संत नामदेव महाराज.

0

संत नामदेव महाराज.

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील थोर संत नामदेव महाराजांचे गाव म्हणजेच नरसी नामदेव, जिल्हा हिंगोली येथे.

(नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराजांचे भव्य मंदिर.)

 

संत नामदेव महाराजांची पांडुरंग भक्ती ही जगतविख्यात आहे. ज्यांनी वयाच्या नऊव्या वर्षापासूनच विठ्ठल विठ्ठल म्हणणे सुरू केले होते असे म्हणतात.

 

 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांनी सोबत केलेल्या प्रवासात पांडुरंगाचे अनेक चमत्कार व दृष्टांत पाहायला मिळतात.

नामदेवांच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक कथा, प्रसंग फार आहेत.

वारकरी संप्रदायमध्ये अभंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंवा असं म्हणू शकतो की वारकरी संप्रदायाला अभंगानेच बांधून ठेवला आहे. त्या अभंग छंदाची निर्मिती संत नामदेवांनी केली आहे. नामदेवांनी आपल्या भारत भ्रमणात महाराष्ट्रा बाहेरील असंख्य संतांना एकत्र केले.

संत कबीर, संत नानक, संत मीराबाई, संत रोहिदास, संत तुलसीदास , अशा अनेक संतांनी संत नामदेवांना आपल्या गुरुस्थानी ठेवलं.

अनेक हिंदी संतांच्या भाषेवर आणि साहित्यावर संत नामदेवांच्या साहित्याचा प्रभाव दिसतो.

सुमारे 750 वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्र, पंजाब प्रांतासह देशात बरेच ठिकाणी फिरून जनमानसात पांडुरंग भक्ती, भागवत भक्ती रुजवली.

 राजस्थानमध्ये तर संत नामदेवांची जवळपास सातशे मंदिर आहेत , गुजरात, पंजाब,मध्य प्रदेश, दिल्ली या ठिकाणी सुद्धा संत नामदेवांची मंदिर आहेत.

 असं मानलं जातं की हा त्यांचा प्रवास सुमारे दोन हजार किलोमीटरचा होता.

 संत नामदेव महाराज विरचित सुमारे 61 पद गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आहेत.

 महाराष्ट्रातील संत नामदेव हेच पंजाब मध्ये भगत नामदेव या नावाने ओळखल्या जातात.

संत नामदेव महाराजांची पांडुरंग भक्ती एवढी अलौकिक होती की, जेव्हा संत नामदेवांनी पांडुरंगाकडे साकडं घातलं की , हे केशवा, माधवा पांडुरंगा आता मला तुझा विरह सहन होत नाही तर मला वैकुंठाला यायचं आहे. आणि तुझ्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या, संतांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकांवार पडली पाहिजे अशी इच्छा प्रकट केली. एवढी नम्रता संत नामदेवांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तेव्हा साक्षात पांडुरंगाने नामदेवांना असे म्हटले की, मी तुला मंदिराच्या महाद्वाराजवळ जागा देतो आणि तिथे फार मोठा खड्डा निर्माण झाला.

त्या खड्ड्यात संत नामदेव महाराजांनी स्वतःच समर्पण केलं आणि आश्चर्य म्हणजे समर्पण करणारे फक्त संत नामदेव महाराजच नव्हते तर त्यांच्या घरातील जवळपास 14 सदस्यांनी त्यामध्ये समर्पण केले. त्यामध्ये त्यांचे आई-वडील,पत्नी, चार मुलं , नारायण, गोविंद, महादेव, विठ्ठल, तीन सुना, बहीण आणि त्यांची शिष्या जनाबाई सुद्धा होती.आणि असं मानलं जातं की त्या मार्गाने ते वैकुंठाकडे गेले.पं ढरपूरच्या पांडुरंग मंदिरातील त्या जागेला आज नामदेव पायरी म्हणून ओळखले जातो.

नामदेवांचे दोन समाधी स्थान मानले जातात हा ही एक चमत्कारच म्हणावा लागेल, एक पंढरपूर आणि दुसरे पंजाब येथे. दोन्हीही ठिकाणी त्या वेळी भक्तांनी नामदेवांना समाधी मध्ये पाहिलं असं म्हणतात.

 शिंपीयाच्या कुळी,

 जन्म माझा झाला,

 परी जीव रंगला,

 सदाशिवी..

पांडुरंगाचे निस्सीम भक्त, संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांना साष्टांग नमस्कार करूया..

-नितीन राजवैद्य.

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.