राक्षसभुवन ची लढाई…
राक्षस भुवन लढाई. –
थोरले माधवराव पेशवे यांना छत्रपतींकडून सन १७६१ साली पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. त्यांनी ११ वर्ष ४ महिने पेशवाईचा कारभार केला. थोरले माधवराव पेशव्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक अंतर्गत व बाह्य संकटांना तोंड दिले. नानासाहेब पेशवे स्वर्गवासी झाल्यावर मराठी राज्याचा भार रघुनाथराव दादा यांच्या खांद्यावर आला. मराठी राज्याचा उत्कर्ष व शौर्याची उज्वल परंपरा राखण्याची जबाबदारी रघुनाथराव दादावर येऊन पडली. रघुनाथराव दादा कर्तबगार होते मात्र पेशवेपदाची महत्त्वकांक्षा त्यांनी मनी बाळगली होती. याच महत्वकांक्षेमुळे राघोबादादा आणि थोरले माधवराव पेशवे यांच्यामध्ये सत्ता संघर्षही निर्माण झाला होता.
थोरले माधवराव पेशवे व रघुनाथराव मतभेद:
रघुनाथराव दादा आणि थोरले माधवराव पेशवे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाल्यामुळे हैदराबादच्या निजामाने व म्हैसूरच्या हैदर अलीने संधि शोधली. पेशवे दरबारातील दुहीची माहिती निजामास समजल्याने निजाम प्रचंड मोठी फौज घेऊन पुण्यावर चालून आला. उरुळी, पाटस येथे निजामाने प्रचंड जाळपोळ लुटालुट केली. तेव्हा मराठ्यांनी निजामाला गराडा घालून सर्व बाजूने जर्जर करून सोडले. निजामाचा शेवट होणार होता. मात्र रघुनाथराव दादासाहेबांनी निजामास सवलती देऊन तह केला. त्यामुळे रघुनाथराव आणि थोरले माधवराव पेशवे असे दोन गट पेशवाई मध्ये पडले.
मराठ्यांमध्ये फुट:
थोरले माधवराव पेशवे आणि रघुनाथराव दादासाहेब या दोन गटांमध्ये घोडनदी व इतर ठिकाणी काही लढाया झाला. या उलथापालथीमुळे अनेक मराठा सरदारांमध्ये असंतोष निर्माण झाला. दादासाहेबांच्या वागणुकीमुळे नाराज झालेले अनेक सरदार निजामास जाऊन मिळाले. निजामाने या सरदारांना आपल्या राज्यात जहागिरी व इनामे देऊन त्यांचा सन्मान केला. आपली शक्ति वाढल्याचे समजून पुन्हा एकदा निजाम पुण्याच्या रोखाने चालून आला. निजामाने पुणे जाळले. सातारा छत्रपतींच्या गादीपासून खंडणी वसूल केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून रघुनाथराव दादासाहेबांनी निजामाचे भागानगर येथे धडक दिली व भागानगर जाळले.
मल्हारराव होळकरांची मध्यस्ती:
सन १७६३ च्या सुरुवातीला बहुतेक सर्व मराठा सरदार निजामास जाऊन मिळाले होते. निजामाचे पारडे जड झाले होते. त्यामुळे निजामाकडे पायदळ, तोफखाना प्रचंड मोठ्या प्रमाणात जमा झाला. त्याची ताकद खूपच वाढली. त्यामुळे निजामाशी समोरासमोर युद्ध करणे ठीक नाही हे पुणे दरबाराने ओळखले. गनिमी कावा करून निजामाचा पुरता समाचार घेण्याचे ठरले. यावेळी मल्हारराव होळकर यांनी मराठशाहीमध्ये पडलेली फुट भरून काढण्याचे काम केले. निजामाचे यश हे आपल्या फुटीवर अवलंबून आहे हे मराठा सरदारांना समजावून सांगितले. मल्हारराव होळकरांनी जानोजी भोसले, भगवानराव प्रतिनिधी, पिराजी नाईक निंबाळकर, घारगुडे यासह अनेक सरदारांना समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या. त्यांना पुन्हा मराठा साम्राज्याच्या सेवेसाठी रुजू करून घेतले. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रयत्नामुळे निजामास जाऊन मिळालेल्या अनेक सरदार पुन्हा माघारी आले. निजामाचे सैन्य पुन्हा एकदा मराठी मुलुखावर चालून आले होते. यावेळी निजामास मिळालेले सरदार पुन्हा मराठेशाहीस मिळाल्याने मराठा सरदार एकत्र झाले. त्यांनी निजामाचा बिमोड करण्याचे ठरविले. मराठे निजामावर चालून जाऊन निजामास जशास तसे उत्तर द्यायचे नियोजन करीत होते.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने मराठा आणि निजाम आपापल्या छावणीच्या विस्तारास लागले. दि. ५ ऑगस्ट १७६३ नंतर मराठ्यांच्या फौजा बीड परिसरात दाखल झाल्या. तर निजाम शहागड जवळून गंगा पार करणार होता. यावेळी गोदावरीला प्रचंड पाणी असल्याने त्याला हा विचार प्रत्यक्ष उतरवण्यात अडचण येऊ लागली. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी मराठ्यांच्या फौजा माजलगाव परिसरात मुक्कामास होत्या. त्यांना निजामाचे मुख्य लष्कर राक्षसभुवन येथे असल्याचे समजले आणि त्यांनी राक्षसभूवनाकडे आगेकूच केली. दि. १० ऑगस्ट रोजी मराठ्यांची संयुक्त फौज राक्षसभुवन येथे दाखल होऊन निजामाच्या समोर उभी ठाकली.
