सावळ बाधा

0 436
सावळ बाधा 
अलवार येते चाहुल रुमझुमती पोर होऊन..
जसा फिरे व्हायोलीनचा गज चांदवेळी मोर होऊन..
आठवांचा डोह हिंदकळतो…
   …..काजळ तीट लावते राधा
जग हसून तिजला म्हणते,
      तुजं झाली सावळ बाधा….!
होतील मोकळे पाश , जन्मांच्या पैलतीरावर
श्वासांना कसले भास, पतंग रेंगाळतो दिव्यावर
तुज  डोळ्यांच्या डोहात…
     नाव हलकेच उमटते ……राधा
जग हसून तिजला म्हणते
       तुजं झाली सावळ बाधा
कृष्णकाठ मौन कधीचा, आठवांचा कळपही रुसला
एका साध्या भेटीसाठी.. जीव म्लान होत विझला
किती सरत्या क्षणांचे देणे, 
        तो हिशोब मांडते राधा
जग हसून तिजला म्हणते..
        तुजं झाली सावळ बाधा
तुझी घरंदाज ओंजळ , माझी गोरज धुळीची सुमने
कठोर प्राक्तन रेषांवरती ..
      तरी धावत जाती स्वप्ने
तुझ्या रेशमी चाहुलींचाच 
             देहाला पडतो वेढा
जग हसून तिजला म्हणते..
       तुजं झाली सावळ बाधा

प्रा. श्रेया सरनाईक ह्या उत्कृष्ट ललित लेखिका, कवयित्री आहेत. तसेच अनेक साप्ताहिक व दैनिक वृत्तपत्रांमधून सातत्याने लेखन करीत असतात. फुले आणि कविता या लोकप्रिय FB पेज च्या अड्मिन आहेत. साप्ताहिक जन मंगल च्या संपादक मंडळात आहे. संपर्क क्रमांक - 8600277888

Leave A Reply

Your email address will not be published.