ह.भ.प.शिरीषमहाराजांचे आकस्मिक निधन संघटनांसाठी चिंताजनक आणि चिंतनिय !
आज दिनांक ५/२/२०२४ बुधवार रोजी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प.शिरीषमहाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची बातमी माध्यमातुन वाचली.अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला.वारकरी सांप्रदायाचे हे अतोनात नुकसान आहे. श्री.शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज तर होतेच त्यामुळे वारकरी सांप्रदायाचे ते महत्वाचे घटक होते शिवाय ते कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणूनही त्यांना इतक्यात महाराष्ट्र ओळखत होता.शिवशंभू विचार दर्शन चे अध्यक्ष होते.हिंदुत्वाच्या विरोधात जर कुणी फेक नरेटिव्ह पसरवत असेल तर त्याचा पर्दाफाश करुन विमर्श म्हणजे सत्य प्रस्थापित करण्यासाठी महाराज अग्रेसर होते.लव्हजिहाद,धर्मांतरण,समान नागरी कायदा याबाबत ते प्रखरपणे बोलत असत. “ दिसत नसेल टील्ळा, तर त्याच्याकडून वस्तू घेणे टाळा “हे त्यांचे वचन खूप गाजले होते.
इतक्यात तर अख्ख्या महाराष्ट्रात हिंदुत्ववादी कार्यकर्ते कार्यक्रमासाठी त्यांचीच मागणी करीत होते.ते देखिल कुठलीही पर्वा न करता सर्वत्र जात होते.महाराष्ट्रात जर कट्टर हिंदुत्ववादी आणि हिंदू अभ्यासक म्हणून नावे काढली तर पहिल्या पन्नासात श्री.शिरीष महाराज यांचे नाव घ्यावेच लागेल.त्यांचे वैशिष्ठ म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी असले तरी बोलण्यावागण्यात संयम,विवेक असायचा,विषय कठीण वज्रासम असला तरी मेणाहून मऊ होऊनही आपला मुद्दा मांडू शकतो हे महाराजांकडून शिकावे.आगपाखड,आक्रस्ताळेपणा न वापरता धारदार विचार ते मांडत होते. शिरीष महाराज मोरे संघाचे कट्टर स्वयंसेवक ही होते. ते संघ शिक्षा वर्गाचे तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक होते.संघ स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या अनेक व्याख्यानमालेत त्यांनी अनेक वेळा ‘हिंदुत्व’ या विषयाची उत्तम मांडणी केलेली आहे. संभाजी ब्रिगेडने वारकरी संप्रदाय गढूळ करून, त्यांच्यामध्ये जणू वारकरी हिंदू नाहीतच अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला असतांना , हभप श्री.शिरीष महाराजांनी प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांमध्ये पुन्हा हिंदुत्वाचा भाव निर्माण केला. हिंदुत्वासाठी त्यांचे मोठे योगदान होते. वारकरी सांप्रदायात त्यांना मानाचे स्थान होते.वारकऱ्यांच्या एकजुटीसाठी ते अहोरात्र झटत असत.
असा दिग्गज कार्यकर्ता जेंव्हा आर्थिक कारणावरून आत्महत्या करतो हा विचार डोक्याला झटका बसणारा आहे. विचारधारा, विमर्श,हिंदू विरोधकांचे वाभाडे काढणे ,ज्ञानोबा तुकोबांचा विचार तळागाळात पोचावा यासाठी महाराजांनी जिवाचे रान केले.बैठका घेतल्या,विषय समजावून सांगितले.आपली बुद्धी,शक्ती आणि पराक्रम ज्यांनी केवळ संप्रदाय आणि विचारधारेसाठी दिला .पण अशा निष्काम कार्यकर्त्याची आर्थिक परिस्थिती आत्महत्येपर्यंत जाते पण याची कुणालाच साधी खबरबातही नसावी,त्यांच्या मनस्थितीचा जरासा अंदाजही येवू नये हे दुर्दैवी आहे.
