वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ.
या समाजातील दारिद्र्य रेषेखालील जीवनमान जगणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मर्यादित मुंबई या महामंडळाची दिनांक 8 फेब्रुवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्थापना करण्यात आली.
विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सवलतीच्या दराने अर्थसहाय्य देऊन त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीकरिता महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच विशेष मागासप्रवर्गातील जातींनासुद्धा कर्ज पुरवठा करण्यात येतो.
महामंडळ स्थापनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे –
सदर महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीकरिता विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.
महामंडळामार्फत २५ टक्के बीज भांडवल , वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि १ लाख थेट कर्ज योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना या राष्ट्रीयकृत बँका, राज्यस्तरीय बँकर्स समिती सदस्य असलेल्या बँकांसह इतर सहकारी बँका, नागरी बँका, सर्व शेड्युल व मल्टीशेड्युल बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
गट कर्ज व्याज परतावा योजना: या योजनेसाठी कर्जाची मर्यादा 10 ते 50 लाख रुपये पर्यत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षा पर्यंत असावे. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते हे आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्यांचे सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिम्रीनलकरीता 8 लाख रुपयाची मर्यादा असावी. ही योजना ऑनलाईन असून याकरिता सदस्यांचे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन प्रकल्प अहवाल सोबत सर्व मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: या योजनेमध्ये कर्ज व्याज परतावा मर्यादा 10 लाख पर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असून यासाठी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. तसेच रहिवाशी दाखला, उत्पनाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल, मूळ कागदपत्रासह वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.
1 लाख रुपये थेट कर्ज योजना:
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील युवकांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेची सुरुवात केली.या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
- राज्यातील बेरोजगारी कमी करून राज्याचा औद्योगीक विकास करणे.
- राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
बीज भांडवल योजना : बीज भांडवल योजना ही बँके मार्फत राबविली जाते. अर्जदाराने महामंडळाकडून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी, पॅनकार्ड, व्यवसायानुसार आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात दाखल करावेत. यापूर्वी लाभार्थ्यांनी कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.
या महामंडळा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ – VJNT.ORG
(माहिती संकलित.)