सुहास शिरवळकर

व्यक्ती विशेष

1 815

 

सुहास शिरवळकर

वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारा अवलिया लेखक.

आज ख्यातनाम लेखक सुहास शिरवळकर उर्फ सुशींचा वाढदिवस.तसे पाहिले तर माझ्या ह्या आवडत्या लेखकाने आपला निरोप घेऊन तब्बल सतरा वर्ष झाली आहेत.पण सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी आजही हातात घ्या ती तितकीच फ्रेश वाटते.सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत ह्यावर आज देखील विश्वास बसत नाही.
सुहासजींचा वाचक वर्ग तसा तरुणांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वच होता.पण प्रौढांनाही तारुण्यात नेणारे अफलातून कसब सुहासजींच्या लेखनात होते.एखाद्या चांगल्या लेखकाला शासनाद्वारे पुरस्कारांच्या बाबतीत जशी प्रेरणा मिळायला पाहिजे तशी प्रेरणा कदाचित सुहास शिरवळकरांना राज्य शासनाकडून मिळाली नसेल.कमीतकमी ते डीझर्व करीत होते तितकी तर नक्कीच नाही. पण गेल्या काही पिढ्यांच्या तरुणाईवर मात्र सुहासजींनी अनभिषिक्त राज्य केले.देवकी नावाच्या चित्रपटासाठी त्यांना राज्यशासनाचा सर्वोकृष्ठ लेखक हा सन्मान मिळाला आहे.सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी हातात घेतली की संपल्या शिवाय वाचकाला चैन पडत नसे.पुढे काय होणार? हा प्रश्न कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय सुटत नसे आणि हीच सुहासजींच्या लेखनाचे आणि यशाचे गमक आहे.
सुहास शिरवळकर एकाच पठडीतील लेखक होते का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे.रहस्यकथा,गूढकथा,डिटेक्टिव्ह कथा,लघु कथा,एकपात्री प्रयोग,सामाजिक कथा आणि इतकेच नाही तर ऐतिहासिक कथा सुद्धा सुहास शिरवळकरांनी तीनशेच्या वर कादंबऱ्या लिहिल्या आहेत.दारा बुलंद,मंदार पटवर्धन,फिरोज इराणी आणि बॅरिस्टर अमर विश्वास ही तर वाचकांसाठी खास लोकप्रिय पात्र होती.या पात्रांचे कोणतेही नवीन पुस्तक लायब्ररीत आले की वाचकांच्या त्यावर उड्या पडायच्या.आणि पुस्तक वाचल्याशिवाय सुहासजींच्या चाहत्यांना चैन पडत नसे.सॉरी सर,वेशीपलीकडले,ऑब्जेक्शन युवर ऑनर,कोवळीक,भन्नाट,आक्रोश,सन्नाटा,भयानक,ऑपरेशन बुलेट,तलखी,जाई,स्वीकृत,दास्तान,
मातम,जाणीव,सॉलिड,बंदिस्त,समथिंग,रुपमती अशा अनेक नावाजलेल्या कादंबऱ्या सुहासजींनी लिहिल्या.आणि त्या काळातील त्यांच्या चाहत्यांनी त्या डोक्यावर घेतल्या आणि अक्षरशः त्या जगल्या.
सुहास शिरवळकरांनी प्रत्येक कादंबरी लिहितांना प्रसंगांचे वर्णन इतके सुंदर केले आहे की ही व्यक्ती इतके वेगवेगळे प्रसंग कसे रंगवू शकते हे प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.प्रत्येक कादंबरीतील बारकावे इतके चपलख आहे की प्रत्येक क्षण लेखक स्वतः जगला आहे असा भास सुहास शिरवळकरांची कादंबरी वाचतांना वाचकांना आजही होतो.’दुनियादारी’ ही सुहास शिरवळकरांची सर्वात लोकप्रिय कादंबरी.ही कादंबरी कितीदाही वाचली तरी नेहमी फ्रेश वाटते.काही वर्षांपूर्वी ह्या कादंबरीवर संजय जाधव दिग्दर्शित व स्वप्नील जोशी अभिनित ‘दुनियादारी’ नावाचा चित्रपट आला होता आणि तो सुद्धा तुफान चालला.आजचा जमाना हा वेब सिरीजचा जमाना आहे.नुकचीच ख्यातनाम दिग्दर्शक सतीश राजवाडे दिग्दर्शित व स्वप्नील जोशी अभिनित ‘समांतर’ नावाची वेब सिरीज मॅक्स प्लेअर वर आली आहे.ही वेब सिरीज देखील सुहास शिरवळकरांची लोकप्रिय गूढकथा आहे.
येत्या काळात सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब सिरिज येतील.आणि सुहाजींच्या प्रत्येक कादंबरीचे कन्टेन्ट इतके स्ट्रॉंग आहे की दिग्दर्शक जर उत्तम असेल तर प्रत्येक वेब सिरीज आणि चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल.सुहास शिरवळकर फार लवकर आपल्याला सोडून गेले.पण त्यांचे लिखाण हे कालातीत आहे.तरुण वयातील मानसिक बदल आणि तारुण्यातील भावना शब्दात उतरवण्याचे कसब सुहास शिरवळकरां मध्ये होते.गूढकथा आणि रहस्यकथा लेखनात तर त्यांचा कोणीही हात पकडू शकले नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.बॅरिस्टर अमर विश्वास रंगवताना तर सुहास शिरवळकरांचे अवघे आयुष्य कोर्टात तर गेले नाही असा प्रश्न आपल्याला पडतो.कोर्टातील प्रत्येक घटना सुहासजींनी ताकदीने आणि बारीक बारीक बारकाव्यापासून रंगवल्या आहेत.स्टोरीटेल ह्या अँपवर सुहास शिरवळकरांच्या कादंबऱ्या ऑडिओबुकच्या स्वरूपात उपलब्ध झाल्या आहेत. थोडक्यात सुहास शिरवळकर ‘न भूतो’ असे लेखक होते आणि भविष्यात देखील यांचे ताकदीचा लेखक होणे शक्य नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही.वाढदिवसाच्या दिवशी ह्या अजरामर लेखकाला माझा मनस्वी सलाम.

लेखक हे सामाजिक कार्यकर्ते असून उत्कृष्ट लेखक आहेत. मोबा - ९८६०१३४३२७

1 Comment
  1. Mohini hedaoo says

    खूप छान… लिहिलंय

Leave A Reply

Your email address will not be published.