प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली. या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्जपुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुणांकरिता ही योजना उपयुक्त आहे.आर्थिक पार्श्वभूमी चांगली नसल्यामुळे एखादा लहान उद्योग / व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी त्यांना काही अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या हेतूने केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना सुरु केली. हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योजक बनण्याचा राजमार्गच आहे.
या योजनेमार्फत बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. या योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी खालील तीन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.
- शिशु गट : रु.10,000 ते 50,000
- किशोर गट : रु. 50,000 ते 5 लक्ष
- तरुण गट : रु. 5 लक्ष ते 10 लक्ष
- या योजनेंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादींमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे.
- यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इत्यादी लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्ज देण्याची तरतूद आहे.
- कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे राहील.
मुद्रा बँक योजना ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे माहिती होण्यासाठी आणि या योजनेचा लाभ गरजू आणि होतकरु व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्तींना व्हावा या हेतूने राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर समिती नेमून या समितीमार्फत योजनेचा प्रचार, प्रसार आणि समन्वय करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
समितीची रचना
- जिल्हाधिकारी- अध्यक्ष
- जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक- सदस्य
- अशासकीय सदस्य- सदस्य
- अशासकीय सदस्य- सदस्य
- अशासकीय सदस्य- सदस्य
- अशासकीय सदस्य- सदस्य
- विशेष निमंत्रित- सदस्य
- जिल्हा उद्योग अधिकारी- सदस्य
- उपसंचालक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था- सदस्य
- सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता- सदस्य
- जिल्हा माहिती अधिकारी- सदस्य सचिव
समितीची कार्यपद्धती
- या समितीची बैठक महिन्यातून एकदा जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षते खाली होईल.
- ही समिती मुद्रा बँक योजनेबाबत केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी शासनास सादर करेल.
- जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत जिल्ह्यातील बँकांच्या प्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेऊन या योजनेंतर्गत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करुन देईल.
- ही समिती कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाप्रमाणे लक्ष्यपूर्तीसाठी संनियंत्रण करेल आणि संबंधित यंत्रणांबरोबर समन्वय साधेल.
- उद्योजक होण्याची आशा बाळगणाऱ्या तरुणांचे आणि व्यावसायिकांचे मेळावे, कार्यशाळा, प्रशिक्षण, चर्चासत्रे आयोजित केले जातील. त्यामध्ये निरनिराळ्या क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आणि तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात येईल.
- तरुण उद्योजकांना माहिती, मार्गदर्शन आणि तांत्रिक सल्ला देऊन त्यांच्या कौशल्य विकासामध्ये भर घालण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातील, जेणेकरुन व्यवसाय उभारणीमध्ये त्यांना धाडस आणि कर्तृत्व दाखविण्यास अधिक वाव मिळेल.
- कोणत्याही सार्वजनिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला याविषयी जेथे शक्य आहे, अशा ठिकाणी एखादी छोटी फिल्म आणि जाहिरात दाखवून त्यातून लोकांचे शिक्षण व प्रबोधन केले जाईल.
- निरनिराळ्या बँका आणि इतर पतपुरवठा संस्थांच्या व्यवसाय सहायक यांच्या बैठका घेऊन त्यांना गाव व दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
- दूरदर्शन, वृत्तपत्रे, रेडिओ, छोट्या चित्रफिती, लघुपट, हस्तपुस्तिका, मासिके, माहितीपत्रके, जाहिरात फलक, एसटी तसेच खाजगी बसेस, रेल्वे याद्वारे मुद्रा योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
- शासनाच्या विविध वेबसाईट, सोशल मिडीया यावरदेखील या महत्वपूर्ण योजनेची/निर्णयाची माहिती अपलोड केली जाईल. त्यामध्ये लेख, जाहिराती, लघुपट, व्हिडीओ फिल्म्स यांचा समावेश असेल.
या योजनेच्या प्रसिद्धीसाठी आणि लोकांना आवाहन करण्याच्या दृष्टीने खाजगी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, खाजगी उद्योजक, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योजकांच्या संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेण्यात येईल. चिकाटीने आणि मेहनतीने स्वत:च्या पायावर उद्योग व्यवसाय उभारलेल्या व्यक्ती व संस्था यांच्या यशकथा तयार केल्या जातील व त्या यशकथांना विशेष प्रसिद्धी देण्यात येईल.
संकलित –