प्रा. वि.ग.भिडे.

0

घनस्थिती भौतिकी आणि सौर ऊर्जा या क्षेत्रात आयुष्यभर काम करणा-या प्रा.विष्णु  गणेश भिडे यांचा जन्म ४ ऑगस्ट, १९२५ रोजी नागपूरला झाला. त्यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथेच झाले. नागपूर
विद्यापीठाची भौतिक शास्त्रातील एम.एससी. ही पदवी त्यांनी प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने मिळवली. त्यावेळी त्यांना अनेक शिष्यवृत्या आणि बक्षिसे मिळाली. त्यानंतर ते लगेच नागपूरच्या इन्स्टिट्यूटऑफ सायन्समध्ये  भौतिक शास्त्राचे व्याख्याते म्हणून रुजू  झाले. 'इलेक्ट्रिकल डिश्चार्जेस' या विषयावर त्यांनी लिहिलेल्या प्रबंधास नागपूर विद्यापीठाने त्यांना १९५३ साली डॉक्टरेट दिली. नंतर ते काही काळासाठी लंडनला गेले आणि सॉलिड स्टेट फिजिक्समध्ये त्यांनी अभ्यास केला.  'ऑप्टिकल अँड इंटर फेरोमेट्रिक स्टडीज ऑफ सम आस्पेक्टस ऑफ क्रिस्टल ग्रोथ' या विषयावर त्यांनी लिहिलेल्या प्रबंधास त्यांना १९५६ मध्ये लंडन विद्यापीठाने डॉक्टरेट दिली. त्यानंतर ते मुंबईला आले आणि इन्स्टिट्यूटऑफ सायन्समध्ये ते प्रथम प्राध्यापक म्हणून व नंतर विभागप्रमुख म्हणून काम करू लागले. त्यावेळी त्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये मॉसबॉअर स्पेक्ट्रोस्कोपीचे संशोधन सुरु केले. ह्या विषयाचे भारतातील ते पहिले संशोधन होते. 

