तोलोलिंग पर्वत शृंखलेवर प्राणांची बाजी

कारगील विजय दिवस.

0

तोलोलिंग पर्वत शृंखलेवर प्राणांची बाजी.

जुन,२०२० मधे भारत चीन सीमा विवादा दरम्यान गलवान नदीच्या खोऱ्यात शहीद झालेल्या २० सैंनिकांसाठी भारतभर आक्रोशाची वावटळ निर्माण झाली.सर्वीकडे याच शूरवीरांचे चर्चे आहेत.यांच्याच प्रमाणे,कारगिल युद्धातही भारताच्या वीर सैनिकांनी प्राणार्पणांची शृंखला निर्माण केली. २१ वर्षांपूर्वी,०३ मे ते २६ जुलै,१९९९ दरम्यान कारगिल युद्ध झाल.२७ जुलै, २०२०ला साजरा होणारा कारगिल विजय दिवस,अशाच जांबाजांनी केलेल्या बलिदानाच्या ओजस्वी कथांच पुनर्स्मरण करतो. ऑपरेशन विजय मधे (कारगिल युद्धाच सैनिकी नाव) सरकारनी सेनेला झोझीला खिंडीच्या पूर्वी क्षेत्रातच कारवाई करण्याचे आणि लाईन ऑफ कंट्रोल पार न करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.त्यामुळे;एलओसी पार करत कारगिलच्या पश्चिमेकडून पाक्यांना घेरण्याच्या भारतीय सेना आणि वायुसेनेच्या प्लान्सचा बोजवारा उडाला आणि भारतीय लष्कराच्या जाळ्यातून पराजीत पाकिस्तान्यांच्या सुखरूप माघारीचा मार्ग मोकळा झाला.या युद्धात रोज नवीन प्लॅन्स बनत असत,रोज त्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावत होते/असत. तोलोलिंग व पॉईंट ४७००च्या चकमकी,याच प्रक्रियेचा भाग होत्या.कारगिल युद्धात तोलोलिंग पर्वत शृंखलेतील तोलोलिंग शिखर,हम्प,पॉईंट ५१४० नॉल,थ्री पिंपल्स,ब्लॅक रॉक आणि पॉईंट ४७०० वरील विजयाच योगदान फार महत्वाच/मोठ आहे.

कारगील क्षेत्रात पाकिस्ताननी सीमेवरील १८-२१,००० फुटांच्या पर्वतराजींवर घुसखोरी केली.भारतीय सेनेच्या बेसेस १०-११,००० फुटांवर असलेल्या कारगिल खोऱ्यात होत्या. या संपूर्ण इलाक्यात तेंव्हाही झाडांच नामोनिशाण नव्हत आणि आताही नाही.खोऱ्यातून पर्वतांच्या शिखरांवर जाण्यासाठी; अणकुचीदार दगड,हिमालयातील नवनिर्मित पर्वतांची भुसभुशीत दगडी माती आणि पाय ठेवला की गडगडणाऱ्या धोंड्यांची खडी चढ़ाई असलेल्या सुळक्यांवरून (स्पर्स) वर चढत जाव लागत.प्रत्येक चढत्या पाऊलाबरोबर श्वास ही चढतो आणि त्यामुळे अतिशय लवकर थकवा येतो.अशा परिस्थिती आणि वातावरणात सामरिक करवाई करण्यासाठी;सैनिकांची शारिरीक क्षमता वृद्धिंगत करण,त्यांना या अतिशीत वातावरणात लागू असणारे कपडे/गणवेश व प्रशिक्षण देण आणि सुयोग्य वातावरण रुलण प्रक्रीयेचा (प्रॉपर अक्लमटायझेशन प्रोसेस) अंगिकार करावा लागतो.तोलोलिंग पर्वत शृंखलाही याला अपवाद नव्हती.
