मराठी शास्त्रज्ञात श्री.प्रभाकर देवधरांसारख्या उद्योगपतींचे नाव घ्यायचे कारण ते नुसते उद्योगपती नव्हते तर ते संशोधक उद्योगपती होते. त्यांच्या ४० वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी संशोधन करून ६४० वस्तू बनवल्या आणि देशी परदेशी विकल्या. अशा प्रभाकर शंकर देवधर यांचा जन्म २५ सप्टेंबर, १९३४ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या प्रख्यात नूतन मराठी विद्यालयात झाले. महाविद्यालयाची दोन वर्षे फर्ग्युसन महाविद्यालयात केल्यावर त्यांनी पुण्याच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून टेलिकम्यूनिकेशन या विषयात बी.ई. केले. त्यांचे वडील पुण्यात दंत वैद्यकीचा व्यवसाय करीत. ते कवळ्यासुद्धा घरी बनवत. त्यामुळे घरात सर्व प्रकारची हत्यारे उपलब्ध होती. ती हाताळायची सवय देवधरांना शाळेच्या वयापासून लागली. आपली वह्या-पुस्तके ठेवत असलेल्या कपाटातील हवी ती वही अथवा पुस्तक दिसण्यासाठी कपाटाचा दरवाजा उघडताच दिवा लागून वही दिसेल अशी व्यवस्था त्यांनी स्वत:च्या हाताने बनवली होती. इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षी टेलिकम्यूनिकेशन विषय शिकवणा-या अय्या नावाच्या प्राध्यापकांनी टेबलावर ट्रँझिस्टर आणून ठेवला आणि तो सुरु करून हा माणूस मुंबईहून बोलतोय आणि तुम्ही त्याला पुण्यात ऐकत आहात. ते कसे तेच आपण इथून पुढे शिकणार आहोत म्हणून मुलांच्यात एक कुतूहल निर्माण केले.
बी.ई.झाल्यावर देवधरांनी दिल्ली आकाशवाणीत दोन वर्षे नोकरी केली पण त्यात त्यांना विशेष रस वाटला नाही आणि मग ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेच्या मेडिकल इन्स्ट्रुमेन्टेशन विभागात काम करू लागले. हे काम त्यांना आवडले आणि तेथे ते ५-६ वर्षे होते. तेथे आपल्याला नवीन काहीतरी करायला जमते हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केली तो ‘ॲपलॅब इंडस्ट्री’ या नावाने. हळूहळू ज्या दादरच्या भागात त्यांनी कामाला सुरुवात केली तेथून ते ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये गेले आणि भव्य जागेत कारखाना सुरु केला. दादरच्या जागेत असताना तेथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेने त्यांना १९६८ साली एटीएम मशीन बनवायाची ऑर्डर दिली. ते मशीन त्यांनी बनवून दिले. त्यात त्यांनी ज्याच्या नावाने ते कार्ड असेल त्या व्यक्तीचा पैसे काढताना फोटो निघेल, तो राखून ठेवला जाईल आणि ते कार्ड घेऊन जर दुसरी व्यक्ती पैसे काढायला येईल तर त्याला पेसे मिळणार नाहीत अशी सोय करून दिली होती.