प्रत्यक्ष लढाईस सुरुवात:
निजाम गोदावरीच्या पैलतीरावर तर अलीकडे निजामाचे वरकड कुलसरदार होते. दि. १० ऑगस्ट १७६३ रोजी मराठ्यांनी राक्षसभूवनाच्या भूमीवर ‘हर हर महादेव’ गर्जना करून निजाम सैन्यावर तलवारी उपसल्या. मराठ्यांची आघाडी पुरंदरे आणि हुजूर पागेचे सरदार सांभाळत होते. सुरुवातीला मराठ्यांच्या आघाडीवर निजाम फौजेने जोरदार तोफांचा मारा सुरू केला. तोफांचा मारा करीत असतानाच निजामाच्या लष्करातील दारूखान्यास आग लागली. त्यामुळे निजाम फौजेत काहीसा गोंधळ माजला. या गोंधळाचा फायदा पुरंदरे आणि विंचूरकर यांनी घेऊन निजाम फौजेवर त्वेषाने हल्ला चढविला. निजामाची आघाडीची फौज उधळून लावून निजाम फौजेमध्ये मराठ्यांनी प्रवेश मिळविला. निजामाची आघाडीची फळी तुटल्याने रघुनाथराव दादासाहेब सैन्य घेऊन निजाम फौजेमध्ये घुसले. त्यांनी मोठ्या निकराने युद्ध मांडले. शत्रूंची लांडगेतोड सुरू केली. रघुनाथराव दादासाहेबांच्या माऱ्याने मराठ्यांचे पारडे जड झाले. लढाईचा कल मराठ्यांच्या बाजूने झुकू लागला. मात्र लढाईची खमखुमी असणारा निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर याने आपल्या फौजेतील काही निवडक लोकांना सोबत घेतले. निवडक लोकांना सोबत घेऊन पुरंदरे आणि विंचूरकर यांच्यावर निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर चालून गेला. निजाम फौजेत घुसलेल्या विंचुरकर आणि पुरंदरेला विठ्ठल सुंदरने पाठीमागे रेटले.
पुरंदरे आणि विंचुरकर पाठीमागे हटल्याने निजामाच्या सैन्याच्या मध्यभागी रघुनाथराव दादासाहेब अडकले. सर्व बाजूंनी निजाम सैन्य रघुनाथराव दादासाहेबांवर तुटून पडले. निजामाच्या प्रखर हल्ल्यामुळे दादासाहेब शत्रूच्या हाती लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली. याचवेळी मल्हारराव होळकर यांनी रघुनाथराव दादासाहेबांच्या मदतीला आपली ताज्या दमाची फौज पाठवली. शत्रूच्या मध्यभागी अडकलेल्या रघुनाथरावास त्यांनी सोडवून आणले. यानंतर पेशवे ,मल्हारराव होळकर आणि इतर सैन्यांनी गटागटाने निजामाच्या फौजेवर एकाच वेळेस हल्ला केला.
निजाम सेनापती विठ्ठल सुंदरचे मुंडके मारले:
मराठा फौज सर्व बाजूने निजामाच्या फौजेवर चालून गेली. मराठ्याच्या प्रखर आक्रमणांने निजाम सैन्य घाईला आले. दोन्ही बाजूने प्रचंड रणधुमाळी माजली. मराठी सरदार महादजी शितोळे यांनी विठ्ठल सुंदरची अंबारी मारली. अंबारी मारून शितोळे परत आले. होळकराच्या फौजेने विठ्ठल सुंदरच्या फौजेवर प्रचंड मारा केला. होळकराच्या माऱ्यापुढे विठ्ठल सुंदरच्या फौजेची दाणादान उडाली. होळकरांच्या फौजेने विठ्ठल सुंदरचे शीर कापून पेशव्यांच्या पायाशी सादर केले. सेनापति गेल्याची बातमी कळताच निजाम फौजेने धूम ठोकली. काहींनी पुर आलेल्या गोदावरी मध्ये उड्या टाकल्या. काही नदी पार करून पैलतीरावर असणाऱ्या निजामाच्या आश्रयाला गेले. काही गंगेच्या पाण्यात वाहून गेले. निजामाचा प्रचंड पराभव झाला. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे हे विठ्ठल सुंदरच्या अंबारीत बसून जवळच असणाऱ्या धोंडराई येथे मुक्कामास गेले. लढाईमध्ये पराक्रम गाजवलेल्या अनेक सरदारांचा पेशव्यांनी सन्मान केला.
तह:
कालांतराने सप्टेंबर १७६३ मध्ये पेशवे आणि निजाम यांच्यामध्ये तह झाला. तहानुसार एक कोटी रुपयाचा मुलुख निजामाने पेशव्यांना दिला. बीडच्या मातीमध्ये, गोदावरीच्या काठावर , शनिदेवाच्या साक्षीने मराठ्यांनी निजामाला पळता भुई थोडी केली. बीडच्या मातीने पराक्रमी मराठ्यांना प्रचंड मोठा विजय बहाल केला. मराठ्यांचा कायमचा शत्रू निजामाला पुन्हा एकदा मराठ्यांनी झुकवायला लावले. सर्व मराठे एकत्र आल्याने निजामाच्या विरोधात सहज विजय मिळाला. मराठ्यांना एकीच्या बळाचे फळ विजयाच्या रूपाने मिळाले. मराठ्यांच्या विजयाने राक्षसभुवनची माती पवित्र झाली…
फोटो गुगल
माहिती संकलित.