प्रोफेसर ज्येष्ठराज बी.जोशी.

मराठी शास्त्रज्ञ लेखमाला - १

0

प्रोफेसर ज्येष्ठराज बी. जोशी.

होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॅालॅाजी, मुंबई या दोन्ही ठिकाणी एमिरेटस प्रोफेसर असलेल्या प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी यांचा जन्म २८ मे १९४९ रोजी सातारा जिल्ह्यातील मसूर येथे झाला. मसूरला प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्याचे माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयाची पहिली दोन वर्षे कराडला झाली. त्यानंतर ते मुंबईला माटूंगा येथे असलेल्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे रसायन अभियांत्रिकेचे शिक्षण घेण्यासाठी आले आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी रसायन अभियंता म्हणून पदवी मिळवली तर १९७७ साली मुंबई विद्यापीठातून रसायन अभियांत्रिकीमध्ये डॅाक्टरेटची पदवी मिळवली. १९७२ साली ते रसायन अभियंता झाल्यावर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे ते शिक्षक म्हणून रुजू  झाले. १९७२ ते २००९ अशा ३७ वर्षाच्या काळात ते बढती मिळवत मिळवत १९९९ ते २००९ ह्या काळात युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे संचालक झाले. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून शिकून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले स्वत:चे कारखाने काढले. उदा. मुकेश अंबानी (रिलायंस इंडस्ट्री), किशोर मारीवाला (इटर्नीज फाईन केमिकल्स), अश्विन दाणी (एशियन पेंटस), केकी घारडा (घारडा केमिकल्स) इत्यादी. ज्यांनी स्वत:चे उद्योग काढले नाहीत ते अशा प्रकारच्या कारखान्यात काम करून उच्च पदाला पोहोचले. अशा सर्वांना ज्या ज्या वेळी उद्योगधंद्यात तांत्रिक अडचणी येतात, तेव्हा ते युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधील प्राध्यापकांना बोलावून आपल्या अडचणी सोडवून घेतात. प्रा.जे.बी.जोशी अनेक उद्योगांना सल्ले देतात. त्यांच्याकडून सल्ला घेणारे लोक गेली ३०-३०/४०-४० वर्षे त्यांच्याकडे येत आहेत. इतका त्यांचा प्रा.जोशींवर भरवसा आहे.         प्रा. जोशी ह्यांनी विज्ञान संशोधन क्षेत्राला मोलाचे योगदान दिले आहे. बहुप्रावस्था अपस्करण आणि जटिल किंवा गुंतागुंतीच्या भूमितीसाठी कॅाम्प्युटेशनल फ्लूईड डायनॅमिक्सची संहिता त्यांनी विकसित केली. द्रायूगतीच्या भौतिकशास्राच्या उत्तम घटकांचा ह्यात समावेश आहे. प्रवाह / तापमान / संघनन इत्यादींच्या तपशीलवार मोजमापांतून बहुप्रावस्था प्रवाहाचे परिमाण ठरवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. ह्या दोन पायऱ्यांचा गणिती साधनांबरोबर वापर करुन अनेक रासायनिक प्रक्रियांमधे आढळणाऱ्या संक्षोभाचे वैशिष्ट्य ठरवण्याचे कामही त्यांनी केले आहे. प्रवाह नमुने आणि बहुप्रावस्था रिॲक्टरची रचना ह्यातील संबंध त्यांनी शोधून काढले आहेत. सिध्दांत, प्रतिकृती, प्रयोग आणि अंतर्दृष्टी ह्या सर्वांच्या एकत्रित उपयोगातून तर्कशुध्द रचना, जास्त क्षमता आणि व्यावसायिक आकाराच्या अनेक बहुप्रावस्थ रिॲक्टर (कमी भांडवलआणि चालवण्यासाठीचा खर्च कमी) उभारणीसाठी त्यांनी भारतात आणि जगात अनेक ठिकाणी मदत केली आहे.