कारगिल युद्धाच्या वेळी,युद्ध जिंकण्यासाठी त्या क्षेत्रात असलेल्या श्रीनगर लेह महा मार्गापासून ४-५ किलोमीटर्स दर असलेल्या तोलोलिंग पर्वतीय शृंखलेवर भारतीय सेनेचा कबजा होण अत्यावश्यक होत.कारण तेथे असलेले पाकिस्तानी सैनिक तेथून त्या रस्त्यावर अविरत नजर ठेवत,अखंड व अचूक आर्टिलरी फायर आणवत होते.हा महा मार्ग गाड्यांच्या दळणवळणासाठी मोकळा करण्यासाठी मे,१९९९पासूनच भारतीय सेना,तोलोलिंग शृंखला हस्तगत करण्याचे अथक प्रयत्न करत होती.तोलोलिंग काबीज केल्यामुळे घुसखोर पाक सेनेला मोठा मनोवैज्ञानिक हादरा बसला असता.तोलोलिंग काबीज करण्याची जबाबदारी आठव्या माउंटन डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग,मेजर जनरल मोहिंदर सिंग पुरींना देण्यात आली.युद्धाच्या सुरवातीला ही डिव्हिजन (१५,००० लढावैये सैनिक) शरीफाबादला होती. ऑपरेशन विजय सुरु होताच त्यांना झोझीला खिंडीच्या मार्गातून द्रास मश्कोह सेक्टरमधे जाऊन ०१ जूनपर्यंत तेथील जबाबदारी हाती घेण्याचे आणि तेथील पाकिस्तानी आक्रमणाचा बिमोड करण्याचे आदेश मिळाले. द्रास मश्कोह क्षेत्रात आल्यावर जनरल पुरींनी ७-८ दिवसांत;उत्तुंग शिखरांची टेहाळणी (रिकॉनिसन्स) कशी करायची, निमुळत्या सुळक्यांवर (स्पर्स) कसा हल्ला करायचा,१५५ मिलिमीटर्स व्यासाच्या बोफोर गन्सचा वापर डायरेक्ट फायरिंगमधे कसा करायचा; याच प्रशिक्षण देऊन आपल्या युनिट्सना युद्धातील चकमकींसाठी तयार केल.या कामासाठी आवश्यक असणारा तोफखाना (आर्टिलरी युनिट्स/गन्स) १५ कोअर कमांडर,लेफ्टनन्ट जनरल किशनपाल यांनी उपलब्ध करून दिला.
आठवी माउंटन डिव्हिजन द्रासमधे येण्या आधी,तोलोलिंग काबीज करण्याची जबाबदारी १८ ग्रेनेडियर बटालियनला देण्यात आली.पण ते यात सफल होऊ शकले नाहीत आणि त्यांनी, पोचले होते तेथेच, ठाण मांडल. डिव्हिजन द्रासमधे आल्यावर,१० जूनला जनरल साहेबांनी २ राजपुताना रायफल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर,कर्नल रविन्द्र नाथ यांना आपल्या प्लॅन्सची कल्पना (आउट लाईन) देत,सर्व साधक बाधक विचार करत तोलोलिंग काबीज करणासंबंधी सविस्तर योजना बनवण्याचे आदेश दिलेत.कर्नल साहेबांनी सुयोग्य प्लॅन बनवला. जनरल मोहिंदर सिंगनी तो मंजूर केला आणि १३ जूनला संपूर्ण तोफखान्याच्या आगीखाली (अंडर फायर ऑफ ऑल आर्टिलरी गन्स), २ राजपुताना रायफल्सनी तोलोलिंगवर हल्ला चढवला. कर्नल रविन्द्रनी डावपेचात्मक कमतरता शोधून (टॅक्टिकल ओपनिंग) एका बाजूनी दोन आणि दुसऱ्या बाजूनी दोन रायफल कंपन्या (१०० सैनिक) वापरल्या. .तोलोलिंगवर बटालियनची पकड मजबूत होईस्तोवर सूर्योदय झाला. कारवाईत अनेक सैनिक धारातीर्थी पडले,अनेक जखमी झाले,मात्र शिखर अजूनही तेथे मागील एक महिन्यापासून ठाण मांडून बसलेल्या पाकिस्तानच्याच ताब्यात होत.