१९७३ ते १९७५ ही दोन वर्षे ते भारत सरकारचे विज्ञान विषयक सल्लागार होते. १९७५ साली ते भारत सरकारच्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च उर्फ सीएसआयआरच्या नॅशनल फिजिकल
लॅबोरेटरीत उपसंचालक या पदावर काम करू लागले. घनस्थिती भौतिकीच्या क्रिस्टल ग्रोथ,फेरो इलेक्ट्रिसिटी, फेरो मॅग्नेटिझम,लिक्विड क्रिस्टल,मॉसबॉअर आणि एक्स रे स्पेक्ट्रोस्कोपी या विषयात त्यांनी संशोधन केले. नवनवीन पदार्थ शोधण्यात ते गर्क असत. त्यात ते टिटॅनियमही शोधत असत. नेहमीपेक्षा वेगळे असे ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत ते शोधू लागले. सौर ऊर्जेचा भारतातील खेड्यांच्या विकासासाठी कसा उपयोग करून घेता येईल यावर त्यांनी संशोधन केले. दिल्लीची नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी सोडून प्रा.वि.ग.भिडे १९८२ साली पुणे विद्यापीठात आले आणि ‘स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज’ या विभागात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने प्रायोजित केलेल्या प्राध्यापकपदी अध्यापन आणि संशोधन करू लागले. एखाद्या शिक्षकाला तो जो विषय शिकवणार असतो, तो जर त्याला पूर्णपणे समजला असेल तर त्याचे शिकवणे विद्यार्थ्यांन समजायला सोपे जाते उलट ज्या शिक्षकाला विषय समजलेला नसतो, तो पाठ्यपुस्तकातले वाचून दाखवतो आणि विद्यार्थी गोंधळात पडतात. प्रा.वि.ग.भिडे यांना भौतिक शास्त्र पूर्णपणे समजले असल्याने त्यांच्या शिकवण्यावर विद्यार्थी खूष असत. ते त्यांचा तास कधीही चुकवत नसत. प्रा.वि.ग.भिड्यांनी एखादा प्रकल्प स्वीकारला की ते त्यात जीव ओतून काम करीत आणि एकदा ते जीव ओतून काम करीत आहेत हे पाहिल्यावर त्या गटातील त्यांचे विद्यार्थीही तसेच मन:पूर्वक काम करीत. पण प्रा.भिडे त्यांना वा-यावर सोडून देत नसत. एका प्रकल्पात ओळीने अनेक दिवस २४-२४ तास काम करायचे होते आणि दर १०-१० तासांनी प्रयोगातील निरीक्षणे नोंदवायची होती. प्रा.भिडे यांचे पुणे विद्यापीठातील निवासस्थान विभागाच्या समोरच होते. या प्रकल्पाच्या वेळी ते मध्यरात्री उठून आपल्या पत्नीसमवेत विभागात जात आणि विद्यार्थी-विद्यार्थीनींची दखल घेत. बरोबर जाताना त्यांच्यासाठी घरी बनवलेला एखादा पदार्थ आणि थर्मॉसमध्ये चहा घेऊन जात. प्रयोग रात्री-अपरात्री संपणार असेल तर प्रयोगानंतर विद्यार्थ्यांची झोपण्याची सोय आपल्या घरी करीत. हा आपलेपणा त्यांचा त्यांच्या विद्यार्थ्यांप्रती होता. १९८४ ते १९८८ या काळासाठी त्यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली. त्यानंतर ते आंतरविद्यापीठ आणि भारत सरकारचा अणुसंशोधन आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष झाले. प्रा.वि.ग.भिडे यांनी आपले सर्व प्रकारचे संशोधन अनेक लेख राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केले. त्यावर बरीच पुस्तके लिहिली. त्यांनी शंभराहून अधिक संशोधन निबंध लिहिले आणि ५० विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले. इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, अमेरिका, झेकोस्लोव्हाकिया. रशिया, इस्रायल, जपान इत्यादी प्रगत देशांनी त्यांना सन्मानाने बोलावून घेऊन त्यांच्या
ज्ञानाचा फायदा घेतला आहे. विज्ञान संशोधनाबरोबरच भारतात दिल्या जाणा-या विज्ञान शिक्षणात त्यांना रस होता. ते भौतिकी अभ्यास गटाचे अध्यक्ष असल्याने त्यांना नॅशनल काउन्सिल ऑफ एज्यूकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग उर्फ एनसीइआरटीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके बनवायला सांगितली. ते इंडियन नॅशनल सायन्स ॲकेडेमीचे फेलो होते, इंडियन ॲकेडेमी ऑफ सायन्सचे फेलो, नॅशनल ॲकेडेमी ऑफ सायन्सेस, इंडियाचे फेलो, महाराष्ट्र ॲकेडेमी ऑफ सायन्सेसचे फेलो, इंडियन क्रायोजेनिक्स काउन्सिल आणि रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकलसोसायटीचे फेलो होते. इंडियन फिजिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष होते आणि बंगलोरमध्ये १९७१ साली भरलेल्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष होते. कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक संस्थांचे ते पदाधिकारी होते. सौर ऊर्जेसंबंधीच्या एका राष्ट्रीय समितीचे ते कार्याध्यक्ष होते. त्या अधिकारात त्यांनी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनला भेट दिली होती. यू.एन.इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटऑर्गनायझेशन या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. ते ‘इंटर नॅशनल कमिशन ऑन द ॲप्लिकेशन ऑन मॉसबार इफेक्ट’ या गटाच्या सल्लागार मंडळावर होते. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेच्या आशिया खंडाच्या गटाचे ते अध्यक्ष होते. ‘प्रमाण’ या विज्ञानाच्या संशोधन पत्रिकेच्या संपादक मंडळावर ते होते, इंडियन नॅशनल सायन्स ॲकेडेमीच्या (इन्सा) इतिवृत्त समितीवर त्यांनी काम केले, फिजिक्स एज्यूकेशन जर्नलच्या संपादक मंडळावर ते होते. १९७१ ते १९७४ या काळात ते इन्साचे सचिव होते आणि १९८१ ते १९८४ या काळात ते इन्साचे कोषाध्यक्ष होते. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर फिरून बालविज्ञान चळवळ सुरु केली. पुण्यात त्यांनी ‘एक्सप्लोरेटरी’ नावाची संस्था सुरु करून त्यात शालेय विद्यार्थ्यांना मुक्तपणे विज्ञानाचे प्रयोग करायची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. ही गोष्ट सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना एवढी आवडली की त्यांनी वि.ग.भिडे यांच्या या कार्यासाठी भरघोस देणगी दिली. २००० साली पुणे विद्यापीठात इंडियन सायन्स कॉंग्रेस भरली होती. त्याला समांतर अशी त्यांनी जयंत नारळीकरांच्या आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी चिल्ड्रेन सायन्स कॉंग्रेस भरवली होती. प्रा.वि.ग. भिडे यांना भारत सरकारने १९९२ साली पद्मश्री किताबत दिली होती. त्याशिवाय त्यांना डॉ.सी.व्ही.रामन आणि मेघनाथ साहा पुरस्कार मिळाले होते. अनेक संस्थात त्यांनी महत्त्वाची भाषणे दिली आहेत. १९७४ साली मराठी विज्ञान परिषदेने त्यांचा नवव्या मराठी विज्ञान अधिवेशनात सन्मान केला होता तर मराठी विज्ञान परिषदेच्या वडोदरा येथे भरलेल्या १९७९ सालच्या चौदाव्या वार्षिक अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. प्रा.वि.ग.भिडे उतारवयात पुणे सोडून नागपूर या त्यांच्या जन्मगावी गेले आणि तेथेच २५ जून, २००६ रोजी त्यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. 

0

लेखक हे जेष्ठ साहित्यिक असून त्यांनी जवळपास २००० लेख लिहिले असून त्यांची ८५ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विज्ञान परिषद चे कार्यवाह आहेत. मराठी विज्ञान परिषद (मविप) ही संस्था समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे कार्य करते. मोबाइल नंबर - ९९६७८४१२९६.

Leave A Reply

Your email address will not be published.