प्रमाण
प्रमाण
खूप दिवसांपासून याबाबत लिहायचे हाेते. पण वेळ मिळत नव्हता अन् अंगभूत आळसं लिहू देत नव्हता. पण आज ठरविले आळस सुध्दा प्रमाणामध्ये असावा. तर काय म्हणत हाेते मी ? प्रमाण . .. प्रमाणाचं नातं आपलं पुर्वीपासूनच आणि आता बाईचा जन्म म्हणजे सगळे प्रमाणातच हवे. चला डाेसा करू म्हटले तरी दाेन वाट्या तांदूळ अन् एक वाटी उडदाची डाळ. साधा चहा जरी करावा म्हटलं तरी एक चमचा चहा दाेन चमचे साखर सगळं प्रमाणातच. हाे ना. पटतय् ना? पटणारचं कारण लिहिणारी आपल्यापैकीच एक आहे म्हटल्यावर ते चटकन पटतं. हाे ना ?
तर हे प्रमाण काेणी ठरवायचं हाे.? अरे, जे मला याेग्य प्रमाणात वाटेल ते कदाचित दुस-याला चुकीचे वाटेल. कसे म्हणून काय विचारता? आता मला आठ तास झाेप म्हणजे प्रमाणात वाटते तर जे पाच तासच झाेपतात त्यांना मी कुंभकर्ण वाटेल.
फार पुर्वीचा किस्सा आहे. माझ्या मैत्रीणीला पहायला एक मुलगा आला. त्याला विचारलं, ड्रिंक घेताेस का ? तर ताे म्हणाला कधीतरी प्रमाणामध्ये. आता पडला ना प्रश्न राव! त्याचा कधीतरी म्हणजे महिन्यातून एकदा की आठवड्यातून तीनदा. तर हे प्रमाण काेणी ठरवावे? प्रमाणामध्ये सारे काही असावे असे म्हणतात. पण ते प्रमाण मात्र सांगत नाही.
काय मजा आहे नाही! जी मुलगी मला गाेरी वाटते ती दुसरीला पांढरी पाल वाटते. जी मला शांत वाटते ती दुसरीला घुमी वाटते. जाे मला तडफदार वाटताे ताे दुसरी ला आक्रमक वाटताे. जाे मला कामसू वाटताे ताे दुसरीला बैल वाटताे. जी मला मनमाेकळी बाेलणारी वाटते ती दुसरीला वटवट करणारी वाटते. पुन्हा हे कसं ठरवायचं याच प्रमाणं काही केल्या सापडत नाही.
अरे ,माझ्या मते तरी हे प्रमाण वगैरे काही नाही. अस जगणं म्हणजे फारचं मुळमुळीतं वाटतं. आता राधेने कृष्णावर प्रमाणामध्ये प्रेम केले असते तर ती कृष्णासाेबत अमर झाली असती का? मीरेने विषाचा प्याला आेंठाना लावला असता का ? नाही कधीच नाही. दशरथाने प्रमाणात प्रेम केले असते तर पुत्र प्रेमाने व्याकुळ हाेऊन त्यांचा अंत झाला नसता. अरे वा-यालाही लाजवेल असा वेग अाणि तळपत्या तलवारीचा बाजीराव निर्माणचं झाला नसता . आकंठ देशभक्तीने सर्वस्व अर्पण करणारे भगतसिंग , सुखदेव या भूमीत झाले असते का? दिवसरात्र मेहनत करून संशाेधन करणारे संशाेधक, उर फुटेस्तव सराव करणारे खेळाडू,गायक,चित्रकार निर्माण झालेच नसते.
तर जीवनातं प्रमाण हे नसतंच. सब झूठ है. हे काही गणित नाही चार अधिक चार आठ. बराेबर ना.? अरे पाच अधिक तीन देखील आठच हाेतात ना. तर मला वाटतं हे प्रमाण नकाेच. का त्याचा अट्टाहास? बघा पटलं तर आणि कळवा प्रतिक्रिया प्रमाणामध्ये . शेवटी हे प्रमाणं देखील ज्याचं त्याने ठरवावं. बराेबर ना?. आता हे ही तुम्हाला शंभर टक्के पटणार. कारण प्रमाणात लिहीलं आहे. म्हणजे माझ्या. तर प्रमाण मानून घ्या.
मनीषा किन्हीकर उपासनी.