मग पुढे त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल मोजून देण्याचे उपकरण बनवून दिले. बॅंकेत गेल्यावर सभासदाचे पासबुक खिडकीवर भरून घेण्यात जाणारा वेळ वाचवण्यासाठी बॅंकेला पासबुक भरून घेण्याचे यंत्र बनवून दिले. पासबुकाची पाने संपल्यावर सभासदाला परत बॅंकेत जाऊन नवीन पासबुक घ्यावे लागते. हे वाचवण्यासाठी ‘या यंत्रात को-या पासबुकांची चळत ठेवून पहिले पासबुक संपल्यावर दुसरे कोरे पासबुक आपोआप पुढे येऊन भरून मिळेल का?’ असे मी देवधरांना एकदा विचारल्यावर ते म्हणाले, ‘त्या बॅंकेला विचारू देत, मी ते करून देईन. त्यात अवघड काही नाही. एटीएम यंत्रात पैशाची चळत असतेच की नाही, तशी को-या पासबुकांची चळत ठेवता येईलच की.’ देवधरांनी शाळा-महाविद्यालयांच्या प्रयोगशाळांना लागणारी अनेक उपकरणे बनवली आणि ती चीन धरून अनेक परदेशांना विकली. इंग्लंड हा देश त्यांची खूप उपकरणे विकत घेणा-यांपैकी एक होता आणि आहेही. महाविद्यालयांच्या प्रयोगशाळात लागणारे कॅथोड-रे-ऑसिलेटर, ह्रिओस्टॅट अशी कित्येक उपकरणे त्यांनी बनवली. ही उपकरणे इतकी भक्कम असतात की त्यांना १५-१५/२०-२० वर्षे काहीही देखभाल करावी लागत नाही. मी आणि श्री.देवधर एकदा सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात गेलो असता, तेथील प्राध्यापकांशी चर्चा झाली आणि जेव्हा त्यांना ॲपलॅब इंडस्ट्रीचे मालक आले आहेत हे समजले तेव्हा ते त्यांच्याशी आदराने तर बोलत होतेच, पण त्यांनी सांगितले की तुमच्या उपकरणांची अजिबात देखभाल करावी लागत नाही की मोडतोड होत नाही.’ देवधर स्वत: या उद्योगाचे मालक असतानाही मुळातले इंजिनिअर असल्याने ते आपल्या ऑफिसात बसणारे मालक नव्हते, तर नवीन वस्तू बनवताना ते स्वत: कामगारात मिसळून काम करीत. कामगारांनी काही चांगल्या सूचना केल्या तर ते त्या स्वीकारीत. यामुळे ते आणि कामगार हा संबंध मालक आणि कामगार असा न राहता एक सौहार्दाचे वातावरण तयार झाले होते. कामगारांच्या अडचणी काय आहेत हे ही त्यांना समजत असे. कामगारांचा पगार १५-२० तारखेच्या सुमारास संपत असे, मग ते ॲडव्हान्स मागण्यासाठी त्यांच्या त्यांच्या खातेप्रमुखाकडे जात, त्याने ते मंजूर केल्यावर तो अर्ज लेखा विभागाकडे जाई. यात त्या कामगाराला दोन-चार खेपा माराव्या लागत. या अडचणी ओळखून देवधरांनी त्यांच्या कारखान्यात एक एटीएम यंत्र बसवले होते. त्यावर लिहिले होते, ‘तुम्ही तुमचा पगार केव्हाही घेऊ शकता.’ त्यातून काढलेल्या पैशाची नोंद लेखा विभागाकडे परस्पर जात असे आणि १ तारखेला त्याला मिळणा-या पगारातून तेवढी रक्कम वजा होत असे. यात अर्ज भरणे, तो एका खात्याकडून दुस-या खात्याकडे जाणे, दोन-चार वेळा खेपा मारणे तर वाचलेच पण कामगाराला हात पसरायला लागण्याची नामुष्कीही टाळली. त्याला एक सन्मान प्राप्त झाला. या अनेक कारणाने त्यांचे आणि कामगारांचे संबंध मधुर राहिले आणि त्यामुळे त्यांच्या कारखान्यात युनियन तर नव्हतीच पण त्यांच्या ४० वर्षाच्या कारकीर्दीत एकदाही संप झाला नाही.
१९७५ च्या सुमारास राजीव गांधी एअर इंडियात पायलट असताना त्यांनी न्यूयॉर्क-मुंबई ट्रीप केली की त्यांना एक दिवस मुंबईत सुट्टी मिळे. त्यांना इलेक्ट्रॉनिक्समध्ये रस असल्याने ते मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारामध्ये फिरत. तेव्हा ते मनुभाई शहा यांच्या दुकानात जाऊन नवनवीन वस्तू पहात आणि त्यांना प्रश्न विचारीत. राजीव गांधींच्या प्रश्नांची उत्तरे मनुभाईंना देता येत नसत. मग एक दिवस ते त्यांना म्हणाले की ‘इलेक्ट्रॉनिक्समधील तज्ञ प्रभाकर देवधर म्हणून आहेत आणि त्यांचा कारखाना ठाण्याला आहे. तुम्ही त्यांना भेटा.’ मग राजीव गांधी देवधरांकडे आले आणि त्यांची गट्टी जुळली. ते मुंबईतल्या प्रत्येक ट्रीपमध्ये देवधरांकडे जाऊ लागले, एकत्र जेवू-खाऊ लागले, रस्त्यावर उभे राहून आईसक्रिम खाऊ लागले. त्यांना पंतप्रधानांचा मुलगा म्हणून काहीही पोलीस बंदोबस्त नको असायचा.
