वराती मागून घोडे

0
कुशल जवळ काही गाई  होत्या त्या गाईंचे दुध विकून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. कुशल ज्या गोठ्यात गाई बांधत असे त्या गोठ्याला कुंपण नव्हते. त्यामुळे गाईंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही दिवसापूर्वी गावात वाघ येऊन वाघाने गाई मारून खाल्याचा घटना ताज्या होत्या त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. अनेक लोकांनी आपली जनावरे वाघाने फस्त करू नयेत यासाठी उपाययोजना केल्या होत्या.
विजय हा कुशलचा अतिशय चांगला मित्र होता. त्याने कुशलला सांगितले अरे कुशल तुझ्या गाई वाघाने फस्त करू नयेत म्हणून तू गोठ्याला कुंपण का करून घेत नाहीस?. कुशलने सांगितले अरे माझा पण विचार चालू आहे गोठ्याला कुंपण करून घ्यायचा पण वेळ मिळत नाही. विजयने त्याला मित्र म्हणून सांगितले अरे दादा उशीर करू नकोस आणि लवकर हे काम करून घे.
*पण काही ना काही कारणामुळे कुशलने गोठ्याला कुंपण घालायला दिरंगाई केली. शेवटी एक दिवस त्याच्या घरच्यांच्या तगाद्या मुळे त्याने कुंपण तयार केले आणि दुसऱ्या दिवशी लावायचे ठरवले. पण त्याच रात्री वाघाने त्याच्या सगळ्या गाई मारून फस्त केल्या. कामात दिरंगाई केल्यामुळे कुशलच्या गाई पण गेल्या आणि केलेलं कष्ट पण गेले. गोष्ट वेळेवर केली तरच तिचा उपयोग होतो वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग होत नाही याचा अनुभव त्याला आला.*
करोनाच्या काळांत पण जनतेला असाच अनुभव आला असेल तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करोनाचा उद्रेक झाल्यापासून तुम्हाला नजरेस पडले का? निवडून आल्यापासून तुम्हाला यांचे कधी दर्शन झाले का?  लॉकडाऊनच्या काळात हि मंडळी कुठे लपून बसली होती? तुमची विचारपूस केली का तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली गेली का ? या काळात रस्त्यावर उतरून समाजपयोगी काम केलेले लोकप्रतिनिधी खूपच कमी सापडतील.
पण जसा जसा लॉकडाऊन उघडेल तशी तशी हि मंडळी मशरूम सारखी बाहेर पडतील आम्ही किती समाजपयोगी कामे केली आहेत याचे दाखले दिली जातील. वेळ निघून गेल्यावर आम्ही तुमच्यासाठी काय काय करतोय यासाठी फुटकळ कामे सुरु केली जातील, त्याची जाहिरातबाजी सोशल मिडियावर केली जाईल.
करोना मुळे भाववाढ झाली आहे त्यामुळे तुम्हाला अजून आर्थिक भार सोसावा लागेल आणि नवीन भाववाढ कशी योग्य आहे. नवीन कर कसे वाढवले पाहिजेत याचे नसलेले ज्ञान पाजळतील बसतील आणि हे सगळे तुमच्यासाठी चालले आहे बर का अशी दर्पोक्ती मिरवतील. त्यांच्या जवळचे खुशमस्करे साहेब किती सुरेख काम करत आहेत याची वाहवा करतील आणि तुम्हाला वराती मागून घोडे या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय येईल.
तुम्हीच ठरवायचे आहे लोकप्रतिनिधींचे वरातीमागून घोडे स्वीकारायचे कि खोट्याच्या कपाळी गोटा या म्हणीचा प्रत्यय आणून द्यायचा !!!
Leave A Reply

Your email address will not be published.