शरयूची आत्मकथा.!

0 95

शरयूची आत्मकथा.!

22 जानेवारीला श्रीरामललाची पुनरप्रतिष्ठापना होणार. देश अतीव आनंदात आहे. रामललाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येतून सतत वाहणाऱ्या शरयुने श्रीराम जेव्हा चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि रावणावर विजय मिळवून अयोध्येला परत आले तो क्षण हजारो वर्षांपूर्वी अनुभवला होता. आजही शरयुला तो आनंदोत्सव स्मरत असेल. नंतर तिने काळाच्या ओघात बरेच चढउतार पाहिले. दीर्घ काळाचा अपमान सहन केला. शेकडो वर्षांचा दुस्वास सहन केला. केवळ आणि केवळ श्रीरामाच्या सहवासाने पुनीत झालेल्या शरयुला आपले जीवन संपवावे असे देखील वाटले असेल. पण तिचा दुर्दम्य विश्वास होता.
शबरीची भक्ती तिने पाहिली होती. भिल्ल कुटुंबात जन्माला आलेली कोवळी पोर आपल्या लग्नात आपणच पिल्लू असल्यापासून पाळलेली बकरी पाहुण्यांसाठी कापली जाणार यामुळे व्यथित झाली. आपण लग्नच नाही केले तर आपल्या लाडक्या बकरीचे प्राण वाचतील म्हणून तिने घरून पळ काढला. लहानशी शबरी मतंग ऋषींच्या आश्रमात आश्रयाला आली. तिथे तिने खूप सेवा केली. तपश्चर्या केली. शबरीने आयुष्याचा प्रत्येक क्षण श्रीरामांची प्रतीक्षा करण्यात घालवला. ती रोज श्रीरामांच्या स्वागताची तयारी करायची. दिवस उगवायचा तसा मावळायचा. ती दररोज त्याच जिद्दीने, निराश न होता पुन्हा श्रीरामाच्या प्रतिक्षेतच असायची. एक दिवस राम येतील हा तिचा विश्वास कधीच ढळला नाही. एक दिवस तिचा विश्वास सार्थ ठरला. श्रीराम शबरीच्या कुटीत आले. शबरी धन्य झाली. तिची नवविधा भक्ती सार्थ ठरली होती.
शबरीच्या विश्वासाची साक्षीदार शरयू होती. म्हणूनच शरयूचा विश्वास पण कधीच ढळला नाही. असंख्य संकटांना झेलत तिच्या आराध्य रामाची होत असलेली हेळसांड ती याच विश्वासावर सहन करत होती. शरयुने आपल्या चार लक्ष सुपुत्रांनी तिच्या लाडक्या रामरायासाठी दिलेले बलिदान पाहिले. जेवढे रक्त सांडत होते, तेवढेच तिचे अश्रू वाहत होते. तिने बाबराचे आक्रमण पाहिले. मीर बांकीचा सैतानी उच्छाद पाहिला. विक्रमादित्याने कसोटीच्या खांबांवर बांधलेले रामरायाच्या जन्मभूमीवरचे दौलदार, सुंदर व भव्य मंदिर ध्वस्त करतानाचा प्रसंग शरयू आजही विसरलेली नाही. पापी औरंग्याचा मंदिर द्वेष तिने पाहिला. श्रीरामाचे आराध्य असलेल्या काशी विश्वेश्वराचे मंदिर औरंग्याने ध्वस्त केल्याचे तिने ऐकले होते. तोच औरंग्या पुन्हा बाबरी ढाचा राखण्यासाठी सपासप मुंडके छाटताना तिने पाहिला होता. या नरसंहाराने ती दीर्घकाळ विव्हळली असेल ! पण या वेदना कोणाला सांगायच्या ? शेवटी श्रीरामावरच विश्वास ठेवायचा आणि काळ बदलण्याची प्रतीक्षा करायची !
त्याच काळात दक्षिणेत एका हिंदू नृसिंहाने याच औरंग्याला सळो की पळो करून सोडले असल्याच्या सुरस, रोमांचक आणि आशादायी कथा तिला ऐकू येत होत्या. छत्रपतींच्या सिंहासनाधिश्वर होण्याने देखील ती सुखावली होती. चारशे वर्षांच्या काळरात्रीत तिला असा आशेचा किरण मिळाला की आता अपमानांचा बदला चुकता होणार म्हणून ती उल्हसित व्हायची !
एकदा तिने रामाचा चौदा वर्षांचा वनवास अनुभवला पण हा दुसरा वनवास साडे पाचशे वर्षांचा होता. रामराज्य जिथे नांदले त्याच भूमीला आलेले रणांगणाचे स्वरूप व्यथित करणारे होते. ‘असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला’ असा दैव दुर्विलास तिने गोरे परतल्यावरही अनुभवला होता. गोऱ्यांचा श्रीरामद्वेष देखील अनुभवला. गोरे गेल्यावर सरदार वल्लभभाई पटेल या भारतमातेच्या सुपुत्राने सोरटी सोमनाथ मंदिराचे निर्माण केले. परकीय आक्रमकांचा कलंक पुसण्याचा वल्लभभाईंचा मनसुबा होता. पण, गोऱ्यांच्याच मानसिकतेत वावरणाऱ्या राज्यकर्त्यांनी रामललाला पुन्हा बंदिवासात टाकले. भरतभूमीत रामाच्या जन्माचे पुरावे मागितले जावे, यापेक्षा अधःपतन ते कोणते !
आपल्या संतापाला आवर घालत तिने नेहरूंना बाबराच्या कबरीवर नतमस्तक होताना पाहिले. रामलला सळाखांच्या आत कुलूपबंद आणि बाबराला अभिवादन ! एकेकाळी विश्वगुरू पदावर आरूढ असलेल्या भरतभूमीत नियतीने सारेच चक्र उलटे फिरवले होते. नेहरूंपाठोपाठ इंदिराजी पण बाबराच्या कबरीवर गेल्या. कालपरवा त्यांचा नातू राहुल गांधी देखील बाबराच्या कबरीवर माथा टेकवायला गेला. शरयूचा संताप अनावर होणे स्वाभाविक आहे.
पण शरयू ने आपला विश्वास ढळू दिला नाही. रामकाजासाठी श्रीरामभक्त बजरंग हिंदू शक्तीच्या रुपात अवतरला. बाबराचा कलंक पुसला गेला. आता शरयुवर झालेल्या जखमा भरून निघाल्या आहेत. ज्या भरतभूमीत पहिल्या पंतप्रधानाने रामललाला बाहेर काढा म्हटले होते त्याच देशाचा पंतप्रधान आता रामललाची प्रतिष्ठापना करणार आहे. रामाच्या काळात असलेले अयोध्येचे वैभव परत प्राप्त होणार आहे. राम नव्हते वैभव नव्हते. राम येणार तर भरतभूमीला वैभव पण येणार म्हणून शरयू आनंदली आहे. तिचा उत्साह ओसंडून वाहतो आहे.

– शिवराय कुळकर्णी.

लेखक हे जेष्ठ पत्रकार, उत्कृष्ट वक्ता, सामाजिक व राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.