तणावाचे व्यवस्थापन

जगणं सुंदर करणाऱ्या टीप्स - 2

0 367

जगणं सुंदर करणाऱ्या टीप्स – 2

तणावाचे व्यवस्थापन

या लेखमालेतला आजचा हा लेख माझ्या फ़ोर्टी प्लस मित्र आणि मैत्रिणींकरता आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वयाची चाळीशी ओलांडलेल्या साऱ्यांसाठी आहे. चाळीस… पन्नास… साठ या वयोगटातल्या बहुतांश लोकांनी या वयात ब्लड प्रेशर आणि हायपर टेन्शन यांच्याशी दोस्ती केलेली असते. काहींनी तर डायबेटीस नावाच्या पाहुण्याला आपला देह आंदण दिलेला असतो. छातीत धडधडणं, जीव घाबराघुबरा होणं हे आता परवलीचे शब्द झालेयत. तुम्ही अनावश्यक स्ट्रेस घेताय त्याचं हे दुश्चिन्ह आहे.

आधी मला वाटायचं की ब्लड्प्रेशर, डायबेटिस, हायपर्टेन्शन हे शहरी माणसांचे रोग आहेत. महानगरांत स्ट्रेस हा आपसूक येतच असतो. परवा आमचे कणकवलीतले रिक्षावाले मित्र डगरे म्हणाले, “मागच्या महिन्यात बीपी आणि डायबेटिस एकाच वेळी झाल्याचं समजलं आणि निराश झालोय साहेब! सगळ्याच गोष्टींतून मन उडालय.” तेव्हा मला धक्काच बसला. कठोर मेहनत करणाऱ्या रिक्षावाले, शेतकरी , कामगार बंधू यांनाही आता हे ताण आणि तणाव विळखा घालू लागलेयत.

मुळात ताण आणि तणाव या गोष्टीच न टाळता येण्याजोग्या आहेत. ताण हा आवश्यक आहे आणि तो येणारच याची पक्की खूणगाठ मनाशी बांधून ठेवा. ताण टाळणे ही भ्रामक समजूत आहे. महत्वाचं आहे तुम्ही त्याचं व्यवस्थापन कसं करता ते. म्हणजे बघा, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. तुम्ही ताण न घेता आराम करत राहीलात तर पास कसं होणार? तुम्ही ताण घेता तेव्हाच झपाटल्यासारखं काम करता ना! महत्वाचं असतं तो किती मर्यादेपर्यंत घ्यायचा आणि तो किती वेळ घ्यायचा. तुम्ही हातात पाच किलोची वजनदार पिशवी घेऊन घरी चाललायत. घर आलं. आता पिशवी ठेवा खाली. मुक्कामावर पोहोचल्यावर देखील जर तुम्ही हातात पिशवी घेऊन उभे राहीलात तर हात दुखायला लागेल. ताणतणावाचं अगदी असंच असतं. आपलं काम झालं की तो झटकून टाकायचा.

ताणताणावाचं आणखी एक कारण आहे विनाकारण चिंता. मुलाच्या नोकरीची चिंता, मुलीच्या लग्नाची चिंता, म्हातारपणी कसं होणार याची चिंता.. अशा एक ना अनेक चिंता आपलं मन पोखरत असतात आणि देहामध्ये अनावश्यक ताण निर्माण करत असतात. तुमची एनर्जी चिंता करण्यात वाया घालवण्यापेक्षा त्या समस्येवर उपाय शोधण्यात खर्च केलीत तर चिंता करावी लागणार नाही.

काही माणसांना त्यांच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे स्ट्रेस येतो. आता यात पुन्हा प्रकार बघा कसे आहेत. माझ्याकडे एक तरुण मुलगा काऊन्सिलिंगसाठी यायचा. त्याची आई त्याला अभ्यासावरुन सारखी बोलायची. तिच्या सततच्या बोलण्यामुळे त्याची मनस्थिती बिघडली होती. आता याच्या अगदी उलट; एक भगिनी फोनवर सांगत होत्या, आमचे हे घरात अजिबात बोलतच नाहीत. मला तर बाई वेड लागायची पाळी आलीय. ऑफीसमध्ये काम करणारे एक ग्रुहस्थ आपल्या बॉसबद्दल सांगत होते, अगदी जेवढ्यास तेवढं बोलतात. अगदी कामापुरतं. आम्हाला तर फार टेन्शन येतं बुवा. आता ही तीनही उदाहरणं बघा, कुणाला जास्त बोलल्यामुळे ताण, कुणाला बोलतच नाही म्हणून स्ट्रेस, तर कुणाला जेवढ्यास तेवढं बोललयाने टेन्शन. थोडक्यात काय तर कोणत्या गोष्टीचा ताण घ्यायचा आणि तो किती प्रमाणात घ्यायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. स्ट्रेस उर्फ ताण उर्फ़ टेन्शन या गोष्टीचं एक वैशिष्ट्य आहे. या गोष्टी रोजच्याच होऊ लागल्या की शरीरात त्या साचत जातात. ह्रुदयाची किंवा शरीरातल्या इंद्रियांची किंबहुना कोणत्याही गोष्टीची ताण सहन करण्याची एक क्षमता असते. ही क्षमता संपली की तिथे विविध विकारांचा जन्म होतो. आणि त्यातनं मग ब्लडप्रेशर, हायपरटेन्शन, मधुमेह अशा तत्सम व्याधी प्रगट होतात.

आणि या व्याधीमित्रांची एक गंमत आहे बरं का, मघापासून तुम्हाला सांगेन, सांगेन म्हणता सांगायचीच राहिली, हे पाहुणे एकदा आपल्या घरात वस्तीला आले की कोणत्याही उपायांनी बाहेर पडत नाहीत. पूर्ण घर काबीज करतात. अगदी स्मशानवाटेपर्यंत.

तेव्हा आता, झटका तुमचे सारे ताण तणाव आणि मनमोकळं हसा पाहू एकदा! पुन्हा भेटू या लेखमालेतल्या पुढल्या लेखात. तोवर तुमच्या प्रतिक्रियांचा इंतजार करतो. 

(photo – google)

 

  • प्रसाद कुलकर्णी
    Motivational Speaker

प्रसाद कुलकर्णी, मुंबई. हे सुप्रसिद्ध कवी, चित्रपट गीतकार, उत्कृष्ट वक्ता व लेखक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.