तोलोलिंगची पहाडी हाती आल्यामुळे,कारगिल युद्धाच पारड भारताच्या बाजूनी झुकल आणि त्यात भाग घेणाऱ्या सेनेला कमालीच स्फुरण चढल.पहाडीवर कबजा झाला असला तरी पाकी छोट्या छोट्या संख्येत अजूनही शिखर नि सुळक्यांवर आहेत अशी खबर सकाळी कर्नल रवीन्द्रांनी जनरल पुरींना दिली.सुळके/पहाडीच्या एक एक यार्डवर कबजा करत,राजपुताना रायफल्सनी तोलोलिंग शिखर पादाक्रांत करण्याचा मार्ग मोकळा केला आणि १०च्या सुमारास तोलोलिंगवर कब्जा झाल्याचा सिग्नल डिव्हिजनल हेडक्वार्टरला दिला.राजपुताना रायफल्सच्या सैंनिकांनी जीवतोड मेहनत केली.ते तीन दिवस व रात्रीच्या परिश्रमांनी थकले होते.बारुद,माती आणि घामाच्या दरवळींनी त्यांचे गणवेश माखले होते.त्यांना रेस्ट आणि रिफिटची आवश्यकता होती.मिशन तोलोलिंगनंतर भारतीय सेनेच पुढील लक्ष्य मिशन हम्प आणि मिशन पॉईंट ५१४० होत.
तोलोलिंगपासून वर जाणाऱ्या पायवाटेवर,अंदाजे ७५० मीटर्स दूर असलेला हम्प (पहाडावर आलेला वाशींडांसारखा छोटा फुगवटा) आणि त्यापुढे ८०० मीटर्स दुर असलेल्या पॉईंट ५१४०वर पाकी सैनिक बसलेच होते.हम्पपासून या पॉईंटकडे जाण्यासाठी ७०-८० डिग्रीची खडी चढाई आहे.हम्प काबीज करण्याची जबाबदारी १८ ग्रेनेडियर्सला देऊन,पॉईंट ५१४०ताब्यात घेण्याचे आदेश १३ जम्मू काश्मिर रायफल्स बटालियनला देण्यात आलेत. लक्ष्यांची टेहाळणी केल्या गेली,प्लान्स तयार झालेत आणि वीर ग्रेनेडियर/जॅकरीफचे सैनिक हम्प/पॉईंट ५१४० वरील हल्ल्य्यासाठी सज्ज झालेत.१४ जूनला तोलोलिंगहून समोर सरकत असतांनाच,पाकिस्तान्यांनी १८ ग्रेनेडीयर्सवर तूफ़ान फायर सुरु केल दुष्मन बंकर्समधे आणि भारतीय सैनिक उघड्यावर/ मोकळ्यात असल्यामुळे ग्रेनेडीयर्सची मोठ्या प्रमाणात जीव हानी झाली. त्यांची आगे कूच मंदावली. पण हिंमत न हारता,ते हळूहळू,यार्ड बाय यार्ड,पुढे सरकत/जातच राहिले. शेवटी १३ जॅकरीफच्या मदतीने १६-१७ जूनला हम्पवर भारताचा कबजा झाला.
पॉईंट ५१४०ला काबीज करण्याची जबाबदारी १३ जम्मू काश्मिर रायफल्स बटालियनची होती. आठव्या माउंटन डिव्हिजनकडे २ नागा आणि १८ गाढवाला रायफल्स या बटालियन्सही होत्या. जनरल मोहिंदर पुरींनी त्यांना,दक्षिण पश्चिम दिशेकडून केलेल्या डायव्हर्शनरी अटॅकसाठी वापरल.यामुळे १३ जम्मू काश्मिर रायफल्सवरील पाकिस्तानी दबाव कमी झाला आणि ते वेगानी पॉईंट ५१४०कडे सरकू शकले. १९ जूनला पॉईंट ५१४० काबीज झाला आणि मग कॅप्टन विक्रम बात्रांनी त्यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल वाय के जोशी (संप्र्त नॉर्दर्न आर्मी कमांडर) यांना पाठवलेल्या “ये दिल मांगे मोअर” अर्थात “आम्ही फतेह हासील केली” या अर्थाच्या,युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांच्या हृदयात आजही चिरतरुण असणाऱ्या रेडियो संदेशानी आकाश दणाणून गेल.पाकिस्तानचे अनेक सैनिक या दोन चकमकींमधे अल्ला प्यारे झालेत,काही खोल दऱ्यांमधे पडले तर उर्वरितांना भारतीय सेनेनी दफन केल.
