्हटल्याचे रामायणात आढळते.
करुणानिधी प्रभू राम आईच्या वात्सल्या प्रमाणे आपल्या पेक्षा लहान, वंचित ,वनवासी, राजा असो वा रंक सर्वांनाच निष्पक्ष न्याय देत असत.
प्रभु श्रीराम यांचे संपूर्ण जीवन सामाजिक समरसतेचा अनुकरणीय मार्ग आहे. वनात जाताना श्रीरामांनी समाजातील शेवटच्या घटकातील माणसाला प्रत्येक पावलावर मिठी मारली. आपण सर्वांनी निषाद बद्दल ऐकले आहे की, प्रभू रामाने त्याला कसे आलिंगन दिले, आणि समाजाला संदेश दिला की प्रत्येक मनुष्याच्या आत एकच आत्मा असतो. ते बाहेरून वेगळे दिसत असले तरी आतून प्रत्येकजण सारखाच असतो. इथे जातीभेद नव्हता. प्रभू रामाने सध्या वंचित समाजाच्या वर्गात समाविष्ट असलेल्या केवट समाजाला सामावून घेत सामाजिक समरसतेचे अद्भुत उदाहरण मांडले आहे. सामाजिक समरसतेची भावना नष्ट करणारी आज दिसणारी वाईट गोष्ट प्राचीन काळी अस्तित्वात नव्हती. समाजात विभाजनाच्या रेषा ओढणाऱ्या स्वार्थी व्यक्तींनी भेदभावाला जन्म दिला आहे.
वनवासानंतर श्रीरामांनी पहिली रात्र केवट यांच्या घरी घालवली. केवटजी हे भोई घराण्यातील होते आणि मल्लाह म्हणून काम करत होते.
प्रभु रामचंद्र यांनी कोल, भील, बिंद, केवट, मल्ला, माझवार, कहार, कश्यप, रायकवार, बाथम, गोदिया, मच्छीमार, आदिवासी, या मूळ समाजातील प्रत्येक घटकांशी बंधुत्वाचे नाते जपले होते. समाजातील प्रत्येक भिन्न भिन्न तत्त्वाला एकात्मतेच्या धाग्यात सामावून घेण्याचे महत्त्वाचे कार्य रघुनाथाने केले.
तसेच निषाद राज आणि राम यांनी एकाच गुरुकुलात राहून शिक्षण घेतले…. याचा अर्थ असा की त्याकाळात गुरुकुल सुद्धा समरस होते. भेदभाव कुठेच नव्हता. म्हणून आजतागत वनवासी समाज प्रभु रामाची पूजा करतात.
माता कौशल्याचा जन्म आपल्या वनवासीबहुल छत्तीसगड राज्यात झाला, त्यामुळे या भागाला कौशल प्रदेश असेही म्हणतात. कौशल प्रदेशाची कन्या माता कौशल्या म्हणजे प्रभू राम हे नात्याने कौशल प्रदेशाचे भाचे होतात त्यामुळे आजही येथील घरात भाचा आणि भाचीचे येणे हे ‘अहो नशीब’ मानतात. तसेच त्यांचे पाय धुतले जातात. काही ठिकाणी पाय धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी चरणामृत (चरणामृत) मानले जाते. आणि त्याचे प्रतीकात्मक सेवन देखील केले जाते. तेथील मुळ निवासी लोकांना त्यांच्या भाच्यांबद्दल खूप आदर आहे… यावरून हे लक्षात येते की दोन परिवाराला सुद्धा रामाने अगदी पवित्र नात्याने जोडले आहे. दोन परिवारातील प्रेमाचा आणि आनंदाचा सेतू श्रीराम आहेत.
वनवासाच्या काळात प्रभू राम आपल्या वनातील प्रियजनांना भेटण्यासाठी दुरांचल गिरी लेण्यांमध्ये पोहोचले आणि धर्माचा मार्ग दाखवला. त्याच क्रमाने जशपूरच्या वनक्षेत्रात भगवान राम, बंधू लक्ष्मण आणि सीता माता यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान ते जशपूरच्या मध्यभागी असलेल्या देवगुरी मंदिराच्या प्रांगणात आले . याच ठिकाणी प्रभू रामाने आपल्याला वनवासी राम संबोधले. “मी एक राजकुमार राम नसून वनवासी राम आहे,आणि येथील लोकांचा पुत्र आहे, बंधू आहे” याची जाणीव समाजाला दिली. तेथील समस्या ही आपली समस्या समजून त्याचे निराकरण सुद्धा रामचंद्रांनी केले.
