वाशिम मतदारसंघात महायुतीचा वारू वेगाने विजयाकडे ?

0

वाशिम मतदारसंघात महायुतीचा वारू वेगाने विजयाकडे ?

मी ज्योतिषी वगैरे अजिबात नाही पण वाशिम मंगरूळ विधानसभा मतदारसंघाचा रंग,ढंग आणि पोत याचा मला बऱ्यापैकी अभ्यास आहे. इथला मतदार संयमी,विवेकी आणि दूरदृष्टि असणारा आहे. प्रभावाने किंवा अभावाने विचलित न होता मन आणि मस्तिष्क यांचा वापर करुन इथला मतदार बटण दाबतो. लोकसभेच्या वेळी आपण अनुभवले आहे.
मतदारांच्या अंतर्मनाचा ठाव घेणे हे कौशल्याचे काम आहे. सहज बोलण्यातून इथे मतप्रदर्शन निकालानंतर पार चुकीचे ठरते.
हा मतदारसंघ राखिव असल्यामुळे प्रस्थापित नेते केवळ धुढ्ढाचार्य बनून मिरवू शकतात पण मतांवर त्यांचा तितका परिणाम होत नाही. हे कटू पण सत्य आहे.
गत अनेक वर्षापासूनचा हा माझा अनुभव आहे. आ.लखन मलिक साहेब तसे खूप साधे,शिक्षण म्हणाल तर नगण्य,सामाजिक बलाबल शून्य,जिल्हयातील प्रस्थापित त्यांच्यामागे धूसरच पण तरीही परकोटीचे श्रीमंत आणि अति अति उच्चशिक्षित प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी धूळ चारत घरात बसवले. याचे कारण इथल्या मतदारांचा विवेक शाबूत आहे.” भिक नको घालू बाबा पण कुत्रे आवर “ ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते.
बर ! निवडायचे तर उपलब्ध उमेदवारातूनच. तिथे वेगळा पर्याय नाहीच. मग त्यातल्या त्यात सर्वांगाने सोयीचा माणूस निवडतात मतदार.  ढोबळ मानाने आकडेवारीचा आपण विचार केला तर
इथे दलित मतदान जवळ जवळ ७०००० आहे त्यातील २२००० हिंदू दलित बहुतांश काहीही झाले तरी महायुतीलाच मतदान करतात. अनू जमाती,आदिवासी ,बंजारा,धनगर,माळी यांची संख्या ७०,७५ हजार आहे.यातील ३५ % मतदान महायुतीचे आहे.मराठा समाज लाख दिड लाखात असून हा राखिव मतदारसंघ असल्यामुळे यातील बहुतांश मतदान महायुतीकडे आपसूक वळते.शिवाय ब्राह्मण,मारवाडी आणि तत्सम मतदार २५०००च्या जवळपास आहे. हे मत हमखास महायुतीचेच आहे.
ग्रामीण आणि शहरी विचार केला तर ग्रामीण मतदार दोन अडीच लाख आणि शहरी मतदार लाखभर आहेत.दोन्ही ठिकाणी मतदार तुळशीचे पान महायुतीच्या पारड्यात टाकतात.
म्हणजे आ.लखन मलिक हमखास पडणार हे राजकीय चाणक्य शेवटपर्यंत आवर्तन घालायचे प्रत्यक्षात मलिक साहेब पडायचे पण मतपेटीतून बाहेर पडायचे. मतदार संघ मानसिकतेचा विचार केला तर मतदान केंद्रात गेल्यावर मतदारांचे बोट इतरत्र जातच नाही. हा माझा गत पंचवीस वर्षाचा अनुभव आहे.
थोडक्यात मतदारांचा नैसर्गिक कौल महायुतीकडे आहे.
विशेष म्हणजे महायुतीत सारं काही आलबेल आहे असा माझा अजिबात दावा नाही.गट तट मठ इथेही आहेत. वाशिममध्ये कमळ आणि कारंज्यात तुतारी चालविणारे फोटोत कैद आहेत. पण या सर्व बाबी वाशिम मतदार संघात गौण आहेत कारण इथला मतदारच दूरगामी विचार करणारा आहे.
महायुतीत पक्षीय विचार केला तर पाच वर्ष इथे संघटन एकीकडे आणि आमदार एकीकडे हे दृष्य दिसते.पण तरीही आमदार महायुतीचाच येतो कारण इथे जनताच अग्रेसर असते.
गत वेळी मी मतदार संघ पिंजून काढला होता आणि मताधिक्याचा अचूक आकडा सांगितला होता. तो इतका अचूक होता की अंदाज आणि प्रत्यक्षात फक्त ६ मतांचा फरक होता.हे सर्व मतदारांचे मनोवर्तनावरून ठरवता येते. आताही महायुतीतील समन्वय,कार्यकर्त्यांची मर्यादा,परिघ,नेत्यांची सक्रियता ,नियोजन या बाबतचा तंबूचा बांबू पोकळ की भरलेला मला पुर्ण माहीत आहे.मवीआचा आक्रमक प्रचार,नियोजन ,एकजुट ,गावातील संबंध याची मला पुर्ण कल्पना आहे. पण तरीही आंधळ्याच्या गाई देव राखतो या मतदारसंघात. इथला देव मतदार आहे. निवडणूकीचा कल दिवसागणिक बदलत असतो त्यामुळे आताच भाष्य योग्य नाही पण या मतदारसंघाचे वैशिष्ठ हेच आहे की इथे मतदार पहिल्याच दिवशी मन बनवतो आणि बहुतांश तो कायम राहतो.लोकसभेत लोकांनी पहिल्याच दिवशी मवीआ डोक्यात घेतली . महायुतीत अर्थपुर्ण प्रचाराचा पूर होता पण तरीही वाशिम मतदारसंघात ४०००० मतांनी मवीआला आघाडी दिली. लोकसभेवरून विधानसभेचे गणित लावत असाल तर चुकताय तुम्ही !
आता लोकांची मानसिकता लक्षात घेता जवळपास १८००० मतांनी महायुतीचा वावटळीत दिवा लागेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे. हा फरक अजुन कसा वाढवायचा हे महायुतीने ठरवावे आणि कमी कसा करायचा हे मवीआ ने ठरवावे !पण सद्यस्थितित महायुतीचा अश्वमेघ बराच पुढे गेला आहे. हे माझे तटस्थ मत आहे.महाविकास आघाडीने वेळीच धडा घेतला नाही तर त्यांचा तंबू रिकामा होईल.
तूर्तास इतकेच ! ( फोटो – wikipedia साभार .)

 

  • प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
    ९८२२२६२७३५

लेखक सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक विषयांचे अभ्यासक आहेत. मोबा. नं. - ९८२२२६२७३५

Leave A Reply

Your email address will not be published.