शिवाय हे रिॲक्टर्स केवळ रसायन उद्योगातीलच नसून आण्विक रिॲक्टरर्सवरही त्यांनी काम केले आहे. प्रा.जोशी ह्यांनी नायट्रोजन ॲाक्साईडचे पाण्यामधे, अल्कधर्मी, आम्लधर्मी द्रावणात होणाऱ्या शोषणासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या बहुप्रावस्थ प्रक्रियांचे विश्लेषण केले आहे. प्रो जोशी ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर समाजातील अनेक समस्यांचे निराकरण केले आणि हे करत असताना त्यांनी गरिबांचे दरडोई उत्पन्नही वाढवले. समाजात विज्ञान जागृती वाढवणे आणि वैज्ञानिक मानसिकता तयार करण्यात प्रो जोशी ह्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तरुण पिढीत संशोधनाबद्दल उत्साह निर्माण करण्यासाठी प्रो जोशी ह्यांनी आत्ता पर्यंत २०० कार्यशाळा आयोजित केल्या असून, प्रत्येक वर्षी साधारण १,००,००० जण ह्या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. प्रा.जोशी यांनी सतत चालणारा कूकर तयार करून तो प्रकाश आमटे यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरीला दिला. त्यात दर तासाला ७५० लोकांना पुरेशी खिचडी बनते. या कुकरमध्ये एका बाजूने डाळ, तांदूळ, फोडणी घातली की दुस-या बाजूने खिचडी मिळते. त्यांचे दुसरे संशोधन म्हणजे शेतात निर्माण होणारा काडी-कचरा जाळून टाकण्याऐवजी त्यापासून बनवलेले बायोचार खत वापरून त्यांनी सातारा-सांगली भागात सोयाबिनचे उत्पादन २५ ते ३० टक्के वाढवून दाखवले. तिसरे उदाहरण म्हणजे सांगली भागात द्राक्षे उन्हात वाळवून मनुका-बेदाणे बनवतात. पण जर उन्हाचा ताव जास्त असेल अथवा आकाशात मळभ असेल तर बेदाण्यावर काळे डाग पडतात आणि अशा बेदाण्यांना २०० रुपये प्रती किलोऐवजी २० रुपयाचाच भाव मिळतो. या आपत्तीतून सुटका करण्यासाठी प्रा.जोशी यांनी बनवलेल्या संयंत्रात १५ दिवसाऐवजी २ दिवसात बिनडागाचे बेदाणे बनतात. आता एकावेळी २.५ टन बेदाणे बनतील असे हे संयंत्र तयार झाले आहे. त्यांचे चौथे काम म्हणजे भारताच्या सैन्याला लागणारी चिलखते परदेशाहून आयात करावी लागत. त्याची किंमत प्रत्येकी दीड-दीड लाख रुपये पडे आणि वजन प्रत्येकी १३ किलो असे. त्यांनी बीएआरसीच्या मदतीने कार्बन नॅनो ट्यूब पदार्थ तयार करून घेऊन त्यापासून बनवलेले चिलखत १५००० रुपयाला मिळू लागले व वजन फक्त ६ किलो झाले. त्याची तपासणी त्यांनी सरकारी प्रयोगशाळांकडून करवून घेतली. हे समजल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे लोकसभेत अभिनंदन करून एक लाख चिलखतांची ऑर्डर दिली. त्याची उपयुक्तता पाहिल्यावर त्यांनी आणखी दोन लाखांची ऑर्डर देऊन ती परदेशी विकली. ही सगळी कामे प्रा.जोशी त्यांच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे काम म्हणून त्यांच्याकडून करवून घेतात. १९९९ ते २००९ ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॅालॅाजीच्या संचालक पदाची धुरा प्रो जोशी ह्यांनी अत्यंत यशस्वी आणि समर्थपणे सांभाळली. आपल्या कार्यकाळादरम्यान संस्थेला स्वायत्त विद्यापीठ संस्था आणि नंतर स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्याची अवघड कामगिरीही त्यांनी पार पाडली. प्रो जोशी ह्यांच्या कार्यकाळात सर्व शैक्षणिक निर्देशांक दुपटीने उंचावले. (आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिध्द होणारे शोधनिबंध, दरवर्षी ह्या