स्वा. सावरकरांनी मराठी ला दिलेत असंख्य शब्द.

0

स्वा. सावरकरांनी मराठी ला दिलेत असंख्य शब्द.

सावरकरांचे भाषाशुद्धीचे कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला दिलेली एक अमूल्य अशी भेट आहे. भाषाशुद्धीचे महत्त्व फार पूर्वी सावरकरांच्या लक्षात आले होते.

संवादाचं माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन, म्हणजेच भाषा का ? तर, नाही. भाषा ही संस्कृतीचं द्योतक असते, संस्कृतीची वाहक असते. संस्कारातून संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. पण अनेक शतकं मराठी भाषेवर आक्रमणं होत होती. त्या काळात अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्या शिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात.

पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. 1924 मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरुन दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे.’ परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का?’, असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत.’ सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुस-या भाषेचा आधार का घ्यावा ?

‘आपण बहुधा हयगय करून कधी कधी निरुपाय म्हणून आणि इतर वेळी ऐट म्हणून आपल्या बोलण्यात-लिहिण्यात परकीय शब्द वापरतो. ते जितके अधिक वापरले जातात , तितके त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडतात . पुढे पुढे तर त्या शब्दांवाचून तो अर्थ व्यक्‍तच होत नाही , असे वाटू लागते. ते परशब्द आपलेच झाले , असे खुळे ममत्व वाटू लागते आणि परशब्द आपल्या भाषेच्या हाडीमाशी रुतून बसतात ‘ , असं विश्लेषण सावरकरांनी केलं आहे.

‘स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं , हे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे , तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी , फारशी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे , म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्या काळी त्यांना मराठी साहित्यिकांचा विरोध पत्करावा लागला. माधव ज्यूलियन हे पूर्वी भाषाशुद्धीचे विरोधक होते. पण आंधळा विरोध करण्याऐवजी या विषयाचा अभ्यास करुनच तिचे खंडन करावे या हेतूने त्यांनी भाषाशुद्धीचा अभ्यास केला. पण अभ्यास केल्यावर तेच भाषाशुद्धीचे कट्टर समर्थक बनले ! ते इतके की पूर्वी ते आपल्या कवितांमध्ये फारसी शब्दांची खैरात करत असत. ह्या कविता त्यांनी पुन्हा शुद्ध स्वरूपात लिहून काढल्या ! एवढेच नाही तर त्यांनी त्याच्या साहित्य मधील काही चुका अधोरेखित करून सावरकरांना पाठवल्या.

इंग्रजी-फारसी-उर्दू भाषेतील जे शब्द मराठी म्हणून आपण वापरतो त्याला सावरकरांनी मराठी प्रतिशब्द सुचवले आहेत, त्यातील काही स्वतः सावरकरांनी निर्माण केले आहेत तर काही जुने शब्द पुन्हा सावरकरांनी प्रचलित केले आहेत.

नवे शब्द देताना सावरकरांना बरीच टीका सहन करावी लागली. काहींनी विकृत मराठी विडंबन शब्द सावरकरांच्या नावे खपवण्याचा उपद्व्यापही केला. उदा. रेल्वे सिग्नलला म्हणे सावरकरांनी ‘अग्निरथ गमनागमसूचक ताम्र हरितलोह पट्टिका’ हे नाव सुचवले. ही तद्दन थाप आहे. सावरकरांनी अतिशय समर्पक प्रतिशब्द सुचवले आहेत. 1938 मध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सावरकरांनी भाषाशुद्धीबद्दल आग्रही मत मांडले. आज त्यांनीच रूढ केलेले दूरध्वनी, महापौर, दिनांक, संकलन, चित्रपट आदी शब्द आपण सर्रास उपयोगात आणतो. 

अंदमानात रचले महाकाव्य  –

अंदमानच्या भिंतीवर काट्याकुट्यांनी रचले महाकाव्य
सावरकरांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना आपले मराठी भाषेतील योगदान अजरामर केले. अंदमानच्या काळ्या कोठडीत काळ्यापाण्याची शिक्षा भोगताना कोठडीच्या भिंतींवर काटय़ाकुटय़ांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी म्हणावा लागेल. सावरकरांच्या लिखाणातील शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. एक साहित्यिक म्हणून योगदान देताना सावरकरांनी १० हजारांपेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. त्यांच्या सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते जयोस्तुते, तानाजीचा पोवाडा या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. याशिवाय काळेपाणी, मोपल्यांचे बंड, माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग ही त्यांची साहित्यसंपदा अजरामर आहेत.

मराठी भाषेच्या शुद्धीचे कार्य करण्यात सावरकरांचा खूप मोठा वाट आहे. आणि त्यामुळेच सरकारने माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन एकप्रकारे “वीर दामोदर सावरकर” यांना एकप्रकारे श्रद्धांजलीच अर्पण केली आहे.

सावरकरांना विरोध करणारे काही मराठी व्यक्तिमत्व आज त्यांनी दिलेल्या शब्दांचा वापर करत आहेत याची बहुतेक त्यांना जाणीवदेखील नसावी. आणि खरे सांगायचे झाले तर, जरी त्यांना कळले तर, ते काहीच करू शकत नाही.

स्वा. सावरकरांनी मराठी ला दिलेत असंख्य शब्द –

दिनांक (तारीख) , क्रमांक (नंबर) ,बोलपट (टॉकी) , नेपथ्य, वेशभूषा (कॉश्च्युम), दिग्दर्शक (डायरेक्टर) , चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल) , उपस्थित (हजर) , प्रतिवृत्त (रिपोर्ट) ,नगरपालिका (म्युन्सिपाल्टी) , महापालिका (कॉर्पोरेशन) ,महापौर (मेयर) , पर्यवेक्षक ( सुपरवायझर), विश्वस्त (ट्रस्टी) , त्वर्य/त्वरित (अर्जंट) , गणसंख्या (कोरम) , स्तंभ ( कॉलम) , मूल्य (किंमत)
शुल्क (फी) ,  हुतात्मा (शहीद) , निर्बंध (कायदा) , शिरगणती ( खानेसुमारी) , विशेषांक (खास अंक) , सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन) , नभोवाणी (रेडिओ) , दूरदर्शन (टेलिव्हिजन) , दूरध्वनी (टेलिफोन ) , ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली) , अर्थसंकल्प (बजेट) , क्रीडांगण (ग्राउंड) , प्राचार्य (प्रिन्सिपॉल) , मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर) , परीक्षक (एक्झामिनर) , शस्त्रसंधी (सिसफायर) , टपाल (पोस्ट) , तारण (मॉर्गेज) , संचलन (परेड)
गतिमान , नेतृत्व (लिडरशीप) , सेवानिवृत्त (रिटायर) , वेतन (पगार)

असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.