श्री गणेश अथर्वशीर्ष साधकाची अंतर्यात्रा.

0

श्री गणेश अथर्वशीर्ष साधकाची अंतर्यात्रा.

श्री गणेश विषयक ग्रंथांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा अद्वितीय ग्रंथ म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष.
दिसायला अत्यंत छोटेसे हे स्तोत्र अर्थाच्या दृष्टीने हिमालयाहून उत्तुंग आणि सागराहून गहन आहे‌. ही केवळ एक स्तुती नाही तर साधकाच्या अंतरंग विकासाचा तो अद्वितीय आलेख आहे ही भूमिका आपल्या मनामध्ये दृढमूल करणारा लेखनप्रपंच म्हणजे विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड लिखित ग्रंथ श्री गणेश अथर्वशीर्ष साधकाची अंतर्यात्रा.
वास्तविक आज पर्यंत श्री गणेश अथर्वशीर्षावर असंख्य लेखकांनी लिखाण केले. मग याच वेगळे काय? असा प्रश्न वाचकांना निर्माण होईल याची पूर्वपीठिका मनाशी बांधूनच श्री पुंड सरांनी हा ग्रंथ साकार करण्यास आरंभ केला.
आजवर गणेश अथर्वशीर्षाच्या प्रत्येक पदाचे विविध अंगानी निरूपण करणारे अनेक प्रयास झाले आहेत. मात्र या अथर्वशीर्षातील सर्व निरूपणामध्ये एक अंतर संगती आहे. ती समजून घेतल्याशिवाय त्या स्तोत्राचा वास्तविक अर्थ उलगडूच शकत नाही याची जाणीव आपल्याला हा ग्रंथ वाचल्यावर होते.
उदाहरण घेऊन सांगायचे तर नमो व्रातपतये! यावर खूप विवेचन सापडेल. त्यानंतर नमो गणपतये! यावर देखील प्राप्त होईल. पण नमो व्रातपतये! नंतर नमो गणपतये! च का? असा प्रश्न विचारला तर आपण पटकन उत्तर देऊ शकणार नाही. मात्र गणपती शब्दाच्या पूर्वी वापरलेला व्रातपती आणि पुढे वापरलेला प्रथमपती किंवा प्रमथपती या शब्दांचा परस्परांशी असलेला संबंध आणि त्यापुढे येणाऱ्या लंबोदरायैकदंताय।
विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:।। या प्रत्येक स्तराची असलेला त्यांचा संबंध साकल्यात्मकरीतीने जाणून घ्यायचा असेल तर या ग्रंथाला पर्याय नाही.
अगदी अथर्व म्हणजे काय? त्याला शीर्ष शब्द का लावला? ते शीर्ष अथर्व कसे करायचे? अशा आरंभी मांडलेल्या पूर्वपीठीके पासूनच या ग्रंथाचे विलक्षणत्व लक्षात येते.
नमस्ते गणपतये पासून वरद मूर्तये नमः ! पर्यंत प्रत्येक पदातून जो अद्वितीय गूढार्थ भरलेला आहे त्याची येथे अत्यंत सुगम रीतीने उकल करून दाखविण्यात आलेली आहे.
अगदी सुरुवातीला येणाऱ्या शांती मंत्रांचे देखील येथे जे अर्थ निरूपण करण्यात आलेली आहे ते देखिल आपल्याला थक्क करण्यास पुरेसे आहे.
अनेकदा एखादा विशिष्ट शब्द वाचला की त्याची एक ठराविक भूमिका बहुसंख्य निरूपणकारांच्या देखील डोक्यात पक्की असते. उदाहरणार्थ गणेश अथर्वशीर्षात त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ! या पदाच्या निरूपणात मूलाधार चक्राचे निरुपणच सर्वजण करतात.
मात्र पूर्वी आलेल्या त्वं गुणत्रयातीत: आणि पुढे आलेल्या त्वं शक्तित्रयात्मक: या वर्णनात मधेच मूलाधार चक्राचा संबंधच काय? असा प्रश्न उपस्थित करीत विद्यावाचस्पती स्वानंद पुंडे यांनी मूलाधार शब्दाचा मूळमाया या स्वरूपात जो अर्थ सादर केला आहे तो अन्यत्र कुठेही मिळण्याची शक्यता वाटत नाही.
याच स्वरूपात शिवसूत शब्दाचे येथे आलेले निरूपण आपली दृष्टी बदलविणारे आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे यात प्रत्येक पदाचे निरूपण करताना जी उदाहरणे दिली आहेत, जे दृष्टांत दिलेले आहेत किंवा वैज्ञानिक पद्धतीने त्यातील अनेक गोष्टींचे जे स्पष्टीकरण केले आहे ती खरोखरच अतीव चिंतनीय आहे.
कोणत्याही स्तोत्राचा केवळ पाठ करण्याच्या ऐवजी त्याला समजून घेऊन त्याचे रसग्रहण करीत आचरण केले तर तो आनंद शतगुणित होतो. अथर्वशीर्षाच्या नित्यपठनाच्या आपण घेत असलेल्या आनंदाला कितीतरी पटीने वृद्धिंगत करणारा हा ग्रंथ आहे.
शीर्षकात म्हटल्याप्रमाणे खरोखरच ही साधकाची लोकविलक्षण आनंद देणारी अंतर्यात्रा आहे. एखाद्या प्राचीन वास्तूत गेल्यानंतर एखादा निष्णात अभ्यासक जसा तेथील प्रत्येक पाषाणाला बोलता करतो तसे विद्यावाचस्पती पुंड सरांचे ओघवते निरूपण आपल्याला या अन्त:प्रवासात सर्वार्थानी मंत्रमुग्ध करुन टाकते.
श्री गणेश अथर्वशीर्ष यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे अद्वितीय निरूपण म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष साधकाची अंतर्यात्रा.

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.