वटसावित्रीकथा: धर्मआणि विज्ञान
*वटसावित्रीकथा:धर्मआणि विज्ञान*
विज्ञान म्हणते,
राखेत संपेल सर्वकाही
भोळे मन म्हणते तरीही…
एकच हा जन्म जरी
सावित्रीची लेक मी
देईन साथ तुज
अनंताच्या वाटेवरी!
ही भारतभूमी अतिप्राचीन आहे.किती जुनी आहे,देवच जाणे.तिचे अतिप्राचीन स्वरुप कसे होते त्याबद्दल वाद आहेत.पण हे प्राचीन भारतीय मूलत: निसर्गपूजक होते.निसर्ग ही मानवाला मिळालेली अमुल्य देणगी आहे.वेदकालीन ऋषीमुनी हे वरचे निळे आकाश,पर्जन्य,अग्नी ,चंद्र-सूर्य,तारे,मेघ,समुद्र,पृथ्वी,हिरवे वृक्ष यांनाच देवता म्हणत.केवळ मानवी देवताच नाहीतर मानवेतर देवताही आपलं आयुष्य समृद्ध करीत असतात ह्याची त्यांना उत्तम जाण होती.मुळात *देवता* म्हणजे तरी काय? *दाता(देणारा)-ज्ञान-प्रेरणा देणारा* अशी व्याख्याच त्यांनी केली.ह्या सर्व नैसर्गिक संभारात आपल्याला अन्न,फळे-फुले,आैषधी,वस्त्र,शुद्ध हवा देणारे वृक्ष हे प्रकृतिच्या सृजनाचे प्रतिक आहेत.म्हणून हिरवा रंग समृद्धीचा ,साैभाग्याचा ! *परोपकाराय फलन्ति वृक्षा:।* असे संस्कृत सुभाषित आहे.मानवी जीवनाला सहाय्यभूत होणारी सजीव -निर्जीव साधने पूर्वजांनी पूज्य व पवित्र मानली.
सनातन धर्मातील परंपरामागे काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.हम ‘एसेहि ‘ कुछ नही करते.अनेक ज्ञात-अज्ञात ज्ञानेश्वरांनी धर्म आणि विज्ञान यांचा मोठ्या खुबीने मिलाफ घडवून आणला.त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘वटसावित्री व्रत ‘आख्यायिका.
उत्तर भारतात हे व्रत जेष्ठ अमावस्येला केले जाते तर दक्षिण भारतात जेष्ठ पाैर्णिमेला केले जाते. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्तच असून पारंब्यानी त्याचा विस्तारही खुप होतो त्यामुळे सुहासिनी स्त्रिया ‘मला व माझ्या पतिला आरोग्य,दीर्घायुष्य लाभु दे,धनधान्य यांनी माझा प्रपंच विस्तारीत व संपन्न होऊदे’अशी प्रार्थना करतात.वटवृक्षाचे आयुष्य ५०० ते १०००वर्ष असल्याने त्याला ‘ *अक्षयवट* ‘ म्हटले जाते.
दिवसाला २० तासांपेक्षा जास्तवेळ oxygen वड देतो आणि त्याचे अनेक आैषधी उपयोगही आहेत त्यामुळेच तो धार्मिक व वैज्ञानिक दृष्टिने खुपचं महत्त्वाचा आहे.’वटसावित्री ‘या नावाप्रमाणेच वट व सावित्री दोघांचे विशेष महत्त्व आहे.
सावित्री हे एक ऐतिहासिक चरित्र आहे.ज्या कोणी म्हणून भारतवर्षात श्रेष्ठ पतिव्रता होऊन गेल्या त्यात सती सावित्रीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.महाभारतातल्या वनपर्वात मार्कंडेय ऋषी व युधिष्ठिर संवादात हा कथाभाग येतो.
अनेकवर्षांपुर्वी भद्र देशात अश्वपति नावाचा राजा राज्य करीत होता.राजा हा अतिशय धार्मिक ,पराक्रमी व प्रजावत्यल होता.पण राजा अश्वपति व राणी मालवीच्या संसारवेलीवर बरेच वर्षपर्यंत फूल उमलले नव्हते त्यामुळे ते दु:खी होते. गुरु आदेशानुसार दोघांनी सावित्री देवीची कठोर तपश्चर्या केली तेव्हा सावित्री देविच्या प्रसादाने त्याला एक तेजस्वी कन्या झाली.सावित्री देवीच्या कृपाप्रसादाने झालेल्या मुलीचे नाव सावित्रीअसेच ठेवण्यात आले.