कारगिल युद्धातील प्रत्येक चकमकीमधे भारतीय सैनिकांनी केलेल्या प्राणार्पणाच्या वीरगाथा आहेत. पॉईंट ५१४०वरील विजयामुळे भारतीय सैंनिकांचा जोश अनेक पटींनी वृद्धिंगत झाला. प्रत्येक युनिट,दिलेल लक्ष्य (टास्क) पूर्ण करण्यासाठी जीवाच रान करत होत.रेस्ट आणि रिफिटसाठी गेलेली २ राजपुताना रायफल्स दुगण्या जोमानी रणांगणात उतरली. २१ जूनला आठव्या माउंटन डिव्हिजनला नॉल,थ्री पिंपल्स, ब्लॅक रॉक आणि पॉईंट ४७००ला काबीज करण्याचे आदेश मिळालेत.२ राजपुताना रायफल्सला नॉल,थ्री पिंपल्स व ब्लॅक रॉक आणि १८ गढवाल रायफल्सला पॉईंट ४७०० काबीज करण्याची जबाबदारी देण्यात येऊन तसे प्लॅन्स तयार करण्यात आले. नॉल रस्त्यापासून दूर असल्यामुळे, चकमकींच्या वेळी पुरवठा शृंखलेवर पडणारा दाब कमी करण्यासाठी,या सर्व बटालियन्सच्या लॉजिस्टिक बेसेस बऱ्याच समोर न्याव्या/आणाव्या लागल्या.सर्व तयारी झाल्यावर २६जूनला हल्ला आणि २७ व २८ जूनला या ठिकाणांवर पूर्ण कबजा करण्याच निश्चित झाल.
या चकमकींदरम्यान मेजर पद्मपाणी आचार्य,कॅप्टन एन केंगुरसे आणि लेफ्टनन्ट विजयंत थापर समेत अनेक सैनिक शहिद झाले.या विजयात बोफोर्सच्या आर्टिलरी फायरचा फार मोठा वाटा आहे. डायरेक्ट आर्टिलरी फायरची ही नवीन तऱ्हा पाहून पाक्यांच्या गोट्या कपाळात गेल्यात.कॅप्टन एन केंगुरसे अत्यन्त अरुंद पायवाटेनी पुढे सरकत होते. वर अँकर करण्यासाठी त्यांनी हूक लावलेला दोर फेकताच वर बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या दगडफेक सुरु केली. त्या खडकाळ पायवाटेवर जोडे घालून चढ़ण कठीण असल्यामुळे केंगुरसेनी प्यात्तलेजोडे काढून टाकलेत आणि वर अनवाणी धाव घेतली. बंदूक,बायनेट आणि कुकरीनी त्यांनी अनेकांना अल्ला प्यारे केल्यावर भारतमातेचा हा सुपूत्र धारातीर्थी पडला.
