सर्वत्र मस्साजोग ! महाराष्ट्र पेटून उठणे गरजेचे !
सर्वत्र मस्साजोग ! महाराष्ट्र पेटून उठणे गरजेचे !
काल मस्साजोगचे दिवंगत सरपंच स्व.संतोषअण्णा देशमुख यांच्या निर्घृण खुनाचे दुर्दैवी चलचित्र माध्यमातुन पहावयास मिळाले. पाहिलेली चित्रे खूपच विचलित करणारी होती.सततच्या विचाराने रात्री झोप लागली नाही.पुराणकाळातील राक्षसांच्या कथा वाचून ऐकून होतो पण प्रत्यक्षात ते कसे असतील तर ते स्व.संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांसारखे असतील याची खात्री झाली. महाभारत युध्दप्रसंगी चक्रव्यूहात फसवून अभिमन्युचा वध केल्यावर त्याच्या मृतदेहाला जयद्रथाने लाथ मारल्याचे वाचूनच संताप येतो. मस्साजोग घटनेत तर सहभागी आरोपिंची मनोवृत्ती दुर्योधन,दुःशासन,कंस आणि रावणालाही लाजवेल अशीच आहे. मृतदेहाला लाथा मारणे, मृतदेहावर मुत्रविसर्जन करणे ही राक्षसी क्रिया असहनिय आहे.या घटनेने अवघा महाराष्ट्र केवळ विचलित झाला नाही, केवळ हळहळला नाही तर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.दृश्य पाहून चेतासंस्था ठप्प झाली.काय प्रतिक्रिया द्यावी हे मेंदूलाही सूचेना. हृदय पीळवटले,मेंदू सुन्न झाला,पोटात आकांत ,पायात थरथरी आणि डोळ्यात पाणी आणि आग एकाच वेळी आले. या निंदनीय घटनेमुळे संताप फक्त मारेकऱ्यांवर नाही तर स्वतःसकट सर्वांवरच आला. या प्रकारणात राजकारणी राजकारण करताहेत,सामाजिक कार्यकर्ते खोटी प्रतिष्ठा मिळवण्याचा धूर्त प्रयत्न आणि आपण जनता बघे आणि पळे बनून पाहतोय टीव्ही.स्व.संतोष देशमुखांचा रोज खुन होतोय या महाराष्ट्रात.सारेच गंभीर आहे.कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र आपण ?
या सर्व प्रकारातून काही धडा घेणार की नाही आपण ? मी काल महाराष्ट्रातील खूप आमदारांचे प्रोफाइल पाहिले.प्रत्येकासोबत त्या त्या परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे फोटो दिसले.एखादा फोटो धकुनही जाईल पण फोटोंची वारंवारीता पाहिल्यावर जणू नेते आणि गुंड जीवलग मित्रच आहेत. असे गुंड नेत्यांच्या भरवशावर छोटीमोठी गुन्हेगारी करतात.पोलीस या गुंडांना नेत्यांचा कार्यकर्ता म्हणून कानाडोळा करतात.पुढे हे छपरी गुंड प्रचंड रुप धारण करतात.वाल्मिक कराड आणि त्यांचे गुंड सहकारी याचे उत्तम उदाहरण आहे.कराडला प्रतिपालकमंत्री ही उपाधी होती म्हणे ! हा तर संविधानालाही तडा आहे. कालपरवा केंद्रीय मंत्री ना.रक्षाताई खडसे यांच्या मुलीची छेडखानी करणारे तेथील एका आमदाराचेच चेले चपाटे निघाले.हिंमत पहा गुंडांची ! लोकप्रतिनिधींनो ! जनतेने तुम्हाला निवडून दिले ते जनहितासाठी आणि आपण काय करतो तर गुंडांना पाठबळ देतो.सज्जन माणसे या आमदार खासदारांच्या जवळ जाणेही टाळतात.कारण बहुतेकांच्या दारात अशी राक्षसी माणसे बसलेली असतात.नेत्यांना भेटण्या आधी पहिल्यांदा यांचा सामना करावा लागतो.याला एकही पक्ष अपवाद नाही.” भिक नको घालू पण कुत्रे आवर “ अशी अवस्था सामान्य माणसांची झाली. हे गुंड नेत्यांच्या भरवशावर मोठे होतात.