या वेळी सीता मातेने जशपूरच्या मातृशक्ती माता-भगिनींना बांबूपासून उपयुक्त साहित्य बनवायला शिकवले…. माता जानकी सुद्धा प्रभु रामा प्रमाणे प्रत्येक मागास वर्गातील लोकांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील होत्या.
विविध देशांतील स्थानिक भाषांमध्ये सापडलेल्या ग्रंथांतून आणि परदेशातही केलेल्या अनेक शोधनिबंधांतून हे सिद्ध झाले आहे की, भगवान श्रीराम १४ वर्षे वनवासी म्हणून जंगलात वास्तव्यास होते. त्यामुळे वनवासाच्या काळात वनवासींमध्ये राहून प्रभू श्रीरामही एक प्रकारे वनवासी झाले होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तसेच, जंगलात राहणारे समुदाय नैसर्गिकरित्या त्यांना त्यांच्याशी संबंधित मानत होते आणि भगवान श्री राम त्यांच्यासाठी देवासारखे बनले होते आणि त्यांच्यात एक प्रकारे वसले होते.
अनेक वनवासी समाजांनी स्वतःचे रामायण रचले आहे. तसे पाहता, रामायणाकडे स्वतःच्या दृष्टीकोनातून पाहणारे गोंडी रामायण, हजारो वर्षांपासून गोंडी आणि पांडवनी जंगलात राहणार्या आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. “डांगी रामायण” गुजरातच्या आदिवासींमध्ये प्रचलित आहे आणि “भालोडी रामायण” तेथील भिल्लांमध्ये प्रचलित आहे. याशिवाय, हृदयस्पर्शी लोकगीतांवर आधारित लोक रामायण देखील गुजरातमधील रामकथेची पवित्र परंपरा प्रतिबिंबित करते.
यावरून प्रभुराम वनवासी, वंचित समाजाशी किती समरस होते,आपण बघू शकतो. भगवान रामाचे रामायण या १४ वर्षाच्या वनवासा विना अपूर्ण आहे.
प्रभु राम खरोखर सामाजिक समरसतेचे जनकच आहेत हे आपल्याला रामायणातील अनेक श्लोकांमधून दिसून येत
मांसाहारी गिद्धराज जटायू , ज्याने माता सीतेचे रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला, जो वर्तमानात एक निकृष्ट पक्षी आहे, त्याची देखभाल श्री राम करतात आणि पितृत्वाच्या भावनेने त्यांचे अंतिम संस्कार करतात. यावरून हेच लक्षात येते की श्रीरामासाठी फक्त कर्म महत्त्वाची आहेत, बाकीचे जन्मापासून मिळालेल्या सर्व गोष्टी निरर्थक आहे.
भिल्ल समाजातील माता शाबरीचे निमंत्रण स्वीकारून प्रभु रामाने उष्टे बोर खाल्ले, वनवासी हनुमानाला आलिंगन देऊन आणि निषादराजांबद्दल प्रेम व्यक्त करून, भगवान रामाने शहरी आणि ग्रामीण भागातील भेद दूर केला. उच्च-नीच जाती इत्यादींकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एक उत्तम भारत घडवण्यासाठी समाजासाठी अर्पण केले. त्यामुळे प्रभू रामाचे गुण आत्मसात केल्याशिवाय नव्या भारताची निर्मिती शक्य नाही.
रामायण फक्त एक धार्मिक ग्रंथ नसून ते एक सामाजिक समरसता वाढविण्याचे उत्तम साधन सुद्धा आहे.
प्रभु रामचंद्र भारतातील सामाजिक समरसतेचे जनक आहेत.
आपण सर्वांनी रामाचे आदर्श मनात ठेवून संपुर्ण समाजातील भेदभाव दूर करून आत्मीयता वाढवावी. आज पुनश्च राम राज्याचा श्रीगणेशा होत आहे. प्रभु रामाने जसे प्रत्येक वर्गातील ,जातीतील व्यक्तीला आपल्या जवळ करून एकात्मतेचा संदेश दिला. त्याच प्रमाणे अखिल हिंदुसमाज हा एक आहे. यात कोणी पतित नाहीत, वंचित नाहीत, मागास नाहीत. सर्व एक आहेत याची जाणीव ठेवून. त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ,अध्यात्मिक उन्नती करणे हेच आपले ध्येय समजून या ईश्वरी कार्यात सर्वांनी सहभाग व्हावे.
एक आदर्श समरस समाज घडविण्याची शक्ती प्रभू राम सर्वांना देवो हेच मागणे ……..
जय श्री राम !
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:॥
संदर्भ – रामचरितमानस
– नामरामायण