पुढे संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाल्यावर इंदिरा गांधींनी राजीवना एअर इंडियातून राजीनामा द्यायला सांगून आपला खाजगी पत्रव्यवहार पाहायाला सांगितले. पण त्यातील तंत्रविषयक पत्रे राजीवना समजत नसत. मग ते देवधरांना म्हणाले, ‘तुम्ही ठाणे सोडा आणि दिल्लीत येऊन राहा व मला मदत करा.’ देवधर म्हणाले, ठाणे सोडणे मला जमायचे नाही, पण मी दर शनिवार-रविवारी येऊन तुम्हाला मदत करेन.’ असेच एकदा ते तीनमूर्ती भवनमधील एका दालनात राजीव यांच्याबरोबर पत्रे पाहात असताना तेथून इंदिरा गांधी जात होत्या. त्यांना पाहून राजीव इंदिराबाईंना म्हणाले, ‘मम्मी तुझ्या इलेक्ट्रॉनिक्स धोरणावर प्रभू (प्रभाकर देवधर) टीका करीत आहेत.’ तेव्हा इंदिरा गांधी तेथे थांबल्या व काय टीका आहे ती मला ऐकवा’ म्हणाल्या. त्यावर देवधर म्हणाले, ‘तुम्हाला एक तास वेळ असेल तेव्हा सांगा, मी समजावून सांगेन.’ त्यावर इंदिराबाईंनी तेथील एक टीपॉय ओढले, त्यावर त्या बसल्या आणि म्हणाल्या, ‘मला आत्ता वेळ आहे, सांगा.’ देवधर म्हणाले, ‘अमुक एक करा, त्यामुळे आपली इलेक्ट्रॉनिक्स मालाची निर्यात आत्ता आहे त्याच्या पाचपट होईल.’ हे ऐकल्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘हे तुम्ही माला लिहून पाठवा.’ मंत्र्यांचे बोलणे मनावर घ्यायचे नसते म्हणून देवधरांनी महिनाभर काही केले नाही आणि एक दिवस इंदिरा गांधींचे सचिव गोपी अरोरा यांचा देवधरांना फोन आला की, ‘तुम्ही मॅडमना काही देतो म्हणाला होता, त्या त्याची वाट पाहात आहेत.’ मग देवधरांनी धोरण लिहून पाठवले आणि ते इंदिरा गांधींनी १९८४ सालात मंजूर करून घेतले. देवधर म्हणाले, त्याप्रमाणे १९८९ साली इलेक्ट्रॉनिक्स मालाची निर्यात पाचपट झाली पण, दुर्दैवाने ते पाहायला इंदिरा गांधी हयात नव्हत्या.
राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देवधरांना इलेक्ट्रॉनिक्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून बोलावले. देवधर एक रुपया पगारावर तेथे गेले आणि त्या काळात ॲपलॅब इंडस्ट्रीने सरकारला एकाही वस्तूचा पुरवठा करायचा नाही असे धोरण ठरवून दिले. देवधरांना एकदा मी विचारले होते की ‘तुमच्या कंपनीचा वार्षिक व्यवहार २०० कोटी आहे, तो १००० कोटी का झाला नाही?’त्यावर ते म्हणाले, ‘माझी एक वस्तू तयार होऊन बाजारात खपू लागली की ती वस्तू बनवण्यासाठी ३-४ कारखाने काढून अधिक नफा मिळवण्यात मला रस नव्हता. मी दुस-या वस्तूच्या निर्मितीकडे वळत असे. दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला की, ‘तुम्ही राजीव गांधी यांच्या इतक्या जवळचे होता तर तुम्हाला एका ही पद्मपुरस्कार कसा मिळाला नाही? त्यावर ते म्हणाले, ‘मी तो मागायला हवा ना? आणि तो मिळाल्याने काय होते हो?’ इतके ते निरीच्छ होते.
देवधर मराठी विज्ञान परिषदेचे २००० ते २०१४ अशी चौदा वर्षे अध्यक्ष होते. ते महानगर गॅस लिमिटेडचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र इकनॉमिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. त्यांना अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर या संस्थेचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी ‘कॅपिटल पनिशमेंट’ हे दिल्लीच्या मुक्कामात लिहिलेले कवितांचे पुस्तक, चीनवरचे इंग्रजी आणि मराठी पुस्तक अशी पुस्तके लिहीली आणि वर्तमानपत्रात अनेक लेख लिहीले.
- अ.पा.देशपांडे.