श्रीशांकर स्तोत्र रसावली
श्रीगणेश स्तोत्रांचे रसग्रहण.
कोणत्याही देवतेच्या उपासकांच्या दृष्टीने त्या देवतेला प्रसन्न करून घेण्याचा आणि त्या देवतेच्या अभ्यासकाच्या दृष्टीने त्या दैवत तिला जाणून घेण्याचा एक अत्यंत सुंदर मार्ग म्हणजे त्या देवतेची स्तोत्रे.
स्तोत्र वाङ्मय हे एकूणच भारतीय संस्कृतीचे एक अत्यंत समृद्ध दालन.
त्यातही जर ती स्तोत्रे संस्कृत भाषेत असतील आणि त्याही पुढे जाऊन भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज विरचित असतील तर त्यांचा आनंद शब्दातीतच आहे.
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी रचलेल्या चार संस्कृत सूत्रांचे अत्यंत मनोज्ञ असे रसग्रहण म्हणजे विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड लिखित श्रीशांकर स्तोत्र रसावली.
अमरावती येथून प्रकाशित होत असणाऱ्या दैनिक हिंदुस्थान मध्ये एक जानेवारी दोन हजार वीस पासून रोज एका श्लोकांचे निरूपण अशा सुरू असलेल्या या महत्वाकांक्षी लेखमालेत आरंभी प्रकाशित लेखांचा हा संग्रह.
आरंभ स्वाभाविकच विश्वविख्यात श्री गणेश पंचरत्न स्तोत्राने करण्यात आलेला आहे.
निरूपण करताना त्या श्लोकात आलेल्या प्रत्येक शब्दाची उकल करून दाखविताना विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी आपल्या खास प्राध्यापकी शैलीत तो शब्द कसा तयार झालेला असेल याचे जे विश्लेषण केले आहे ते खरोखरच मंत्रमुग्ध करणारे आहे.
स्तोत्रात आचार्यांनी जी विविध नावे योजिली आहेत त्या प्रत्येक नावाचे महत्त्व स्पष्ट करून तेथे तेच नाव का समर्पक आहे? याचे जे निरूपण करण्यात आलेले आहे ते वाचल्यावर हा विषय किती वेगळा आणि किती गहन आहे हे आपल्याला सहज लक्षात येते.
आपल्या डोक्यात परंपरेने एक कल्पना पक्की बसलेली आहे की भगवान गणेश म्हणजे शंकर-पार्वतींचे पुत्र. मात्र ही वास्तविकता नसून शंकर पार्वती च्याच घरी श्री मयुरेश्वर, श्री गजानन, श्री पुष्टिपती, श्री अंबिका नंदन इत्यादी श्री गणेशांचे अनेक अवतार झाले आहेत.
त्या त्या नावाच्या वेळी या विविध संदर्भांचा उल्लेख करीत श्रीगणेश म्हणजे केवळ शिवपार्वती पुत्र नाही हे लेखकाने श्री शंकराचार्य यांचे अनुगमन करीत करीत, विविध अंगाने उलगडून दाखविले आहे.
कोणत्याही देवतेच्या स्तोत्रांमधे काही शब्द समान असतात. उदाहरणच घेऊन सांगायचे तर श्री गणेश पंचरत्न स्तोत्रातील या ओळी पहा,
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्॥ हे वर्णन कोणत्याही देवतेला लागू पडते. त्यामुळे या प्रत्येक शब्दाच्या निरूपणात त्या प्रत्येक शब्दाची जी वेगवेगळी छटा डॉ. पुंड उलगडून दाखवितात ती एकूणच भक्ती मार्गातील प्रत्येकच साधकाला उपयुक्त साधन सामुग्री आहे.
कोणत्याही स्तोत्रातील एक महत्त्वाचा घटक असतो त्या स्तोत्राची फलश्रुती. या फलश्रुती कडे नेमके कोणत्या अंगाने पाहायला हवे? त्यातील स्तोत्र कसे वाचावे? या भागाला अधिक महत्त्व कसे आहे? इत्यादी गोष्टींचे आलेले अनुषंगिक वर्णन वाचकांसाठी आचरणाचा विषय आहे. उदाहरणार्थ स्तोत्र प्रभाती वाचावे याचा अर्थ सर्वप्रथम कृती रूपात जीवनात भक्तीला प्राधान्य स्थान असावे ही लेखकाची भूमिका मोठी चिंतनीय आहे.
लाल रंगापाशी सगळ्यांना थांबावे लागते. तसा मोरयाचा रंग लाल आहे. अशा अनेक लहान सहान गोष्टीतून एक वेगळी दृष्टी देण्याची लेखकाची हातोटी प्रशंसनीय आहे.
श्री गणेश पंचरत्न स्तोत्र, श्री गणपती स्तोत्र, श्री गणेश भुजंग स्तोत्र आणि श्री गणाधीप स्तोत्र अशा चार स्तोत्रांची निरूपण करणाऱ्या या ग्रंथात जगद्गुरु शंकराचार्य यांची भूमिका आणि गाणपत्य संप्रदायाचे तत्त्वज्ञान यांचे जे साम्य वर्णन केले आहे ते देखील एका वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे.
उदाहरणार्थ,
विरंचिविष्णुवंदितं
विरूपलोचनस्तुतं
गिरीशदर्शनेच्छया
प्रगटितं परांबया !!
या ओळींमध्ये भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू वंदित गणेश तथा भगवान शंकरांना दर्शनाची इच्छा झाल्यामुळे देवी पार्वतीने प्रगट केलेले श्री गणेश, ही थेट गाणपत्य संप्रदायाची भूमिका आहे. ही भूमिका या ग्रंथात विशेषत्वाने प्रतिपादन केलेली आहे.
श्री गणेशांवर, जगद्गुरु शंकराचार्यांवर आणि भारतीय संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा त्रिवेणी संगम या ग्रंथात प्राप्त होतो.