शोधनिबंधाचा झालेला उल्लेख किंवा घेतलेला आधार, दरवर्षी डॅाक्टरेटसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी इत्यादी). ह्या सगळ्यांमुळे जगातील पहिल्या दहा क्रमांकात संस्थेची गणना होऊ लागली. बाहेरुन मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ होण्यास प्रो. जोशी कारणीभूत ठरले. संशोधन करार, प्रकल्पांचे सल्लागार म्हणून कार्य आणि देणग्या इत्यादींमधून मिळणार्‍या उत्पन्नाची चक्रवाढीने २५% वाढ दरवर्षी झाली. २००९ साली तर हे उत्पन्न सरकारी अनुदानाच्या दहापट होते. हे गुणोत्तर राज्य सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या संस्थांमधे सगळ्यात जास्त असावे. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून त्यांचे ६०० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिध्द झाले असून २५००० वेळा त्यांच्या शोधनिबंधांचा आधार घेतला गेला. त्यांनी ११५ विद्यार्थ्यांना डॅाक्टरेटसाठी तर ६० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि २० विद्यार्थ्यांना डॅाक्टरेट नंतरच्या संशोधनासाठी मार्गदर्शन केले आहे. आपल्या कार्यकाळात प्रो. जोशींना अनेक पारितोषिके आणि सन्मान मिळाले. अभियांत्रिकी विज्ञानासाठीचे शांतिस्वरुप भटनागर पारितोषिक, इंडियन ॲकेडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी आणि वर्ल्ड ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे मानद सदस्यत्व, यु एस् नॅशनल ॲकॅडेमी ऑफ इंजिनियरिंगचे आंतरराष्ट्रीय सदस्य इत्यादी महत्वाच्या सन्मानांचा आणि पारितोषिकांचा त्यात समावेश आहे. प्रो जोशी ह्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहे. जून, २०२४ पासून प्रा.जोशी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॅालॅाजीचे कुलपती झाले असून त्यांना २०० कोटी रुपयांची बांधकामे तेथे करून घ्यायची आहेत. त्यासाठी त्यांनी ५० कोटी रुपये जमवले सुद्धा आणि त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॅालॅाजीला आयआयटीसारखा सेन्ट्रल युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी या वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी वेगाने कामाला सुरुवात केली आहे. गेली दहा वर्षे प्रा.जोशी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष असून तेथे त्यांनी विज्ञान एकांकिका स्पर्धा, उत्तम संशोधन करणा-या महाविद्यालयातील एक प्राध्यापकाला आणि विद्यापीठात उत्तम संशोधन करणा-या एका प्राध्यापकाला आपले गुरु प्रा.एम.एम.शर्मा यांच्या नावे एकेक लाख रुपयांची पारितोषिके ठेवली आहेत. मराठी विज्ञान परिषदेत पीएचडी करणारे विद्यार्थी असून आतापर्यंत ६ विद्यार्थ्यांनी पीएचडी मिळवली आहे. असे अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी सुरु केले आहेत.

-अ.पां.देशपांडे
संपर्क – ९९६७८४१२९६

लेखक हे जेष्ठ साहित्यिक असून त्यांनी जवळपास २००० लेख लिहिले असून त्यांची ८५ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विज्ञान परिषद चे कार्यवाह आहेत. मराठी विज्ञान परिषद (मविप) ही संस्था समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे कार्य करते. मोबाइल नंबर - ९९६७८४१२९६.

Leave A Reply

Your email address will not be published.