शीतल आमटेंच्या निमित्ताने.. 

1 684
शीतल आमटेंच्या निमित्ताने.. 
करोना काळात आमटे कुटुंबातील वाद समाज माध्यमांवर चर्चिला गेला होता. लोकसत्तेने केलेल्या शोध पत्रकारितेमुळे आनंदवनातील संस्था संचालनाचे उघडे केलेले स्वरूप कोणतीही शहानिशा न करता प्रसिद्ध केले असे सांगत निराश झालेल्या शीतल आमटेंनी लोकासात्ताकारानी २०१८ साली दिलेला दुर्गा पुरस्कार परत पाठवला होता. या सर्व घडामोडीने आनंदवनात सर्व काही आलबेल नाही याची कल्पना देखील आली. त्या नंतर आनंदवन संस्थेच्या  बैठकीत सर्व काही सुरळीत झाले असे सर्वाना पुन्हा कळले. काही कालावधीनंतर शीतल आमटेंनी त्यांचे काही म्हणणे सामाजमाध्यमांवर  टाकले. त्यावर समस्त आमटे कुटुंबियांच्या प्रमुखाच्या वतीने शीतल आमटेची मानसिक स्थिती बरी नसल्याचे व त्या नैराश्येतून जात असल्याचे म्हटले आणि अचानक बातमी आली शीतल आमटेंनी आत्महत्या केली.    
सामाजिक कामाचा मानबिंदू म्हणून ज्या काही प्रकल्पांकडे मागील तीन-चार दशकात बघितले गेले. त्यात आनंदवनाचे नाव खूप वरचे आहे. बाबा आमटेंनी तपस्वी वृतीने केलेल्या सेवेच्या कामाचे प्रत्यक्षदर्शी स्वरूप म्हणून आपण सर्व आनंदवन कडे बघतो. त्यांच्या पुढल्या पिढीने देखील ते काम तितक्याच ताकदीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि आता आमटे कुटुंबियाची तिसरी पिढी सेवेचा हा डोलारा सांभाळताना दिसत होती.
या घटनेने सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था यांच्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न समोर उभे केले आहेत. याच करोना काळात महाराष्ट्रातील अशाच अन्य काही संस्थांमध्ये देखील संस्थेचे प्रस्थापित नेतृत्व व संचालक मंडळ याच्या बेदिलीची उदाहरणे देखील घडली आहेत. सुदैवाने प्रसिद्धी माध्यमांपर्यंत त्याची रोचक बातमी न पोहोचल्याने समाजमाध्यमावर त्याची चर्चा कमी झाली. 
मागील काही वर्षात सामजिक कामाचे मोठ्या प्रमाणावर झालेले व्यावसायीकरण,संस्थांच्या मोठ्या आर्थिक उलाढाली, संस्थेच्या चढत्या आलेखाबरोबरच चालवणाऱ्याचा देखील वाढत जाणारा अहंभाव, त्यातून निर्माण झालेले संस्थेचे समाजातील वलय आणि सामाजिक सत्ताकेंद्राची नशा या साखळीत स्वयंसेवी संस्था देखील न कळत अडकण्याच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहेत. सामाजिक कामाच्या मूळ प्रेरणेपेक्षा संस्था धनाची जोपासना करण्यातच जास्त गुंतल्याने येणारे मानसिक ताण आता जास्त झाले आहेत.   
ज्या सामाजिक कामाच्या प्रेरणेतून संस्था जीवन सुरु झाले त्या कामापेक्षा ही संस्था सुरु राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरती मोठ्या झाल्या आहेत. काही काळानंतर आपल्याच कामाकडे थोड्या निर्लेप वृत्तीने बघण्याची सवय कमी होताना दिसत आहे. सामजिक काम करता करता संस्थेतील अंतर्गत सामाजिकत्वच संपून गेल्याचे लक्षात येईनासे झाले आहे.
