स्वामी विवेकानंदांचे आदर्श प्रभू श्री राम !
स्वामी विवेकानंदांचे आदर्श प्रभू श्री राम !
अगदी काही दिवसावर रामलला प्राण प्रतिष्ठेचा महायोग येऊन उभा राहिला आहे…
याच उत्सवाचे साक्षी आपले भाग्यशाली नेत्र होणारच आहे. प्रभु श्रीराम हे संपर्ण विश्वासाठी एक आदर्श व्यतिमत्त्व आहे.
अश्या आपल्या प्रभु रामच्या चरित्राचा प्रभाव युवकांचे प्रेरणास्थान असणारे
स्वामी विवेकानंद यांच्यावर झालेले होताच तसेच लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, अॅनी बेझंट आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्थान सुध्दा प्रभु रामचंद्रच होतेच.
स्वामी विवेकानंद यांचे जीवन आणि शिकवण आपल्या साठी नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे. स्वामी विवेकानंदांचा भारतीय समाजासुधारकावरच नव्हे तर प्रोमेन रोलँड, लिओ टॉल्स्टॉय, मॅक्स मुलर, अरनॉल्ड टॉयन्बी, विल ड्युरंट यांसारख्या तत्त्वज्ञांवरही प्रभाव होता. या सर्वांचा असा विश्वास आहे की स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीत शांतता प्रस्थापित करण्याची आणि सामाजिक विकृतींपासून जगाची मुक्तता करण्यासाठीची मोठी शक्ती आहे.
सप्टेंबर 1893 मध्ये शिकागोच्या धर्म संसदेत केलेल्या भाषणामुळे स्वामी विवेकानंदांनी लक्ष वेधून घेतले. न्यूयॉर्क हेराल्डने स्वामीजींबद्दल लिहिले, “ते निःसंशयपणे धर्म संसदेतील सर्वात महान व्यक्ती आहेत. त्याचे म्हणणे ऐकून आम्हांला वाटते की या परिषदेत मिशनरी पाठवणे किती मूर्खपणाचे आहे.”
अशा प्रख्यात व्यक्तीसाठी रामायण आणि प्रभु राम हे प्रेरणास्थान होते. 31 जानेवारी 1900 रोजी स्वामी विवेकानंद यांनी रामायणावर भाषण दिले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणात राम सेतूचा काही संदर्भ दिला. ते म्हणाले, रामाने एक सैन्य गोळा केले आणि त्यासह भारताच्या दक्षिणेकडील बिंदूकडे कूच केले. तिथे रामाच्या वानर सेनेने भारतापासून लंकेपर्यंत समृद्राला जोडणारा एक सेतू बांधला. हा रामसेतू स्थापत्त्याचे उत्तम उदाहरण असून यात दोन्ही संस्कृतीला जोडण्याची ताकद आहे. रामचंद्राला अनुभवायचे असेल तर या सेतुचे साक्षात दर्शन करण्याचे आव्हान त्या काळी स्वामी विवेकांनदांनी तरुणांना केले.
आधुनिक काळातील हिंदू जीवन पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय स्वामी विवेकानंद यांना दिले जाते, ते प्रभू रामचंद्रांचा खूप आदर करीत असत. स्वामी विवेकानंद यांचा प्रभू रामचंद्रांबद्दलचा स्नेह त्यांच्या काही अवतरणांवरून समजू शकतो.
प्रभु राम हे या युगातील आदर्श मूर्ती, सत्याचे मूर्तिमंत, नैतिकतेचे कळस आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदर्श राजा होते
स्वामी विवेकानंद पुढे आपल्या भाषणात बोलतात की प्रभु श्री राम यांच्या प्रेमाचा प्रवाह अगदी चंडाळापर्यंत (बहिष्कृत) वर्गापर्यंत वाहत होता; त्यांचे जीवन समरस होते. स्वभावाने अलौकिक असूनही जगाचे भले करण्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकले अश्या रामाकडून आपण त्याग आणि समर्पण शिकले पाहिजे. ज्याची ख्याती तिन्ही लोकांमध्ये उच्च आहे ज्याचासारखा जगात दुसरा कोणीही नाही, सीतेला प्रिय असणारा ,ज्याचे ज्ञान परम धाम असून ज्याने आपल्या पत्नीसाठी सर्वकाही त्याग केले असा राजाराम एक आदर्श पती का बर आपल्याला वाटणार नाही.
प्रभु राम आणि माता सीता हे संपूर्ण राष्ट्राचे नैतिक आणि दैविक आदर्श आहेत.
स्वामी विवेकानंद पुढे आपल्या भाषणात बोलतांनी तरुणांनी ब्रम्हचर्याचे पालन करताना रामचंद्राचे उत्तम उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याचे सांगितले.
जिथे राम आहे, तिथे काम नाही; जिथे काम आहे तिथे राम नाही. रात्र आणि दिवस कधीच एकत्र असू शकत नाहीत. प्राचीन ऋषीमुनींच्या वाणी आपल्याला सांगतात , “जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल, तर तुम्हाला काम-कांचन (वासना आणि ताबा) सोडावे लागेल.
तरुणांनी आता रामभक्त हनुमानाचे चरित्र आदर्श बनवावे. रामचंद्राच्या आज्ञेनुसार त्याने सागर कसा पार केला ते पहा. त्याला जीवन-मरणाची पर्वा नव्हती! तो त्याच्या इंद्रियांचा परिपूर्ण स्वामी होता.आणि आश्चर्यकारकपणे विवेकी होता. वैयक्तिक सेवेच्या या महान आदर्शावर आता तुम्हाला तुमचे जीवन उभे करायचे आहे. त्याद्वारे, इतर सर्व आदर्श हळूहळू जीवनात प्रकट होतील. प्रश्न न करता गुरूंची आज्ञापालन आणि ब्रह्मचर्य काटेकोरपणे पाळणे – हे यशाचे रहस्य आहे. एकीकडे हनुमान सेवेच्या आदर्शाचे प्रतिनिधित्व करतात, तर दुसरीकडे ते गंभीर धैर्याचे प्रतिनिधित्व करतात, रामाच्या कार्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्यात त्याला कमीपणा वाटत नाही. रामाच्या सेवेशिवाय इतर सर्व गोष्टींबद्दल सर्वोच्च उदासीनता.
अशी मनापासून भक्ती हवी आहे.
स्वामी विवेकानंद यांनी अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांची लोकप्रिय प्रतिमा “मर्यादपुरुषोत्तम” म्हणून पुन्हा प्रतिपादन केली. स्वामीजींसाठी प्रभू रामचंद्र हे एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ आणि आदर्श राजा होते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभु रामचंद्र हे स्वामी विवेकानंदांसाठी नैतिकतेचे प्रतीक होते. भारताला हनुमानासारख्या भक्तीची गरज आहे, असे स्वामी विवेकानंदांना वाटते.
या संपूर्ण स्वामीजींच्या भाषणातून मला एक संघगीतातील एक ओळ आठवते ओळ प्रत्यक्ष आजच्या तरुणांना प्रभू श्रीराम आणि स्वामीजी एक आदर्श व्यक्ती कसे होते आणि त्यांचा साक्षात आपल्या जीवन चरित्रात कसे उतरवता येतील यासाठी हे लिहिलेली ओळ कायम प्रेरणा देणारी आहे.
वीरवृत्ती हनुमान बनो अब श्रीराम सहारा है ।
जाग उठो हे वीर सुपुतो हिंदुस्तान हमारा है ।।
संदर्भ – कर्म योगी
स्वामी विवेकानंद चरित्र
– संकेत राव.