नेत्यांच्या वाटेहिस्स्यात वाममार्गाने पैसा जमवतात.थोडाफार पैसा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना वाटतात.गावातील विविध कार्यक्रमाचे आयोजक,प्रायोजक बनतात.पुढे तर लोक या गुंडांकडेच आर्थिक मदत मागून उपक्रम करतात.फ्लेक्सवर फोटो,नावे टाकतात.मग हेच गुंड अण्णा,भाऊ,दादा या नावाने प्रसिद्ध होतात.मग यांना समाजात खोटी प्रतिष्ठा मिळते.साहेबांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून शासकिय समित्यात अधिकाऱ्यांच्या खुर्चीला खुर्ची,शांतता समितीत पोलीस अधिकाऱ्यांच्या मांडीला मांडी,उद्घाटनांचे नारळ आणि महापंगतीत महाआरती करण्याचा मान याच गुंडांना मिळणार. हे राक्षस दिसायला देव वाटत असले तरी त्यांची राक्षसी क्रिया थांबणार थोडीच ? मग त्यातुन निर्माण होतो वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी. ही राक्षसी टोळधाड फोफावते ते केवळ लोकप्रतिनिधींच्या स्वार्थी आणि फाजिल वृत्तिमुळे.भस्म्या झाल्यागत वागतात हे नेते.सज्जन आणि सच्चे कार्यकर्ते दूर लोटायचे आणि खंडणीखोरांना गळाभेट द्यायची.दहशतीत जगते जनता अनेक ठिकाणी. का होते असे ? कारण आपणही गाफील आहोत.या महाराष्ट्रात सुरक्षा भेदून पंतप्रधानांच्या मंचावर खोटी माणसे चढली,गृहमंत्र्यांच्या घरात एका महिलेने सहज घूसखोरी केली,एका मंत्र्याच्या बंगल्यावर अनैतिक बैठका झाल्या,एका माजी मंत्र्याचा मुलगा पासष्ट लाख खाजगी विमानावर उडवतो आणि परदेशात जातो,एका महिला खासदाराच्या अंगावर गुंड खुर्च्या फेकतात,महिलेच्या खुनाच्या आरोपात असून मंत्री सहज सुटतात.कोणालाही शिक्षा तर सोडाच किंवा साधा धाकही वाटत नाही.आरोपी मोकाट फिरतात.चौकशी होते की नाही हे ही कळत नाही .असे कितीतरी प्रकार आहेत.काहीच होत नाही त्यामुळे गुंडही धजावतात.यात एकही पक्ष धुतला तांदुळ नाही.
सध्या बलात्कार आणि छेडछाडीची तर लाटच आली.भीती किंवा कायद्याचा धाक अजिबात दिसत नाही.खुल्या चारचाकी गाड्या,झेंडे,अंगावर किलोने सोने आणि दादांचा ताफा पाहिल्यावर सामान्यांना भीती आणि तरुणांना आकर्षण यातून तरुणाई याच राक्षसी प्रवाहात सहज प्रवेश करते. राजाश्रय किती असावा या दृष्टात्म्यांना तर मंत्र्यांची निवासस्थाने,आमदार भवन,जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती यांचे बंगले आणि शासकिय विश्राम गृहे या गुंडांचे अड्डे बनत चालले. आमदार खासदारांच्या नावावर
सध्या बलात्कार आणि छेडछाडीची तर लाटच आली.भीती किंवा कायद्याचा धाक अजिबात दिसत नाही.खुल्या चारचाकी गाड्या,झेंडे,अंगावर किलोने सोने आणि दादांचा ताफा पाहिल्यावर सामान्यांना भीती आणि तरुणांना आकर्षण यातून तरुणाई याच राक्षसी प्रवाहात सहज प्रवेश करते. राजाश्रय किती असावा या दृष्टात्म्यांना तर मंत्र्यांची निवासस्थाने,आमदार भवन,जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती यांचे बंगले आणि शासकिय विश्राम गृहे या गुंडांचे अड्डे बनत चालले. आमदार खासदारांच्या नावावर