आपल्याकडे उद्योगा मध्ये अंबानी,बिर्ला, सिनेमामध्ये कपूर,खान, राजकारणात गांधी,पवार या सारखी घराणी तयार झाली आहेत. मागील काही काळात सामाजिक कामाचे विशेषतः संस्थात्मक काम करणाऱ्या व्यक्तीची देखील आता सामाजिक घराणी तयार होताना दिसत आहेत. ती अगदी गाव पातळी पासून ते जिल्हा आणि राज्य पातळीवर देखील उदयास येत आहेत. आमटे हे देखील तसेच सामजिक कामाचे घराणे होऊ घातले आहे. मुळातच सामाजिक कामाव्यतिरिक्त अन्य सर्व अगदी राजकीय व्यवस्थेमध्ये देखील आर्थिक हितसंबध आणि सत्तेची अमर्याद ताकद आणि त्याची अभिव्यक्ती ही खूप महत्वाची मानली गेली आहे. पण सामाजिक काम हे गायकीच्या घराण्यासारखे जो शिकेल तो चालवेल असे राहिले तर ते अधिक प्रवाही व मूळ प्रेरणेला जागे ठेवत चालेल. ते चालविण्यासाठी समाजातील सर्वांनाच संधी देऊन मोठे केले पाहिजे तरच त्यातून येणारे साचलेपण कमी होऊन नाविन्याची कास धरली जाईल.
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आज देखील काही स्वयंसेवी संस्था, संस्था संचालनाचे ,त्याच्या मूळ भूमिकाना तडा न जाता परंपरेच्या  नेतृत्वावर अवलंबून न राहता किंबहुना नवीन नेतृत्वाची  जाणीवपूर्वक उभारणी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ज्यामधून केवळ चालविणाऱ्यांची नवीन पिढी विकसित होते असे नाही तर सामाजिक कामाच्या नवीन शैली ,वेगळे ठळक पोत देखील उत्पन्न होताना दिसतात. सामाजिक कामात ज्या समाजाचा उल्लेख आपण करतो त्या समाजाचे प्रतिनिधित्व निर्णय प्रक्रियेत देखील होते. खर  म्हणजे सामाजिक कामाच्या प्रक्रियेचे चक्र त्या ठिकाणी पूर्ण होते.     
मुळातच सामाजिक काम हे समाजातील सर्वांनी एकत्र येऊन करण्याचे. बदलत्या काळात त्याचा प्रवास व्यवसाय निष्ठतेकडे (Professionalism) झालाच पाहिजे. सामाजिक कामात उत्तरदायित्वाची भावना अधिक रुजली पाहिजेच. पण ते होत असताना तो व्यावसायिक (धंदेवाईक) सामाजिक कामाकडे होत नाही ना? त्यातून त्या कामाची मुळ प्रेरणाच संपत नाही ना? CSR नावाच्या सामाजिक काम चालण्यासाठी नव्याने आलेल्या कॉर्पोरेट व्यवस्थेचा भाग आम्हाला शीतल आमटेच्या दिशेने घेऊन जाणार नाही ना? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे सामाजिक काम करण्याचे आपण मनापासून ठरवले आहे त्या कामात आपल्याला आनंद मिळतो आहे ना? आपले असमाधान, नैराश्य याचा निचरा होण्याची आपली मध्यम आपण शोधली आहेत ना?
शीतल आमटेच्या आत्महत्येने सामाजिक कामाच्या या सर्व बाबींवर आपण सर्वांनीच विचार करण्याची वेळ आली आहे, असे वाटते.
– रत्नाकर पाटील, जळगांव.   

लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत. केशवस्मृति प्रतिष्ठान, जळगाव चे सचिव असून लोकसंवाद डॉट कॉम चे संपादक मंडळात आहेत. तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधींनीचे अनेक वर्ष प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्य केले आहे. संपर्क क्रमांक - ९४०५४४४६२७

1 Comment
  1. Mohini Hedaoo says

    छान विचार प्रवृत्त करणारा लेख

Leave A Reply

Your email address will not be published.