रेडियो सेट्सवर मेसेजेसची अविरत शृंखला सुरु होती. विजयाच्या बातम्यांबरोबरच साथीदार गमावल्याच्या बातम्यांचाही ओघ लागला होता. असेच माझे सहकारी,लेफ्टनन्ट विजयंत थापर या हल्ल्या दरम्यान एका पाषाणामागे पोझिशन घेत परिस्थितीचा आढावा घेत होते.त्यांच्यापासून थोड्याच दूरीवर एक पाकिस्तानी मशिनगन आग ओकत होती. विजयंतना त्याच्या सैनिकांची काळजी वाटत होती,त्यांच्यावर होणाऱ्या मशिनगन फायरला बंद करण्याची फिकर लागली होती.विजयंतनी पाषाणामागून झेप घेत पाक मशिनगनवर करारा हल्ला केला. मशिनगन चालवणाऱ्या दोन्ही पाक सैनिकांना विजयंतनी कंठस्नान घातलं खर पण दूर पोझिशनमधे असलेल्या एका पाक सैनिकानी त्यांच्या डोक्याचा वेध घेतला आणि केवळ २० वर्षांचा,जेमतेम मिसरूड फुटलेला हा तरुण चिरंतन मातृभूमीच्या कुशीत समावला. हा “हाय कँज्युअल्टी अटॅक” होता. या विजयानंतर लेहला जाणारा महा मार्ग जवळजवळ खुला झाला.आठव्या माउंटन डिव्हिजननी कारगिल युद्धात मोलाची कामगिरी केली. त्यांनी या युद्धात तीन परमवीर चक्र,आठ महावीर चक्र,बेचाळीस वीर चक्र आणि १०६ सेना मेडल्स (गॅलंट्री) अर्जित केलेत. मेजर जनरल मोहिंदर सिंग,महावीर चक्र,हे पुढे लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले.
स्वातंत्र्यासाठी किंमत द्यावी लागते जी शूर वीरांच्या बलिदानांद्वारे चुकती केल्या जाते.कारगिल युद्धात भारताचे ३८२ सैनिक धारातीर्थी आणि १७३० वर जबर जखमी झाले. हे सर्व तिशीच्या आत बाहेरचे तरुण होते.यातील प्रत्येकानी,तिरंग्याला साक्ष ठेऊन घेतलेल्या शपथेनुसार,शौर्य आणि बलिदानाची भारतीय सेनेची परंपरा कायम राखली.ऑपरेशन विजय आणि आठव्या माउंटन डिव्हिजनमधील सेनाधिकारी/सैनिकांच अतूट धैर्य,अवर्णनीय व अटळ साहस,कठोर प्रशिक्षण,जीवावर बेतणाऱ्या कुठल्याही संकटाला हसत तोंड देण्याची धडाडी,देशासाठी प्राणार्पण करण्याची जिद्द आणि त्यांनी प्रत्येक चकमकीतील दर्शविलेल्या शौर्य व साहसाच्या लोककथा/दन्तकथा निर्माण होऊ शकतात ज्या भावी तरुणाईच रोल मॉडेल्स बनतील. एव्हरी कमांडर वॉज लिडिंग फ्रॉम फ्रंट विथ वन सिंगल ऑर्डर “फॉलो मी”. जगातील फार कमी लष्करांमधे असधडाडीच नेतृत्व बघायला मिळत.
सामान्य नागरिक २७ जुलैला कारगिल युद्धात शहिद झालेल्या सैनिकांना नक्कीच आदरांजली वाहील. सरकार व राजकारण्यांसाठी कदाचित हा एक वायफळ सोपस्कार असेल कारण आजही अनेक परिवारांच्या सदस्यांना, शहिदांना जाहीर झालेल्या सरकारी मदतीसाठी खेटे घालावे लागताहेत.संथ व भ्रष्टाचारी सरकारी पद्धतीमुळे, त्यांच्यासाठी लागू झालेल्या योजनांचा लाभ शहिदांच्या कुटुंबियांना सहजा सहजी मिळत/मिळू शकत नाही.आजचा तरुण सेनेत यायला नाखूष असण्याच कदाचित हे देखील मुख्य कारण असू शकत.सरकार व जनतेनी याकडे गंभीरतेने लक्ष देण आवश्यक आहे कारण जर देशातील युवकांच्या मनातील देश प्रेमाची जोत सदैव प्रज्वलित राहिली तरच लष्कर/सेनेत कारगिल युद्धातील शहिदांसारखे वीर तरुण दाखल होतील. ए स्मार्ट सॅल्यूट टू द सॅक्रिफाईस ऑफ यंग आर्मी ऑफिसर्स अँड मेन हू गेव्ह देअर लाइव्ह्ज इन कारगिल फॉर अवर बेटर टूमॉरो.

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लेखन सुवर्ण मदिरातील झंझावात, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

Leave A Reply

Your email address will not be published.