ताटात ’चायनीज’ टाकू नये…!

0

ताटात ’चायनीज’ टाकू नये…!

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’ असे अभियानच सुरू केले आहे. आपण लहान मुलांना सांगतो -पानात काही टाकू नका- अगदी तसाच सल्ला जिनपिंग यांनी दिला आहे. चीनमध्ये कोणतेही सरकारी अभियान हे महाप्रचंड लाटेसारखे असते तसेच हे ’स्वच्छ ताटांचे’ अभियानही मोठ्या प्रमाणावर राबविले जाते आहे, जाईल. कम्युनिस्ट सरकारची यंत्रणा, संपूर्ण शासकीय़ नियंत्रणातील प्रसार माध्यमे आणि अगदी खाद्यपेय-हॉटेल्स संघटनाही यामध्ये सहभागी झाल्या आहेत. चीनमधील एकपक्षीय हुकुमशाही यंत्रणेत ते जोरकसपणे राबविले जाईल, यात काहीच शंका नाही.

वस्तुत: अशाच प्रकारच्या अभियानाची घोषणा जिनपिंग यांनी २०१३ मध्येही केली होती. पण, या वेळेसच्या घोषणेला पार्श्वभूमी कोव्हिडची, चीनमध्ये आलेल्या पुरांसारख्या नैसर्गिक आपत्तींची आणि त्यातून निर्माण झालेल्या अन्नटंचाईची आहे. त्यातून, अन्नधान्याच्या आणि चीनी जेवणात महत्वाचा घटक असलेल्या मांसाहारी अन्नाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जेवणादरम्यान अन्न वाया जाऊ नये यासाठी चीनी अध्यक्षांनाच लक्ष घालावे लागले आहे.

चीनी सरकार शक्यतो नागरिकांच्या खाद्यसंस्कृती आणि खाण्याच्या सवयी यांमध्ये हस्तक्षेप करीत नाही. माओंच्या काळात लोकांना मिळणार्‍या अन्नधान्यावर बंधने आली होती आणि लोकांमध्ये त्याची प्रतिक्रियाही उमटली होती. त्यानंतर, मात्र सहसा असे कधी करण्यात आलेले नाही. कारण, चीनी समाजात जेवण, टेबल मॅनर्स, खाण्यापिण्याचे विधिनिषेध आणि संकेत या बाबी संवेदनशील आहेत. त्यांचे पालन करण्यावर चीनी माणसाचा कटाक्ष असतो. आणि यातच भरपूर अन्न वाया जाण्याचे इंगित आहे.

आपल्याकडे महाराष्ट्रात ताट कसे वाढावे याचे नियम आहेत. डावीकडे मीठ-लिंबू वाढण्यापासून या नियमांची सुरुवात होते. काळाच्या ओघात आणि या संस्कृतीची माहितीच नसणे या कारणांमुळे त्याचे सरसकट पालन होत नाही. मात्र, चीनमधील घरांमध्ये या खाद्यसंस्कृतीला आणि खाद्यशिष्टाचाराला प्रचंड महत्व आहे. जेवताना ताटातील आणि टेबलवरील सगळे अन्न संपणे हे यजमानासाठी कमीपणाचे ठरते. त्यामुळे, आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न तयार करणे, टेबलवर मांडणे, ऑर्डर करणे हे प्रकार होतात. जेवणाच्या अखेरीस आपल्या ताटात काहीच न उरणे हे यजमानाचे मन दुखावणारे असल्याने पाहुण्यालाही त्याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे, अगदी तुडुंब पोट भरले, आता खाऊ शकणार नाही इतका दिलेर पाहुणचार तुम्ही केलाय हे संकेतातून मांडण्यासाठीही पानात काही पदार्थ तसेच ठेवले जातात. शिवाय, मोठाल्या मेजवान्या देणे हे चीनी शिष्टाचाराचे प्रतिक आहे. सत्तेच्या आणि उद्योगक्षेत्राच्या ’एलिट’ वर्तुळात अशा मोठ्या मेजवान्या हा नित्याचा भाग आहे. तिथेही हे शिष्टाचार पाळले जातात. ताटात अन्न उरणे हे श्रीमंतीचे आणि सुबत्तेचेही लक्षण मानले जाते. इतिहासातील अनेक वर्षे उपासमार आणि दुष्काळासारखी संकटे अनुभवल्याने नंतरच्या काळात असे नियम तयार होत गेले असावे असाही अंदाज काही ठिकाणी मांडण्यात आला आहे. अशा सगळ्या प्रकारांमुळे चीनी अन्न वाया जाण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. एका संदर्भानुसार दरवर्षी चीनमध्ये वाया जाणार्‍या अन्नातून सुमारे २० लाख लोकांना जेवायला देता येऊ शकते. चीनचा ७० टक्क्यांपेक्षा अधिक कचरा हा टाकलेल्या अन्नामुळे निर्माण होतो. जिनपिंग यांनी राबविलेल्या याच मोहिमेचा रोख अशा अनेक गोष्टी नियंत्रणात आणण्याकडे आहे, असे सांगितले जाते.