फुकटात वातानुकुलीत खोल्या वापरायला मिळतात.शासकिय अधिकारी बोलत नाहीत.कारण हे गुंड साहेबांचे कार्यकर्ते. विज पाणी पलंग गाद्या फुकटात मग काय ? तिथेच विश्रामगृहात पडून रहायचे.बिडी सिगारेटच्या धुरांड्या आणि मद्यपान करायचे आणि तेथूनच भ्रष्ट कारनामे करायचे.हे सर्व वर्षानूवर्षे सुरु आहे.हीच स्थिती सर्वदूर महाराष्ट्रात आहे. गृहमंत्री महोदय ! एखाद्या दिवशी मोहीमच घ्या हातात .पोलिसांना छापे मारायला सांगा आमदार निवास,स्थानिक जि.प.ची निवासस्थाने आणि विशेषतः शासकिय विश्रामगृहे .आपणास रिकामचोट आणि गुंडांचा थवाच हाती लागेल.एखाद दिवसाचे समजू शकू पण जामिया विद्यापीठात जशी वर्षानूवर्षे काही टारगट विद्यार्थी ठाण मांडून आहेत त्याच प्रमाणे हे गुंड मुक्त संचार करत आहेत शासकिय विश्रामगृहात दिवसरात्र.मग ते स्वतःलाच आमदार खासदार समजतात आणि सुरु होतात यादृच्छिक दादागिरी करीत. अजुन एक गृहमंत्री महोदय ! गुप्तचर विभागाला आदेश देवून महाराष्ट्रातल्या तमाम लोकप्रतिनिधींसोबत सतत राहणाऱ्यापैकी कोणाकोणाचे पोलीस रेकॉर्ड खराब आहे याचीही नोंद घ्या.एखाद वेळेस असेल तर समजू शकू पण गुंड जर सतत सोबत असतील तर तो गंभीर विषय आहे.वाल्मिक आणि दोस्त हे असेच निर्माण झालेत.बहुतेक लोकप्रतिनिधींच्या सभोवताली असे कराड आहेत.समाजाला सगळे माहीत असते पण “ मांजराच्या गळ्यात घंटा कशी घालावी ? या एका प्रश्नावर घोडे अडते. वाल्मिक कराड निर्माण होणार नाहीच हे त्या त्या नेत्याचे कर्तव्य आहे. जनता म्हणून आपलेही चुकतेच.आपण जनता फक्त विषय चवीने चघळतो.त्यातुन रोज खुन होतो स्व.संतोष देशमुखांचा.खुनी केवळ मारणारे नाहीत तर आपल्यासकट सर्व घटक जवाबदार आहेत खुनाला. या कामी जे पुढे येतात ते फक्त राजकारण म्हणून,काही प्रसिद्धी मिळावी म्हणून तर काही पोळ्या भाजायला.प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाताहेत सर्व. जनता म्हणून आपण काहीतरी जागृत रहायलाच पाहिजे. आपल्या परिसरातील नेत्यांभोवतीच्या गुंडांबाबत आपल्याला खुले येता येत नसेल तर निदान गृहमंत्र्यांना आपण मेलवर,पत्राद्वारे सतर्क करू.नसेल स्वतःचे नाव टाकता येत असेल तर निनावी पत्र पाठवा.काहीतरी परिणाम होऊ शकतो.गृहखाते सतर्क करेल त्या लोकप्रतिनिधीला.तुमच्या सभोवताली समाजविरोधी तत्वे घूटमळताहेत ,तुम्ही त्यांना सोबत ठेवताय ,सावध व्हा !हे त्यांना सांगेल गृहखाते. मस्साजोग प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. प्रकरण उघड झाले म्हणून मस्साजोग अन्यथा असे मस्साजोग अनेक असू शकतात.ते फक्त उघड झाले नाहीत इतकेच. ते टाळण्यासाठी जनतेने सजग,सबळ आणि सतर्क राहण्याची गरज आहे.मस्साजोगचे प्रकरणात आरोपींना झालेली अटक हा केवळ जनतेच्या लढ्याचा परिणाम आहे इतर कोणाचा नाही.या लढ्यातील प्रत्येक राजकारणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलाच आहे .जनतेने रेटा दिला अन्यथा हे राजकारणी तर “ सब घोडे बारा टक्के “ होत. पुन्हा एखादा संतोष देशमुख होऊ नये यासाठी जागर्तीवर राहू या. (फोटो गुगल )
विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
९८२२२६२७३५
९८२२२६२७३५
0