वाचाळवीर वाटाडे.
वाचाळवीर वाटाडे.
चमत्कारिक लोकांनी भरलेल्या या जगात मुशाफिरी करणे हाच एक मुळात आनंदानुभव असतो. आपल्या संपर्कातील किंवा परिचयातील अनेक चेहऱ्यांमध्ये एक चेहरा हमखास एखाद्या वाचाळवीराचा नक्कीच असतो. समर्थांच्या “क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे” या पंक्तीस शोभून दिसणारी काही माणसे आपल्या आजूबाजूला वावरताना सहज दिसतात. कधी कधी अशा वीरपुरुषांची (क्वचित वीरबालांची) अपघाताने भेटगाठ होते तर कधी कधी (कुटुंब कबिल्यात, मित्रमेळ्यात, कामाच्या ठिकाणी) आपल्या पाचवीलाच पुजलेले असतात.
कुठल्याही समयी, कोणत्याही प्रसंगी, कसल्याही विषयावर अगदी अधिकार वाणीने भरभरून (नॉन स्टॉप) बोलत राहणे हे त्यांचे प्रमुख लक्षण. समोरच्या व्यक्तीची मनस्थिती अथवा परिस्थिती याचे भान न ठेवता आपला (एकतर्फी) भाषणप्रपात अखंडपणे अक्षरशः ओतत राहतात. आपली सर्वज्ञतेची साक्ष न विचारता “अथ पासून इति पर्यंत” सगळ्या विषयातील त्यांच्या ज्ञानाची पोतडी उलगडून सांगत राहण्याची सवय मात्र श्रोत्यांना (आपल्यासारख्या) कासावीस केल्याशिवाय राहत नाही. अनाहूत सल्ले पेरत जाणे, नको त्या विषयात आपली (ठाम?) मते मांडणे, इतरांपेक्षा आपल्याच ज्ञानाची कक्षा किती विस्तृत आहे हे दाखवण्याचा अट्टाहास बाळगणे, दुसऱ्याची मते किंवा निर्णय किती चुकीचे आहेत हे पटवून सांगणे अशी “अचाट कामे” वाचाळवीर लीलया करत असतात. मित्र मंडळीत निपजलेल्या एखादा बोलका चेहरा हळूहळू गप्पाष्टकात मनोरंजनाचे साधन होतो आणि कालांतराने तो आपल्या बोलण्याच्या कलेला स्वतःचे बलस्थान समजू लागतो. दुर्दैवाने याची जाणीव करून देणारा (किंबहुना देणारी) न भेटल्यास, एखाद्या चेहऱ्यास चारचौघात सुरवातीला केवळ करमणुकीसाठी वापरले जाते आणि नंतर टाळले जाते.
“सायन्सलाच ऍडमिशन घ्या, आर्ट मध्ये काही स्कोप नाही” असा सल्ला देणारे कित्येकदा बारावीचे उंबरठेही ओलांडणारे नसतात. अमुक पक्षाच्या तमुक नेत्याचे किंवा एखाद्या अधिकाऱ्याचे आपले कसे सौहार्दपूर्ण संबंध आहेत, हे मोबाईलवरील शुभसंदेश दाखवत फिरत असतात. बांधकाम करताना देवघर पूर्वेला येऊ द्या, असं सांगणारा वाचाळ – वीरपुरुष भाड्याच्या घरात बस्तान बसवून असतो. चार लोकांचा घोळका जमला की, राजकारण, खेळ, शिक्षण, घर बांधकाम, लग्नसंबंध अशा अनेक क्षेत्रात कुठलाही अनुभव गाठीशी नसून देखील वाचाळवीर इतके जोरकसपणे इतरांना वाट दाखविण्याचे काम करतात की, कित्येकदा श्रोत्यांची “भीक नको पण कुत्रा आवर” अशी अवस्था होते. आपल्या या स्वभाव दोषाला “स्वयंभू समुपदेशक किंवा सुधारक” वृत्ती समजून असंख्यांना वाट दाखविण्याचे महत्कार्य जणू काही ईश्वराने यांनाच प्रदान केलेले आहे अशा थाटात काही मंडळी समाजात वावरत असतात. चुकून एखादा लागलेला खडा इतरांसाठी संदर्भ म्हणून वापरत “असंच केलं पाहिजे” चा धोशा लावत वाटाड्यांचा स्वैर संचार सुरु असतो. अफाट जनसंपर्क असलेल्या क्षेत्रात दररोजच्या वैविध्यपूर्ण कामामुळे कधीकधी अनेक विषयातील ज्ञानसंचय एखाद्याच्या ठायी आपसूकच होत असतो मात्र त्याला कृतीची जोड नसल्याने भरीवपणा येत नाही.
कमी अधिक प्रमाणात आपणही वाटाडे असतोच ना. एखाद्याचे भले व्हावे या उर्मीने आणि कळवळ्याने आपण आपली मते मांडत असतोच. मात्र आत्मप्रौढीने “विचारल्याविना सल्ला वाटप” केल्याने आपल्या व्यक्तिमत्वास “वाचाळवीर” संसर्ग होण्याचा धोका असतो हेही ध्यानात घ्यावे. “आधी केले मग सांगितले” असा साधा मंत्र प्राणपणाने जपत दैनंदिन जीवन जगणारी अनेक माणसे आपल्या सभोवताली देखील असतात. आपल्या जवळ वावरणाऱ्या लोकसमूहात वाचाळवीरांचे प्रमाण अधिक झालेत तर आपल्या “आयुष्याचे नियंत्रण” आपण सहजगत्या गमावू शकतो. म्हणून आपला लोकसंग्रह सुद्धा वारंवार तपासून पाहावा आणि गव्हातील खडे जसे काढतो तसे वाचाळवीर वाटाडे दुर्लक्षित करावेत म्हणजे, आयुष्य अधिक सरल सुकर होईल असे माझे प्रामाणिक मत आहे.
माझ्या एका अशाच वाचाळवीर मित्राने मजकडे हट्ट धरला की एके दिवशी दर आठवड्यात मी करीत असलेल्या माझ्या फेसबुक लिखाणात, माझ्यावर काहीतरी लिहीच म्हणून. मी अनेक दिवसांपासून टाळत होतो शेवटी ही “वाचाळवीर गाथा” आपल्या पुढ्यात मांडली.
फोटो – गुगल साभार.