या व्यतिरिक्तही अनेक चीनी खाद्य शिष्टाचार आहेत आणि त्यांची माहितीही रंजक आहे. तुम्हाला जेवण नुसते आवडून चालत नाही किंवा ढेकर देण्याने भागत नाही. आम्ही भरपूर खाल्ले, जेवण प्रचंड आवडले आणि आता जेवणाच्या स्टिक्सच्या अग्रभागावर मावेल इतकेदेखील आम्ही खाऊ शकत नाही हे तुम्हाला यजमानाच्या नजरेस आणून द्यावे लागते. जेवणाच्या पसंतीबद्दल तुमच्या भावना व्यक्त करणे महत्वाचे असते.

भात हे प्रमुख अन्न आणि त्याबरोबर इतर पदार्थ असे चीनी जेवणाचे स्वरूप असते. जेवताना सर्वाधिक ज्येष्ठ, प्रमुख व्यक्ती किंवा शिक्षक यांनी कुठे बसावे याचे नियम आहेत. खाण्याच्या स्टिक्स वेगळ्या आणि वाढण्याच्या वेगळ्या. दरम्यान, एखाद्याबद्दल अत्याधिक आपलेपणा दाखवायचा असल्यास आपल्या स्टिकसनी त्याला पदार्थ वाढण्याचीही एक पद्धत आहे. कोव्हिडच्या काळात अशाच काही पद्धती चीनी नागरिकांनी सोडून द्यावा असेही एक आवाहन काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. आपल्या स्टिक्स अन्नात उभ्या रोवून ठेवू नये असाही एक संकेत आहे. त्याचा संबंध चीनी पूजापद्धतीशी असल्याने जेवताना तसे करणे निषिद्ध ठरवले आहे. दरम्यान, हातात चॉपस्टिक्स आहेत आणि वेळही आहे म्हणून प्लेटसवर अलगद ताल धरला असे काही चालणार नाही. हा पंगतीत बसलेल्या ज्येष्ठांचा अपमान समजला जाईल.

हे आणि असे अनेक नियम चीनी जेवणपद्धतीत आहेत. आपल्या या प्राचीन शेजार्‍याचा इतिहासही समृद्ध आहे आणि मुख्य म्हणजे तो लिखित स्वरुपात आहे. याच प्राचीन इतिहासात चीनची खाद्यसंस्कृती विकसित होत गेली आहे. बदलत्या काळानुसार आणि नव्या पिढीनुसार त्यात बदलही होत गेले आहेत. एखादा देश मोठा होतो तेव्हा तो केवळ सामरिकदृष्ट्या वर्चस्व गाजवित नाही. आपल्या संस्कृतीतील गोष्टी जगाने स्वीकाराव्या यासाठीही तो ’सॉफ्ट पॉवर’ वापरत असतो. साहेबांचे क्रिकेट, अमेरिकनांचे संगीत आणि चित्रपट तशी ही चीनची खाद्य संस्कृती. आपला ’योगा’ ही त्याच गटातला. व्यापक राजकारणाचाच तो एक भाग असतो. आणि आपल्या राजकारणासाठी चीन तर अतिमहत्वाचा. ’सॉफ्ट पॉवर’ चीनी खाद्य आपण स्वीकारले आहे पण एकंदर चीनी समाजाबद्दल, संस्कृतीबद्दल आपल्याला फारसे माहिती नसते. आपली मान वळली की पश्चिमेकडे जाते पण येणारा काळ हा या उत्तर-पूर्वेकडील शेजार्‍याकडे नजर लावून बसण्याचा आहे हे सांगायला आता तज्ज्ञांची गरज उरलेली नाही.

लेखक हे महाराष्ट्र टाइम्स, नागपूरचे पत्रकार आहेत. प्रोजेक्ट मेघदूत या प्रकल्पाचा भाग म्हणून त्यांनी देशभरातील विविध प्रदेशात प्रवास केला आहे. भारतीय मॉन्सून, पावसाचे आगमन, स्थानिकांचे अंदाज, त्यांचे त्याबद्दलचे ज्ञान, साहित्य, परंपरा आणि समजुती, पावसाचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम अशा विविध पैलूंचा अभ्यास या प्रकल्पातर्गत केला जातो. याशिवाय ही विविध कारणांसाठी त्यांनी निरनिराळया प्रदेशामध्ये प्रवास केला आहे. शिक्षण, संस्कृती, वने आणि वन्यजीव, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात. दैनंदिन पत्रकारितेच्या जोडीने ते मराठी आणि इंग्रजीत ब्लॉग लेखन करीत असतात. याशिवाय विविध इंग्रजी आणि मराठी नियतकालिकांमधूनही त्यांचे लेखन प्रकाशित होत असते. मो.बा. 7775095986 mandarmoroney81@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.