राजकन्या अतिशय बुध्दिमान,रुपवान व नम्र होती.नगरातील लोकांना तर ती देवकन्याच भासे.उपवर झाल्यावर राजाने तिलाच वर शोधण्याची परवानगी दिली.काही विश्वासू माणसांबरोबर तिला तीर्थंयात्रेला पाठवले, तेव्हा सावित्रीने जंगलात राहणार्या सत्यवानाची निवड केली.खरंतर सत्यवान हा शाल्व देशातील धृमत्सेन या अंध राजाचा पुत्र होता.पण शत्रुकडून हरल्याने तो राजा पत्नी व पुत्रासमवेत वनात राहत होता.जंगलात लाकडे तोडून सत्यवान गुजराण करत होता.
जेव्हा नारदमुनींना ही गोष्ट कळंली तेव्हा ते राजाला म्हणाले सत्यवान हा ययाति प्रमाणे उदार, चंद्राप्रमाणे प्रिय,अश्विनीकुमारासारखा सुंदर व पित्याप्रमाणे पराक्रमी असला तरी अल्पायुषी आहे. त्याचा एका वर्षाच्या आत मृत्यू होईल.राजाला काळजी वाटू लागली. त्याने मुलीला दुसरा वर शोधण्यास सांगितले. पण व्यर्थ!सावित्री निश्चयपूर्वक म्हणाली-काहिही असले तरि *आर्यकन्या एकदाच पतिचे वरण करतात* . तेव्हा नाइलाजाने राजाने तिचे लग्न सत्यवानाशी लावून दिले.तेव्हा ती नवर्याबरोबर जंगलात राहुन सासु-सासर्यांची सेवा करू लागली व पतिचा मृत्युकाल जवळ अाला असता तिच्या ह्यदयाची घालमेल होऊ लागली व पतिचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर आला ,तेव्हा तिने घोर व्रत आरंभिले.
त्या दिवशी ती नवर्याबरोबर जंगलात गेली.तेव्हा लाकडे तोडत असताना तो घेरी येऊन खाली पडला ती त्याचे डोके मांडीवर ठेवून त्याला सावध करत असतानाच तिने यमराजाला तेथे येताना पाहिले . तो सत्यवानाचे प्राण नेऊ लागताच सावित्री पतिचे प्राण परत मिळविण्यासाठी यमामागे जाते.तेव्हा यम म्हणतो’विधीचे विधान टाळता येणार नाही’.तेव्हा हे पतिव्रते तू परत जा.पण सावित्री म्हणाली’ जेथे माझे पति तेथे मी’ हाच सनातन धर्म आहे.
तेव्हा तिची निष्ठा व पतिभक्ती मुळे यमराजाने प्रसन्न होऊन सावित्रीला अंध सासु-सासर्यांचे डोळे,गमावलेले राज्य,तिच्या वडिलांना शंभर पुत्र देण्याचे वरदान दिले.तेव्हा ती परत यमामागे जाऊ लागते तेव्हा यम म्हणतो तू सत्यवानाचे प्राण सोडून हवे ते माग .तेव्हा ती शंभर पुत्रांची मागणी करते.यमदेव गफलतीने तथास्तु!म्हणतात.वचनबद्ध होऊन यमराज जाऊ लागताच ती म्हणते मला पुत्रवती होण्याचा वर दिलात आणि तरी तुम्ही माझ्या पतिला कसे नेत आहात ?पतिविना मी माता कशी होईल.
तेंव्हा सत्यवानाचे प्राण यमाला परत करावे लागले. त्यानंतर सावित्री सत्यवान आनंदित होऊन आपल्या राज्यात गेले. अशा प्रकारे तिने दुर्दम्य इच्छशक्तीने व चतुराईने फक्त पतीचे प्राणच वाचवले नाहीतर सासर्यांना दृष्टी व राज्य पुन्हा मिळवून दिले व तिच्या वडिलांना १०० पुत्रांची प्राप्ती करून दिली. अशा प्रकारे दोन्ही कुळांचे हित साध्य करणारी अशी ती खऱ्या अर्थाने ‘ *दुहिता* ‘ होती.
वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्री ने आपल्या पतीस पुन्हा जिवंत केले म्हणूनच ह्या दिवशी वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया सावित्रीचा त्याग व पतिभक्तीचे स्मरण करतात.