या घटनेवरून आता संघटन आणि सांप्रदाय म्हणून विचार मंथनाची गरज आहे.समर्पित कार्यकर्ता कायम समष्टित राहत असतो.समष्टीत राहतांना त्याचे व्यष्टीकडे लक्ष नसते.म्हणजे सामाजिक कार्यकर्ता समाज परिवर्तनासाठी तन मनाने कार्य करतांना तो घरादारावर तुळशीपत्र ठेवतो.त्याचे घराकडे दुर्लक्ष होते.अशावेळी कुणीतरी त्याची हार्दिक चौकशी, त्याच्या मनाचा ठाव,त्याची घराची स्थिती,त्यांच्या घरच्यांशी संवाद करणे आवश्यक असते. दुर्दैवाने शिरीष महाराजांच्या बाबतीत तसे झालेले दिसत नाही. स्व.शिरीषमहाराजांचे समाजसेवेच्या नादात घराच्या आर्थिक नियोजनात दुर्लक्ष झाले असेल तर संघटन म्हणून चिंताजनक आहे.मी जर चुकत नसेल तर त्यांचे इडलीचे उपहारगृह होते म्हणे .ते बंद पडल्याचेही समजले.निश्चितच दुर्लक्ष झाल्यामुळे ते बंद पडले असावे. कार्यकर्ता जेंव्हा झोकुन देवून काम करतो तेंव्हा त्या त्या संघटनेने त्याच्या आर्थिक स्थितीकडे त्याचे दुर्लक्ष तर होत नाही ना ? याकडे निश्चितच लक्ष देणे गरजेचे आहे.तो सुसाट सुटला असेल आणि त्यामुळे त्याचे अर्थतंत्र मोडकळीस येत असेल तर एक तर त्याला जरा लगाम लावा किंवा त्याच्या आर्थिक बाजुचा वेगळा विचार करायला लावून त्या बाजूकडे लक्ष देण्यासाठी प्रवृत्त करावे.
शिरीष महाराजांची आत्महत्या म्हणजे केवळ संघटनेचे किंवा सांप्रदायाचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान आहे.हिंदुत्वाचा एक प्रचंड मोठा सेनापती आपण गमावला आहे.त्यांच्या आत्महत्येला ते स्वतःच जवाबदार असतीलही पण संघटन आणि सांप्रदाय म्हणून जवाबदारी आपलीही आहेच. त्यांच्याशी योग्यवेळी योग्य संवाद झाला असता तर कुणाजवळ तरी ते व्यक्त झाले असते.त्यांचे कर्ज अब्जावधीत निश्चित नसेल.लाखात असलेले कर्ज फेडण्यासाठी सद्यस्थितित त्यांच्या सहयोगी कार्यकर्त्यांसाठी आणि सांप्रदायासाठी “ किस झाड की पत्ती “ आहे.आता अनेक जण म्हणताहेत की महाराज ! एकदा सांगायच असत हो ! कर्ज फेडले असते !हे सर्व साप गेल्यावर काठ्या आपटणे ठरते . केवळ संवाद नसल्याने असे प्रकार घडतात. कार्यकर्त्यांचा केवळ उपयोग घेणे आणि त्याच्या घरगुती बाबीत उघड्यावर ठेवणे हे सर्वच संस्थासंघटनेत आहे.
त्याच्या हृदय आणि मेंदूचा पुरेपुर वापर करायचा पण पोटाचा विचार मात्र त्याचा तो पाहिल ! हा विचार उदार वाटत असला तरी तो उदार नसुन न्यून विचार आहे.कार्यकर्ता भेटला की फक्त देव,देश आणि धर्मावर चर्चा करायची .हे आवश्यक आहेच पण हे सर्व आटोपल्यावर कधीतरी त्याच्या घराबाबत चर्चा ?ती झालीच पाहिजे.
श्री.शिरीष महाराज हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.प्रत्येक संस्था संघटन आणि पक्षात असे हजारो शिरीष महाराज आहेत.यापुढे या सर्व शिरीष महाराजांनी आत्महत्या करू नये यासाठी प्रत्येक संघटन आणि सांप्रदायात चिंतनाची गरज आहे. स्व.शिरीषमहाराजांशी माझा प्रत्यक्षात कधीच संबंध आला नाही. मध्यंतरी त्यांनी देहू येथे गाथा मंदिरात दिनांक २८ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी शिवशंभू विचार दर्शन कार्यशाळा आयोजित केली होती.त्यात त्यांनी मलाही निमंत्रित केले होते.कार्यबाहुल्ल्यामुळे मला जाता आले नाही.पण भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी बोलणे झाले होते.एव्हढे मोठे व्यक्तीमत्व म्हणजे त्यांना इतर कीर्तनकारांप्रमाणे लक्ष्मी खूप प्रसन्न असेल असा माझा समज होता.पण तो माझा गैरसमज ठरला. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय,हिंदुत्ववादी संघटना,छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभू राजे यांच्या विचारांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. आजही सर्व संघटन आणि पक्षात,सांप्रदायात खूप शिरीषमहाराज आहेत.त्यांचे समुपदेशन करुन नेटका संसार आणि परमार्थ विवेक याचा समन्वय ठेवण्यासाठी सजग करणे हीच स्व.ह.भ.प.शिरीष महाराजांना श्रद्धांजली ठरेल !