रहस्य- पद्मनाभास्वामी मंदिर.
रहस्य ( पद्मनाभास्वामी मंदिर )
विष्णूच्या १०८ मंदिरानपेकी एक असलेल्या महत्वाच्या अश्या पद्मनाभास्वामी मंदिराचा उल्लेख ६ व्या शतकापासून इतिहासात आढळतो. १६ व्या शतकात ह्या मंदीराच पुन्हा निर्माण केल्याची नोंद आहे. पद्मनाभा ह्याचा अर्थ “ज्याच्या नाभीतून कमळ प्रकट होते” ह्यावर आधारित अशी विष्णू ची प्रचंड अशी मूर्ती ह्या मंदिरात आहे. ह्या मंदिराची देखरेख करण्याची जबाबदारी त्रावणकोर इथल्या राजाच्या कुटुंबाकडे आहे. १७२९ ह्या मंदिराच्या ट्रस्ट ची स्थापना झाल्यावर ह्या मंदिराची सर्व जबाबदारी ह्या कुटुंबांचे वंशज बघत आले आहेत.
२०११ मद्धे सुंदर राजन ह्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका टाकली होती कि त्रावणकोर येथील राजाचे कुटुंब ह्या मंदिराची योग्य देखभाल करत नाहीत. सुप्रीम कोर्टाने ह्यावर ७ मेंबर असलेल्या टीम ला ह्या मंदिराची पहाणी करून तिथल्या गोष्टींची नोंद करण्याची सूचना केली. त्यानुसार झालेल्या पाहणीत जी रहस्य समोर आली त्याने ह्या मंदिराच नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचल. ह्या पाहणीत त्यांना ६ असे लॉकर किंवा खण मिळाले ज्याचे दरवाजे लोखंडाचे होते. ज्यात कोणतीही लॉक नव्हत किंवा उघडण्याची काही जागा. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाखाली जेव्हा हे लॉकर उघडले गेले तेव्हा जे रहस्य समोर आल ते अवाक करणार होत. ह्या लॉकर मध्ये होते सोने, चांदी, हिरे, पाचू, माणिक, अनेक रत्ने ह्यांचा खजिना. ह्या खजिन्याची नोंद जेव्हा करण्यात आली तेव्हा त्यांची नुसती किंमत होती १.२ लाख कोटी भारतीय रुपये किंवा २२ बिलियन अमेरिकन डॉलर. ह्यात ह्या खजिन्याच ऐतिहासिक मूल्य लक्षात घेतल आणि जगात अभावाने मिळणाऱ्या रत्नांचा समावेश केला तर हि किंमत अजून कैक पट वाढणारी आहे.
ह्या लॉकर ना इंग्रजी A ते इंग्रजी F अशी नाव देण्यात आली. पण ह्यातील B नाव असलेला लॉकर आजही उघडण्यात आलेला नाही. ह्या लॉकर मद्धे अस काय आहे कि ज्यामुळे आजही ह्याच्या आत जाण्याची कोणाची हिंमत झालेली नाही. हा रहस्यमयी लॉकर आजही आपल्यासोबत अनेक गोष्टी आत दडपून आहे. ह्या लॉकर च्या बाहेर दोन प्रचंड अश्या मोठ्या कोब्रा नागांच चित्र कोरलेल असून हा लॉकर तीन गेट नी सुरक्षित केलेला आहे. पहिल्या गेट धातू च्या जाळ्यांचा असून तो बाकीच्या लॉकरच्या दरवाज्या सारखा आहे. तो उघडल्यावर अजून एक दरवाजा असून तो लाकडी आहे. त्यातून आत गेल्यावर जो तिसरा दरवाजा आहे तो पूर्ण धातूचा असून त्याला उघडण्याची कोणतीच रचना तिकडे अस्तित्वात नाही. अस म्हंटल जाते कि हा दरवाजा फक्त एकाच पद्धतीने उघडला जाऊ शकतो तो म्हणजे “गरुड मंत्र” चा जप एखाद्या सिद्ध पुरुषाने केल्यास ध्वनी तंत्रज्ञानावर हा दरवाजा उघडेल अशी मान्यता आहे. विज्ञान आणि तंत्राज्ञानाचा उपयोग करून हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यास ह्या मंदिरावर, देशावर आणि पूर्ण जगावर संकट कोसळेल अशी लोक भावना आहे. त्यामुळे ह्या लॉकर च्या मागे काय आहे? हे आजही रहस्य आहे.