तसेच या व्रतातून पर्यावरण रक्षणाचा हेतू सध्या होतो. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अश्या झाडांची पूजा करण्याची कल्पना प्राचीन भारतीयांनी स्वीकारली असावी. एखादा वृक्ष एकदा पवित्र मनाला कि त्यावर आपण एकाएकी घाव घालत नाही. पूर्वी माणूस इंधन आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वनावर अवलंबून होता, पण पावसाळा हा वृक्षवेलींचा फळण्या- फुलण्याचा उत्तम काळ असतो आणि वृक्षाशी संबंधित गरजांची’ दीर्घकाळ पर्यंत पूर्ती ‘व्हावी हा हि एक महत्त्वचा उद्देश होता. *दीर्घकाळ पर्यंत पुर्ती म्हणजे* sustainable development. It means fulfiling the needs of the present without compromising the ability of future generations to meet their own needs.
धर्म ही कर्मप्रेरक शक्ति आहे आणि धर्म हा मानवी कर्मातूनच अस्तित्वात येतो. तेव्हा निसर्गाच्या पर्यायाने मानवी रक्षणासाठीच ‘वटसावित्री ‘सारखे व्रत करण्याची परंपरा अस्तित्वात आली असावी.
पण स्त्रिवादी सुर असा आहे की ‘सावित्री ‘ही पुरुषसत्ताक पद्धतीचे प्रतिक आहे.स्त्रिनेच हे व्रत का करायचे?पुरुषाला स्त्रिच्या दीर्घायुष्याची ईच्छा नाही का ?पण जाचक बंधन तर आपण तोडलीत.मग असे सारखे तारे तोडण्यापेक्षा positively त्याकडे बघता येईल.नवरा-बायकोच्या नातात अजुनचं गोडवा आणणारा हा सणं! हे व्रत करावे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.पुर्वीच्या काळी बायकांना धार्मिक कारणाने बाहेर पडता येई व विचारांची देवाणघेवाण होईल म्हणून तिनेच व्रतवैकल्यं करण्याची पद्धत पडली असावी. त्यात स्त्रिला पुरुषाच्या तुलनेत नटायची भारीचं होैस!तेव्हा मस्त साडी नेसुन नटा-थटा!नटल्यावर नवर्याच्या नजरेतले ‘सुंदर दिसतेस’ वाचलं की मन हे मोरपिशी होतेचं ना!
दुसरे म्हणजे सावित्रीची कथा सत्य आहे की दंतकथा हा वाद निर्माण होतो.पण न्यायमूर्ती रानडे म्हणायचे-“या गोष्टी खरोखरंच घडल्या या अर्थानं आपण पाहू नये.त्या कथांतील सार घ्यावे”.साने गुरुजींचे याबाबत विचार तर सांगण्यासारखे आहेत .ते म्हणतात”भारताची ध्येये या सर्व दंतकथातून दृष्टिस येतात.दंतकथा म्हणजे आपले अमर भांडार आहे.त्यांची ऐतिहासिक सत्यता पाहायची नसते.सत्य म्हणजे तरी काय?जन्मला,जगला,मेला म्हणजे का सत्य? मारामारी ,द्वेष-मत्सर,काम-क्रोध म्हणजे का सत्य?ही सृष्टी,हा संसार,हा समाज यांच्याविषयी ज्या आदर्श कल्पना आपल्या मनात खेळतात,त्यांनाच खरोखर सत्यत्व आहे.कारण त्यांच्यासाठी आपण धडपडतो”.सावित्री कथा त्याअर्थाने सत्यच आहे. तमसो मा ज्योतिगर्मय ।मृत्योर्मा अमृतं गमय !ह्या आमची उच्च ध्येये! हया अशा संस्कारांमुळेच आमची कुटुंबं पद्धती जगासाठी आदर्श आहे. भक्कम आहे.
नव्या काळाबरोबर नवी वळणे येणारच.पण वृक्षांविषयी कृतज्ञतेची भावना व वृक्षसंवर्धनही महत्त्वाचे.या दिवशी आपण वटवृक्ष लावू शकतो किंवा एकतरी झाड लावुया.धर्म अाणि विज्ञान यांची सुरेख सांगड घातलेली ही व्रतंवैकल्ये’ *र्हीश्च* *मे श्रीश्च मे* नुसते वैभव किंवा कृतज्ञता नको.वैभवाबरोबर कृतज्ञता आणि कृतज्ञते बरोबर वैभव हा थोर विचार देतात.
charity begins at home म्हणतं मी तर वडाचं झाड लावलयं माझ्याघरी! ***So *let’s celebrate, enjoy the Vatpournima girls!!* Avoid that बारा वाजलेले चेहरे….
©अश्विनी तेरेदेसाई-पाटील.पुणे .
जे मनाला पटेल असेच लिहिल्याने अधिक भावते। असे उत्तम लिखाण केल्याबद्दल आपले आणि लोकसंवाद टीम चे अभिनंदन