सध्या तरी असा सिद्धहस्त साधू किंवा पुरुष आणि गरुड मंत्राची पूर्ण कल्पना असलेला कोणी अस्तित्वात नाही. त्यामुळेच लोकभावनेचा आदर करून सुप्रीम कोर्टाने आजही लॉकर बी न उघडण्याचा निर्णय राखून ठेवला आहे. ह्या लॉकर बी च्या मागे दरवाज्यावर असलेल्या दोन महाकाय कोब्रा प्रमाणे आत सापांच राज्य असेल व दरवाजा उघडताच ते सर्व बाहेर निघतील अस अनेकांना वाटते. पण ह्या लॉकर च बांधकाम लक्षात घेता इतके वर्ष ह्या सापांना हवा, पाणी, खाण कुठून मिळत असेल हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. तसेच अनेकांना अस हि वाटते कि ह्यात आत भुयार असून त्यातून ये जा करता येत असेल. हे भुयार शहरापासून लांब कुठे उघडत असेल. पण आजची लोकसंख्या आणि मनुष्य वावर लक्षात घेता हे हि अशक्य वाटते.
लॉकर बी हि एक ट्रिक सुद्धा असेल अस अनेकांना वाटते. लोकांना भय दाखवून आपल्या खजिन्याची रक्षा करण्याचा एक मार्ग हा असू शकेल. मिळालेल्या कागदपत्रांच्या नोंदीनुसार १८८० मध्ये त्रावणकोर राजाच्या वंशजांनी आपल्या खजिन्याची मोजमाप केली होती तेव्हा लॉकर बी मधल्या खजिन्याची किंमत त्याकाळी जवळपास १२,००० कोटी (१.८ बिलियन अमेरिकन डॉलर ) इतकी प्रचंड केली होती. लॉकर बी सगळ्या लॉकर पेक्षा आकाराने मोठ असल्याने १८८० सालची किंमत लक्षात घेऊन सोन्याचे वाढलेले भाव आणि तिकडे असलेल्या जवाहीर, रत्न ह्याचं मूल्य लक्षात घेता लॉकर बी मध्ये असलेल्या खजिन्याची आजमितीला किंमत होते ५० ट्रिलीयन भारतीय रुपये ( ५०,०००,०००,०००,००० भारतीय रुपये अथवा ७७० बिलियन अमेरिकन डॉलर ) ह्यात त्याच ऐतिहासिक मूल्य लक्षात घेतलेलं नाही. म्हणजे ते जर लक्षात घेतल तर अजून किती तरी पट ह्या खजिन्याची किंमत जाईल.
लॉकर बी च्या आतल्या दरवाजाच्या मध्ये सोन्याची भिंत ते साप अस काही असण्याच्या शक्यता आज मांडल्या जातात. लॉकर बी न उघडता सुद्धा उरलेल्या लॉकर मध्ये मिळालेला खजिना हा आजतागायत मिळालेला जगातील सर्वात मोठा असा खजिना मानला जातो. त्यात सोन्याच्या विष्णू मूर्तीची नुसती किंमत ७० मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. तर १८ फुट लांब असलेल्या हिरांच्या हाराची किंमत कित्येक मिलियन डॉलर मद्धे आहे. २०११ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून केलेल्या पाहणीत मिळालेल्या खजिन्याने ह्या मंदिराला जगातील सगळ्यात श्रीमंत मंदिराच स्थान मिळवून दिल आहे. पण आजही त्याच्या लॉकर बी मधल रहस्य जगासमोर यायचं बाकी आहे.
ता. क. :- खालील दरवाज्याची फोटो इमेज हि इम्याजीन करून केलेली आहे. तंतोतंत दरवाजा असा नाही अथवा कसा आहे हे शाश्वत सांगता येत नाही. कारण खूप कमी लोकांना इकडे जाण्यास मुभा आहे.